Skip to main content
x

थत्ते, रघुनाथ परशुराम

राजाभाऊ थत्ते

     वैज्ञानिक प्रयोगांतून निष्पन्न होणाऱ्या आधुनिक निष्कर्षांच्या आधारे प्राचीन वेदविद्येचे  विश्‍लेषण यथार्थपणे करणाऱ्या मोजक्या विद्वानांपैकी रघुनाथ परशुराम ऊर्फ राजाभाऊ थत्ते हे होत. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे झाला. तेथील नगरपालिका शाळेतून शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, महाविद्यालयीन शिक्षणासाठी राजाभाऊ पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात दाखल झाले. तिथे भौतिकी व गणित विषयांचा अभ्यास करून, मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. पदवी मिळविल्यानंतर, स्कूल ऑफ रेडिओ फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना रेडिओचे तांत्रिक शिक्षण देण्यासाठी त्यांची नियुक्ती झाली.

     १९४२ साली पुण्यात ‘सिमला हाउस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय हवामान खात्याच्या (आय.एम.डी.च्या) वेधशाळेत संशोधक म्हणून ते रुजू झाले. हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी पृथ्वीपासून बऱ्याच उंचीवरील तापमान, दाब व आर्द्रता या वातावरणाच्या तीन घटकांचे, दिवसातून निदान दोनदा तरी, मापन करावे लागते. त्यासाठी त्या घटकातील फेरबदलांना प्रतिसाद देणारे एक छोटेसे यंत्र लहानशा टोपलीत बसवून, हायड्रोजन वायू भरलेल्या रबरी फुग्यांमधून उंच वातावरणात पाठवीत असत. जमिनीपासून आकाशात जसजसे वर जावे, तसतसा उंचीनुसार वातावरणाचा दाब कमीकमी होत जातो. त्यामुळे हायड्रोजन वायूने भरलेले रबरी फुगे वातावरणात वरवर जाताना हळूहळू प्रसरण पावू लागतात व रबरी आवरणाचा ताण मर्यादेबाहेर गेल्याने फुगे फुटले, की त्यांना बांधलेली उपकरणांची टोपली पॅराशूटच्या साहाय्याने पृथ्वीवर अलगद येऊन पडे. पण त्यासाठी ४-६ दिवस लागत. कधीकधी तर वाऱ्याने पॅराशूट भरकटल्याने, टोपल्या अरबी समुद्रात पडत. ही त्रुटी दूर करण्यासाठी फुग्यांना बांधलेली यंत्रांची पेटी वातावरणात वरवर जात असतानाच, वेगवेगळ्या उंचीवरील दाब, तापमान व आर्द्रता मोजणाऱ्या त्यातील संवेदकांच्या प्रतिसादाचे रेडिओलहरींच्या साहाय्याने तत्काळ प्रक्षेपण करायचे व वातावरणासंबंधीची माहिती पुरवणाऱ्या त्या रेडिओ लहरींचे वेधशाळेत ग्रहण करून, त्या माहितीच्या आधारे वातावरणात होणाऱ्या संभाव्य बदलांचे खात्रीलायक भाकीत करता येईल असे, ‘रेडिओ साउंड’ नावाचे नवे तंत्रज्ञान सिद्ध करण्याचे काम डॉ. थत्त्यांनी पुणे वेधशाळेत सुरू केले. त्यावरच आधारलेल्या त्यांच्या संशोधन प्रबंधाला मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळाली.

     त्याच सुमारास बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये डॉ. होमी भाभा विश्वकिरणांसंबंधी (कॉस्मिक रेज) संशोधन करीत होते. त्यासाठी सिल्व्हर ब्रोमाइडयुक्त फोटोग्रफिक इमल्शनचे जाड थर दिलेल्या काचांची चळत हायड्रोजन भरलेल्या फुग्यांना बांधून, वातावरणाच्या वेगवेगळ्या उंचीवर पाठवण्याचे तंत्र डॉ. भाभा वापरीत. फोटो इमल्शनऐवजी गायगर म्युलर काउंटरवर आधारित संवेदक यंत्रे उंच वातावरणात पाठवून रेडिओ साउंड तंत्रज्ञानाने विश्वकिरणांचा अभ्यास जारी ठेवायला, थत्त्यांना मुंबईत नव्याने स्थापन झालेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फण्डामेन्टल रिसर्च (टी.आय.एफ.आर.) मध्ये काम करण्यासाठी पाचारण करण्यात आले. तेथे पाच वर्षे संशोधन केल्यानंतर त्यांना परदेशी संशोधनासाठीची आय.सी.आय. फेलोशिप मिळाली. त्यानंतरची चार वर्षे विलायतेत एडिन्बरा विद्यापीठात, प्रा. फेदर, एफ.आर.एस. व डॉ. डायमंड यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तत्सम पुढील संशोधन कार्याबद्दल त्यांना एफ.आर.मेट.एस. हा सन्मान मिळाला. १९५४ साली एडिन्बराहून ते इंग्लंडमधील चेम्सफर्ड इथल्या जगप्रसिद्ध मार्कोनी कंपनीच्या रडार व सेमिकंडक्टर विभागात शास्त्रज्ञ म्हणून नोकरी करू लागले. नोकरीच्या उत्तरार्धात व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन - व्हि.एल.एस.आय.च्या विकासासंबंधीच्या कार्यातही त्यांचा सहभाग होता.

     दुसऱ्या महायुद्धाअखेरीस वापरलेल्या अणुबॉम्बमुळे व त्यानंतर बिकिनी बेटावर करण्यात आलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणी स्फोटामुळे, खूप मोठ्या लोकवस्त्यांवर आकस्मिकरीत्या होऊ शकणाऱ्या, आण्विक विकिरणांच्या (न्यूक्लिअर रेडिओ अ‍ॅक्टिव्हिटी) संभाव्य दुष्परिणामांपासून कराव्या लागणाऱ्या बचावासाठी, संघटित लोकजागृतीची आवश्यकता, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगभर भासू लागली होती. त्यातूनच ठिकठिकाणी नागरी संरक्षण चळवळी (सिव्हिल डिफेन्स मूव्हमेन्ट) सुरू झाल्या. मार्कोनी कंपनीत नोकरीत असताना, इंग्लंडमधील त्यासंबंधीच्या चळवळीतही थत्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

     १९७२ साली निवृत्त झाल्यावर, पवई आय.आय.टी.मध्ये अभ्यागत संशोधक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेथे त्यांनी रडारविषयीचे एक नवे केंद्र उभारण्याचे  काम  केले. त्या वेळी योगनिद्रा, ध्यानस्थ अथवा समाधी अवस्थेत व्यक्तीच्या मेंदूतील संवेदनांच्या क्रियांमधील बदल, आधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्राने तपासता येतील का, याचा शोध घेण्यासाठी त्यांनी काही प्रयोग सुरू केले. वेदांतील ऋचांचा सम्यक संदर्भ देऊन लिहिलेल्या ‘वैदिक वाङ्मयातील भौतिक शास्त्रे’ या प्रबंधाला, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे ‘दक्षिणा’ पारितोषिक मिळाले. ऑल इंडिया ओरिएन्टल कॉन्फरन्सच्या जयपूर अधिवेशनात, राजस्थान संस्कृत अकॅडमीने त्यांना ‘महापंडित’ हा सन्मान दिला. त्यांचा ‘शोध वेदांच्या मूलस्वरूपाचा’ हा ग्रंथही वाखाणला गेला.  वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी थत्ते यांचे निधन झाले.

डॉ. अच्युत थत्ते

थत्ते, रघुनाथ परशुराम