Skip to main content
x

वराडे, सुपडा भिकू

               सुपडा भिकू वराडे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील नरवेल या गावी झाला. गरीब परिस्थिती असूनही त्यांनी शालेय ते पदव्युत्तर शिक्षण शिष्यवृत्त्या मिळवून घेतले. शेळगाव बाजार येथील माध्यमिक शाळेतून प्रथम वर्गात ते शालान्त परीक्षा (१९५४) उत्तीर्ण झाले. त्यांनी नागपूरच्या कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत (१९५९) मिळवली. त्यांनी १९६१मध्ये मृदाशास्त्र व कृषि-रसायनशास्त्र हा विषय घेऊन दिल्लीच्या कृषी संशोधन संस्थेतून एम.एस्सी. विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. त्यांनी खरगपूरच्या आय.आय.टी.ची शिष्यवृत्ती मिळवून १९६६मध्ये मृदा-भौतिकशास्त्र (सॉइल फिजिक्स) या विषयात पीएच.डी. मिळवली. हा अभ्यासक्रम करत असतानाच १९६३मध्ये आय.आय.टी. खरगपूरमध्ये सहव्याख्याता पदावर त्यांची निवड झाली. संशोधनाची आवड असल्यामुळे फोर्ड फाऊंडेशनची पोस्ट डॉक्टरल फेलोशिप घेऊन ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये रुजू झाले व एक वर्ष १९६८मध्ये ‘पाणथळ जमिनीत निचरा कसा व किती?’ या विषयावर संशोधन केले. खरगपूर आय.आय.टी.मध्ये पदोन्नती मिळून त्यांनी १९६९-७४ या काळात १० विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. त्यासाठी त्यांना पी. एल. ४८० ही संशोधन योजना मिळाली होती.

               जमीन, हवामान व पिके यांचा अन्योन्य संबंध, सिंचन किती व केव्हा, पीक उत्पादनासाठी जमिनीत हवा व पाणी यांचे प्रमाण, निचरा करण्याच्या पद्धती, निचरायुक्त सच्छिद्रता, जमिनीचा भुसभुशीतपणा व त्याचे मापन, जमिनीतील ओलावा, त्याचे कमी वा जास्त प्रमाण व त्याचे पीक उत्पादनावरील परिणाम, कार्यकारणभाव इ.  बाबींवर त्यांचे ५० शोधनिबंध परदेशातील नामवंत नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. त्यांनी १९७४मध्ये परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठात मृदाशास्त्र विभागाचे प्रमुखपद स्वीकारले. त्यांनी मराठवाड्यातील खोल काळ्या जमिनीचा निचरा व त्याचे रेखांकन चित्रण हा संशोधन प्रकल्प राबवला. त्यांनी पिकांना लागणारे पाणी, पर्णोत्सर्जन व बाष्पीभवन यांचा अभ्यास करून विविध पिकांसाठी गुणसूत्र व संदर्भीय गुणांक तयार केले. त्यांनी पाण्याची गरज, त्यात पावसाच्या पाण्याचा वाटा व सिंचनाची गरज या घटकांची मात्रा मोजून निश्‍चित केली. त्यांना १९७९मध्ये रशियातील तिमिरित्झव कृषी प्रबोधिनीत व्याख्याने देण्यासाठी पाहुणे प्राध्यापक म्हणून पाचारण केले. भा.कृ.अ.प.च्या मृदा व कृषिविज्ञान या पॅनेलवर त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून कार्य केले. त्यांना भारतातील निरनिराळ्या १४ संस्था व विद्यापीठांत  व्याख्याने देण्यासाठी निमंत्रणे आली आणि मृदा व जल या दोन विषयांच्या राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ म्हणून मान्यता मिळाली. औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेत (वाल्मी) १९८०मध्ये कृषी विभागप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली व १९८४ ते १९९४ दरम्यान त्यांनी संस्थेचे सहसंचालक म्हणून कार्य केले. जल, भूमी व सिंचित पिकांसाठी संशोधन व प्रशिक्षण हा या संस्थेचा मुख्य उद्देश होय. भारत व अन्य देशातील सिंचन अभियंते, सिंचनाशी संबंधित शास्त्रज्ञ, योजनाकार, कार्यकर्ते ‘वाल्मी’मध्ये प्रशिक्षणासाठी येतात. डॉ. वराडे यांनी निरनिराळे अभ्यासक्रम योजणे, त्यांचे आशय ठरवणे, त्यावरील लिखित व दृक्श्राव्य साहित्य तयार करणे, प्राध्यापक नेमणे, जल व भूमी व्यवस्थापनाची नवी दृष्टी प्रशिक्षणार्थींना देणे ही सर्व कामे दर्जेदारपणे केली. म्हणून या संस्थेची भलावण विश्‍व बँकेने जगभर केली. देशोदेशींचे सिंचन अभियंते व अधिकारी ‘वाल्मी’ औरंगाबादमध्ये प्रशिक्षणासाठी येऊ लागले. इंटर अ‍ॅक्टिव व्हिडीओ डिस्क भारतात प्रथमच वाल्मीत तयार करण्यात आली. त्यामागची बुद्धी व परिश्रम डॉ. वराडे यांचे होते. हे सर्व पाहून यू.एस.एड.ने त्यांना १९८४ ते १९९४पर्यंत एक प्रकल्प दिला. त्यानुसार त्यांनी प्रशिक्षण, परदेश अभ्यासदौरे, संशोधन सुविधा, मार्गदर्शन, प्रकल्प मूल्यांकन सुधारणा वगैरे कार्य केले.

               वराडे यांनी १९८६मध्ये ५० दिवस अमेरिकेचा प्रवास करून तेथील सिंचन प्रकल्प व प्रशिक्षण यांचा अभ्यास केला. त्यांनी १९९० व १९९४मध्ये आंतरराष्ट्रीय मृदाविज्ञान काँग्रेससाठी हॅम्बुर्ग (जर्मनी) व क्योटो (जपान) येथे शोधनिबंधाचे वाचन केले. त्यांनी ३० विद्यार्थ्यांना एम.एस्सी.साठी व २२ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आणि १५०पेक्षा जास्त शोधनिबंध व ६ पुस्तके प्रसिद्ध केली. त्यांनी मुळा सिंचन प्रकल्प, पूस सिंचन प्रकल्प व नद्या खोरे मृदासंधारण या ३ प्रकल्पांचे मूल्यांकन केले. ‘इंडियन सोसायटी ऑफ सॉइल सायन्स’, ‘इंडियन वॉटर रिसोर्सेस सोसायटी’ व ‘कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थांनी त्यांना आजीव सदस्यपद बहाल केले, तर ‘सॉइल कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया, दिल्ली’ने २००३मध्ये त्यांना सुवर्णपदक प्रदान केले. जल व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामासाठी वसंतराव नाईक प्रतिष्ठान, मुंबईने त्यांना १९९६मध्ये वसंतराव नाईक पुरस्कार प्रदान केला होता. ते ‘वाल्मी’मधून १९९४मध्ये निवृत्त झाले.

- डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

वराडे, सुपडा भिकू