Skip to main content
x

आघारकर, शंकर पुरुषोत्तम

   शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचा जन्म कोकणातील मालवण या गावी झाला. त्यांचे वडील शासकीय खात्यात असल्यामुळे त्यांच्या अनेक गावी बदल्या होत असत. त्यामुळे शंकर आघारकर यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निरनिराळ्या गावी झाले. ते १९०१ मध्ये धारवाडच्या शासकीय प्रशालेमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी १९०२ मध्ये मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि यथाकाल वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयांचा अभ्यास करून त्यांनी बी.ए.च्या परीक्षेत प्रथम वर्ग मिळवला. याच परीक्षेत इंग्रजीमध्ये दाखवलेल्या नैपुण्यासाठी त्यांना बेल पारितोषिक देण्यात आले. ते १९०९ मध्ये वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र आणि भूशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. झाले.

    आघारकर यांना १९१० मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राणिशास्त्र प्राध्यापक आणि विभागप्रमुख या पदावर तात्पुरती नोकरी मिळाली. त्यांनी १९१३ पर्यंत त्या विषयाचे अध्यापन केले. अध्यापनाबरोबर निसर्ग निरीक्षण आणि संशोधनाची त्यांना विलक्षण गोडी असल्यामुळे, सवड मिळताच निरनिराळ्या ठिकाणी जाऊन ते वनस्पती आणि प्राण्यांचे निरीक्षण करत. आवश्यकता वाटल्यास त्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत घेऊन येत. त्यांच्या या छंदामुळे पश्चिम घाटातील नद्या आणि पाणवठे यात लिम्नॉक्निडा इण्डिका या जलव्याल प्राणीसंघातील जलपुष्प गणातील प्राण्यांचे अस्तित्व असल्याचे आढळून आले. त्यापूर्वी पश्‍चिम घाटात या जलपुष्पाचे अस्तित्व कोणासही ठाऊक नव्हते. तांबी, वेण्णा, धोम येथील धरणांमध्येही हे प्राणी आढळून आले. त्यावर नेचरया प्रख्यात नियतकालिकात त्यांचा संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाला.

    एल्फिन्स्टन महाविद्यालयातील अध्यापकाची नोकरी संपल्यावर आघारकर १९१३ मध्ये कोलकाता येथे गेले. तेथील भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेतील इंग्रज अधीक्षक डॉ. अ‍ॅनेडेल यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून परिचय झालेला असल्यामुळे त्यांनी आघारकरांना भारतीय संग्रहालयाचे (इंडियन म्युझियम) मानद पत्र-प्रतिनिधी म्हणून नेमले. या संस्थेत स्वत:बरोबर आणलेल्या वनस्पती, प्राणी संग्रहाचा अभ्यास करत असताना उपअधीक्षक ग्रॅव्हली यांच्याशी परिचय झाला. आघारकर यांना त्यांच्याकडून अनेक तंत्रे शिकावयास मिळाली. ग्रॅव्हली यांच्याबरोबर पश्‍चिम घाटामध्ये प्रवास करून तेथील प्राणी आणि खास करून जलव्याल प्राणिसंघातील प्राण्यांचा त्यांनी अधिक अभ्यास केला.

    कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू सर आशुतोष मुखर्जी यांनी डॉ. सी.व्ही. रामन यांच्या शिफारशीवरून १९१३ मध्ये आघारकर यांची त्या विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापकपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती तेथील घोष आसनाशी संबंधित होती.

     आघारकर १९१४ मध्ये मुखर्जी यांच्या सांगण्यावरून पुढील शिक्षणासाठी जर्मनीला गेले, परंतु त्याच वर्षी पहिले महायुद्ध सुरू झाल्याने त्यांना १९१७ पर्यंत बंदिवासात राहावे लागले. नंतरची दोन वर्षे त्यांनी सक्षम वनस्पतिशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले आणि १९१९ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली.

    नंतर डॉ. आघारकर यांनी सार्‍या युरोपभर प्रवास केला आणि तेथील विविध वनस्पतींचा संग्रह करून कोलकाता विद्यापीठात वनस्पतिशास्त्राचे अध्यापन, संशोधन आणि मार्गदर्शन यावर लक्ष केंद्रित केले. त्यांना विविध ठिकाणी जाऊन वनसृष्टीचा अभ्यास करण्याची अनुमती मिळाली. त्याचा लाभ घेत डॉ. आघारकर यांनी नेपाळमधील विविध ठिकाणी जाऊन वनसृष्टीचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास केला आणि वनस्पतींचा संग्रह केला. त्यांनी केलेला अभ्यास हा नेपाळामधील वनसृष्टीचा पहिलाच शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास होता, असे म्हटले जाते.

     डॉ. आघारकर यांच्या कोलकाता विद्यापीठातील ३३ वर्षांच्या कारकिर्दीत वनस्पति-शरीरविज्ञान, आनुवंशशास्त्र, वर्गीकरण, कवकशास्त्र, पुरातन वनस्पतिविज्ञान अशा विज्ञानशाखांच्या अभ्यासासला प्रारंभ झाला. त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी भात, आंबा, केळी, ज्यूट इत्यादी महत्त्वाच्या पिकांचे आणि अन्य फळांविषयी बहुमोल संशोधन केले.

    डॉ. आघारकर १९४६ मध्ये कोलकाता विद्यापीठाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होऊन मुंबईला आले. त्यांनी येथील वनस्पतिशास्त्र विभागात पदव्युत्तर अध्यापनामध्ये सहभागी व्हायचे ठरवले आणि त्यानुसार अध्यापन सुरूही केले. संशोधनातील सहभाग हा ओघाने आलाच. पुणे विद्यापीठ स्थापन होण्याआधी पुण्यातील विद्वज्जनांनी तेथे एक सक्षम संशोधन संस्था निर्माण करण्याचे निश्चित करून १९४४ च्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र सायन्स इन्स्टिट्यूट नामक संस्था स्थापन केली. ही संस्था स्वत:च्या पायावर स्थिर होऊन भरभराटीस यावी; या हेतूने ती व्यवस्थापन आणि संशोधन यात निष्णात असलेल्या डॉ. आघारकर यांच्याकडे सोपवण्यात आली. संस्थेचे संचालक या नात्याने प्रथम मुंबईतून आणि नंतर पुण्यात राहून ते काम पाहू लागले. त्यांना साहाय्य करण्यासाठी प्रथमत: प्राध्यापक एस.एल. आजरेकर आणि एन.व्ही. जोशी यांच्यासारखे सबल सहकारी मिळाले.

    संस्था स्थिरावली व कालांतराने डॉ. आघारकर यांना विविध विज्ञान शाखांतील कुशल संशोधक मिळत गेले आणि संस्था नव्याने महाराष्ट्र असोसिएशन फॉर दि कल्टिव्हेशन ऑफ सायन्स तथा विज्ञानवर्धिनी, महाराष्ट्र या नावाने नावारूपास आली. डॉ. आघारकर यांच्या १४ वर्षांच्या संचालकपदाच्या कार्यकालात अगणित अडचणींना तोंड देत संस्थेने दहा प्रकल्प हाती घेतले आणि पूर्णत्वास नेले व १० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली. डॉ. आघारकर यांचे १३० पेक्षा अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

डॉ. पुरुषोत्तम विष्णू जोशी

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].