Skip to main content
x

अग्रवाल, गंगाप्रसाद बालाराम

       गंगाप्रसाद अग्रवाल यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील वसमत येथे झाला. बालाराम हे त्यांचे वडील व लक्ष्मीबाई ह्या त्यांच्या आई. त्यांचे वडील सूत व रंग विक्रीचा व्यवसाय करीत. चार भाऊ व दोन बहिणी या सहा भावंडांमध्ये गंगाप्रसादजी दुसरे. सातवीपर्यंत वसमतला शिकलेले गंगाप्रसादजी आठवीसाठी जालन्याला गेले. तिथून मॅट्रिकपर्यंतच्या शिक्षणासाठी अंबाजोगाईच्या योगेश्‍वरी नूतन विद्यालय ह्या राष्ट्रीय शाळेत ते आले. या शाळेने त्यांच्यावर राष्ट्रीयत्व, सामाजिकतेचे संस्कार केले. पुढे वर्धा, नागपूर इथे इंटरपर्यंत शिकण्यात ते कसेबसे रमले. पण पुढे त्यांच्या समाजकार्याने मोठ्या पदव्यांपैकी एवढी मोठी मजल मारली की नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाने इ.स.१९९९ मध्ये त्यांना डी. लिट् दिली. त्यांचा विवाह ते शिकत असतानाच वयाच्या तेराव्या वर्षी झाला. भागीरथीबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव, चार मुलगे व एक मुलगी अशी अपत्ये त्यांना झाली.

स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांपेक्षा गंगाप्रसादजींना सामाजिक जबाबदाऱ्या महत्वाच्या वाटत आल्या. म्हणूनच हैदराबाद मुक्तिसंग्रामाकडे त्यांची पावले समर्थपणे वळली. निझामाच्या अराजकाविरुध्द् झगडत असतानाच ते जनसामान्यांच्या निरक्षरतेच्या अराजकाविरुध्द् ते झगडले. त्यासाठी त्यांनी सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमाचा उपयोग केला. हैद्राबादच्या स्वातंत्र्याशिवाय भारताचे स्वातंत्र्य अपूर्ण आहे,’ हा स्वामी रामानंदतीर्थांचा कृतिविचार त्यांच्यासाठी आचार ठरला. अहिंसक असलेेले गंगाप्रसादजी हैदराबादच्या मुक्तीसाठी सशस्त्र आंदोलनाकडेही वळले.

मुक्त झालेली जनता प्रबोधित होणे आवश्यक असते, हे लक्षात घेऊन त्यांनी हैदराबाद मुक्तीनंतर जनतेच्या वैचारिक प्रबोधनासाठी समतानावाचे हस्तलिखित साप्ताहिक सुरू केले. वैचारिक प्रबोधनाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणे ही तर त्यांची जीवनशैली आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, बर्हिजी स्मारक शिक्षण संस्था, राष्ट्र सेवा दल, वसमत नगर परिषदेचे लोकाग्रहास्तव स्वीकारलेले अध्यक्षपद, आणीबाणीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सोसलेला कारावास, ‘सर्व सेवा संघाचे अध्यक्षपद या त्यांच्या गतिमान कृतिशीलतेच्या खुणा आहेत.

 ग्रामस्वराज्याच्या कल्पनेला मूर्त रूप देत ते ग्रामस्वराज्य आंदोलनाचे प्रमुख आधारस्तंभ ठरले. पण आधारस्तंभाच्या आधारावर जनसामान्य निराधार न होता स्वतःच स्वतःचा आधार व्हावेत ही कृतिशील काळजी त्यांनी घेतली. खादी या वस्त्रात गुंफलेल्या विचाराचा आचार झाला तर बेरोजगारांना भाकर मिळते हा कृतिविचार त्यांनी खादी उत्पादन व चळवळीतून सिद्ध केला. खादीला ताणाबाणा नामशेष होऊ नये यासाठी स्वतंत्र भारतात टेरिलिन पॉलिस्टर कपड्यांच्या होळ्या त्यांनी पेटवल्या. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधात स्वतंत्र भारतातल्या स्वदेशी ग्रामोद्योगांना स्वाभिमानाने, स्वतंत्रपणे आणि समर्थपणे उभे राहण्याचे सामर्थ्य त्यांनी ग्रामस्वराज्याच्या आंदोलनातून दिले. उत्पादक व उपभोक्ता यांच्यामधला दलाल दूर करत त्यांनी आर्थिक शुचिताही आणली. निर्धूर चूल, जात्याला बॉल बेअरिंग बसविणे, सुलभ संडास, गोबर गॅस, सौर ऊर्जा या सोप्या प्रयोगांना जनजीवनात रुजवून त्यांनी जनसामान्यांचे जगणे सोपे केले. 

लातूर परिसरातील भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, बाबरी मशिदीच्या पतनानंतर सद्भाव व सामंजस्यासाठी त्यांनी केलेले कार्य उत्स्फूर्त व अथक ठरले. सजीव शेती, स्वावलंबी शेती या नव्या प्रयोगासाठी नॅडेप खत, झटपट खत, शिंग खत, अमृतजल खत, गांडूळ खत, पंचगव्य खत, हिरवळ खत या नव्या खतांच्या विकसनातले त्यांचे योगदान सुपीक ठरले. योगासने, निसर्गोपचार, पाणी परिषद, वनवासींचा शेती हक्क या त्यांच्या कार्यामुळे सर्वसामान्यांना जीवनमानाचा सुधारित स्तर अनुभवता आला. सजीव शेती किंवा स्वावलंबी शेती’, ‘युद्ध जाहले सुरूया त्यांच्या पुस्तिकाही आहेत.

गंगाप्रसाद अग्रवाल यांनी नव्या वाटा, नव्या यात्रा निर्माण केल्या आहेत. या वाटांबद्दल, यात्रांबद्दल ते दुराग्रही नव्हते. इतरांचे वाटानिर्मितीचे स्वातंत्र्य त्यांनी कायमच मान्य केले. म्हणूनच हाती घेतलेल्या कार्याची जबाबदारी सांभाळता सांभाळता इतरांमध्येही त्यांनी जबाबदारीची भावना निर्माण केली. त्यामुळे ते मूलतः शिक्षक वाटत. स्वतः शिकत शिकत इतरांना शिकवण्याची सहजसुंदर गुंफण त्यांना साधली होती. समाज जीवनातला गुंता काढून टाकण्यासाठी अशी गुंफण आवश्यक असते. १९५३ मध्ये वसमत नगरपरिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. २००० मध्ये वर्धा सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

स्वतःच्या कार्याच्या आधाराने गुंफलेली त्यांची व्याख्याने तेवढीच खरी वाटत. खरेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव असल्यामुळे त्यांची मैत्री कुणाशीही चटकन जमत असे. नियोजन, पूर्वतयारी, क्रियान्वयन, मूल्यमापन आणि अनुधाज्ञ हे त्यांच्या कार्यशैलीतील पाच टप्पे समाजहितासाठीच असतात. 'मराठवाड्याचे गांधी' या नावाने ते ओळखले जात.  

- प्राचार्य  डॉ. संतोष मोतीराम मुळावकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].