Skip to main content
x

ठाकरे, केशव सीताराम

प्रबोधनकार ठाकरे

केशव सीताराम ठाकरे यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण पनवेल व देवास येथे झाले. १९०३मध्ये मुंबईतून ते मॅट्रिक झाले. त्यांनी सुरुवातीस काही वर्षे रेल्वेत नोकरी केली. त्यानंतर त्यांनी टंकलेखन, छायाचित्रकार, विमा एजंट असे अनेक व्यवसाय केले. त्यांची स्वत:ची नाटक कंपनीही होती. ते छत्रपती शाहू महाराजांच्या मर्जीतील होते व ब्राह्मणेत्तर चळवळीतील त्यांचे एक खंदे पुरस्कर्ते होते. मराठी व इंग्लिश या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. बालविवाह, विधवांचे प्रश्न , सोवळे-ओवळे, हुंडाबळी, अस्पृश्यता इत्यादी अनिष्ट रूढींविरुद्ध त्यांनी लेखणीद्वारे जनमत तयार केले. त्यांनी ‘प्रबोधन’ नावाचे नियतकालिक काढून त्यातून सडेतोड लेख लिहिले. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रीय लोकांनी ‘प्रबोधनकार’ ही उपाधी दिली.

सामाजिक विषमतेवर त्यांनी परखडपणे टीकास्त्र सोडले. ते उत्तम वक्ते होते. आपल्या व्याख्यानातून ते जुन्या रूढींवर टीका करीत. ठाकरे पत्रकार म्हणून यशस्वी झालेच, त्याशिवाय त्यांनी विपुल लेखनही केले. सामाजिक परिवर्तनाचा हेतू डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी ‘कोदंडाचा टणत्कार’, ‘ग्रमण्याचा इतिहास’, ‘भिक्षुकशाहीचे बंड’, ‘कुमारिकांचे शाप’ इत्यादी पुस्तके लिहिली. ‘खरा ब्राह्मण’, ‘टाकलेले पोर’, ‘विधिनिषेध’ ही नाटकेही त्यांनी त्याच उद्देशाने लिहिली. याशिवाय त्यांनी ‘पंडिता रमाबाई’, ‘रंगो बापूजी गुप्ते’, ‘संत गाडगेबाबा’ इत्यादींची दर्जेदार चरित्रे लिहिली. त्यांनी रामदासांवर ‘समर्थ रामदास’ हे इंग्लिश पुस्तक लिहिले. इतर प्रांतीयांना रामदासांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय व्हावा, हा त्यामागे हेतू होता. त्यांचे ‘वक्तृत्वशास्त्रा’वरील पुस्तकही महत्त्वाचे आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सहभाग मोठा होता. हक्कासाठी लढणार्‍या संघटनेला ‘शिवसेना’ हे नाव त्यांनीच सुचवले; पुढे त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवसेना’ हा पक्ष फोफावला. ‘माझी आत्मगाथा’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे.

- संपादित

ठाकरे, केशव सीताराम