Skip to main content
x

अधिकारी, कांचन मार्कंड

           नाटक, चित्रपट, दूरदर्शन या माध्यमांतून अभिनयाने सुरू झालेला प्रवास यशस्वी निर्मितीपर्यंत नेणाऱ्या कांचन अधिकारी यांचे पूर्वाश्रमीचे नाव कांचन शरद घारपुरे. एका मध्यमवर्गीय व सुसंस्कारित कुटुंबात मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. वडील शरद घारपुरे मुंबईला श्रीनिवास मिलमध्ये नोकरी करत होते आणि आई कुसुम घारपुरे कीर्तनकार होत्या. शालेय वयापासूनच त्यांना अभिनयक्षेत्राचे आकर्षण होते. मुंबईच्या एम.एल. डहाणूकर महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर आविष्कारया नाट्यसंस्थेच्या शिबिरात अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.

वाणिज्य शाखेच्या शिक्षणामुळे त्यांनी बँक ऑफ इंडियामध्ये ५ ते ६ वर्षे नोकरीही केली. याच दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेमध्ये रत्नाकर मतकरींच्या एका नाटकात काम केले. या भूमिकेचे खूप कौतुक झाले आणि त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. या नाटकानंतर रंगभूमीवरील त्यांची वाटचाल सुरू झाली, पण दरम्यान दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर भक्ती बर्वे यांच्या प्रोत्साहनाने निवेदिका म्हणून त्यांची निवड झाली. १९८५ ते १९८८ या तीन वर्षांच्या काळात त्यांनी दूरदर्शन वाहिनीवर निवेदिका व वृत्तनिवेदिका म्हणून कामाचा अनुभव घेतला, तो भविष्यात त्यांच्या कुटुंबीयांच्या सब टी.व्ही.अर्थात श्री अधिकारी बदर्सयांच्या खाजगी वाहिनीसाठी उपयुक्त ठरला.

बबन प्रभूलिखित  पळा पळा कोण पुढे पळे तोया पहिल्या व्यावसायिक नाटकातून कांचन अधिकारी यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. या पहिल्याच नाटकामुळे त्यांना भक्ती बर्वे, आत्माराम भेंडे, दिलीप प्रभावळकर, माधव वझे या कलाकारांसह काम करण्याचा अनुभव मिळाला. या नाटकातील भूमिकेमुळे प्रेमासाठी वाट्टेल तेया प्रकाश भेंडे यांच्या चित्रपटात त्यांना संधी मिळाली. अशोक सराफ या दिग्गज कलाकाराबरोबर नायिका म्हणून या चित्रपटात काम केले. कांचन अधिकारी यांनी बाबा सावंत यांच्या हिचं काय चुकलं?’ या चित्रपटात रंजना, विक्रम गोखले यांच्यासह भूमिका केली होती. हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. किरण शांताराम यांची निर्मिती असलेल्या, गिरीश घाणेकर दिग्दर्शित बाळाचे बाप ब्रम्हचारीया चित्रपटातही भूमिका साकारली. १९८९ साली आलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी मार्कंड अधिकारी यांच्याशी विवाह केला.

लग्नानंतर काही काळ अभिनयक्षेत्रापासून दूर राहिल्यानंतर कांचन अधिकारी यांनी १९९५ साली दामिनीया अत्यंत लोकप्रिय मालिकेच्या दिग्दर्शनाने या क्षेत्रात पुनरागमन केले. पंधराशेपेक्षा जास्त भाग चाललेल्या या मालिकेने अनेक पुरस्कारही मिळवले. आठ वर्षे चालू असलेल्या या मालिकेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. कांचन अधिकारी यांनी मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या. दादा कोंडके यांच्या आगे की सोचया हिंदी चित्रपटात शक्ती कपूर, स्वप्ना या कलाकारांबरोबर सहजतेने अभिनय केला. ये जो है जिंदगी’, ‘बनते बिगडते’, ‘और भी है राहें’, ‘तितलियाँयासारख्या हिंदी मालिकांमध्ये अभिनय केलाच, शिवाय अभी तो मै जवान हूँ’, ‘संबंध’, ‘डोली लेके आयी है दुल्हनियाँ’, ‘हँसी वो फसीया हिंदी मालिकांचे दिग्दर्शनही केले.

श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडया आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय सहभाग घेऊन मी मराठीया मराठी वाहिनीच्या कार्यक्रमांच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्यांनी रोहिणी हट्टंगडी, अजिंक्य देव, रेणुका शहाणे या कलाकारांना घेऊन अंतरया दूरदर्शनपटाचे, ‘मानिनीया मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटानंतर तुक्या तुकविला नाग्या नागविला’, ‘दोन घडीचा डाव’, ‘मोकळा श्‍वासअशा वेगळ्या वाटेने जाणार्‍या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तसेच चोरावर मोरयासारख्या काही मराठी मालिकांचेही दिग्दर्शन केले आहे. साजिद खान यांच्या सब कुछ हो सकता हैया मालिकेची संकल्पना आणि दिग्दर्शन कांचन अधिकारी यांनी केले. सत्य घटनेवर आधारित २०१८ मध्ये आलेला ‘इंडिअन नेव्हर अगेन निर्भया’ हा हिंदी चित्रपट त्यांनी प्रोड्यूस तर केलाच आणि यात अभिनय देखील केला आहे.

रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या माध्यमांतून अभिनय आणि दिग्दर्शनाबरोबर ध्रुव सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांमध्येही कांचन अधिकारी यांचा सहभाग असतो. एकूणच सर्व माध्यमांची जाण असलेल्या कांचन अधिकारी यांचे निर्माती म्हणून काम आजही सुरू आहे.

- नेहा वैशंपायन

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].