आजगावकर, श्रीधर शांताराम
डॉ. श्रीधर शांताराम आजगावकर यांचा जन्म, तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवणमध्ये झाले. इंटर सायन्सपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत व वैद्यकीय शिक्षण पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झाले. त्यांनी उच्च वैद्यकीय शिक्षण डब्लिन व विएन्ना येथे घेतले. त्यांनी ‘डोळ्यांचे विकार’ या विषयात प्रावीण्य मिळविले. त्यानंतर मालवणला येऊन त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. पण ढोबळ व्यवसायापेक्षा वाचन व संशोधन यांत त्यांना विशेष रस वाटे. मालवणला १५ वर्षे व्यवसाय करत असताना, त्या काळात त्यांचे काका व वडील मधुमेहाने वारले. त्या वेळी भारतात मधुमेहाविषयी खास माहिती नव्हती. रुग्णही फार कमी होते. त्यामुळे आजच्यासारखे खास मधुमेहतज्ज्ञही नव्हते. आपले काका व वडील मधुमेहाने वारल्यामुळे डॉ.आजगावकरांना मधुमेहाविषयी कुतूहल वाटले व नंतर जिद्दीने त्या रोगावर काम करण्यासाठी ते मुंबईत आले.
मुंबईत आल्यावर ते ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयामधील वैद्यकशास्त्राचे तज्ज्ञ डॉ.रा.वि. साठे यांना भेटले. डॉ.साठेंमध्ये त्यांना गुरू भेटला. डॉ.साठेंनी त्यांना सांगितले, ‘‘पश्चिम महाराष्ट्रात मला आता मधुमेही दिसू लागले आहेत. पण त्यांच्यावर उपचार करायला कोणी डॉक्टर नाहीत. तुम्ही नेत्रविशारद म्हणून काम न करता, मधुमेहावर लक्ष केंद्रित करा. चाचण्या, उपचार शोधून काढा.’’ १९४५ साली आजगावकरांनी नेत्रविकारतज्ज्ञ म्हणून करत असलेला व्यवसाय थांबवला आणि मधुमेहावर काम सुरू केले. त्या काळी अशी ध्येयाने प्रेरित झालेली खूप माणसे असायची. डोळ्याचे मर्यादित क्षेत्र सोडून मधुमेहासारखे विशाल क्षेत्र संशोधनाला मिळाले म्हणून डॉ.आजगावकर खूप समाधानी होते. संशोधन चालू असताना त्यांच्या लक्षात आले, की दृक्पटलावर (रेटायना) काही बदल दिसून आले होते, ते रुग्णाला झालेल्या मधुमेहामुळे असावेत. जसे वाचन व संशोधन वाढले, तसे त्यांच्या लक्षात आले की मधुमेह हा सर्व शरीरव्यापी रोग आहे. त्याचा शरीरावर होणारा प्रसार वेळीच नियंत्रित केला पाहिजे. त्यासाठी ते आयुर्वेदाकडे वळले. आयुर्वेदाने मधुमेहाबद्दल काय विचार केला आहे, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. आयुर्वेदातील जसद भस्माच्या उपचारपद्धतीचा डॉक्टरांनी अॅलोपथीच्या पद्धतीने अभ्यास सुरू केला. हे सर्व प्रयोग त्यांनी डॉ.साठेंच्या मार्गदर्शनाखाली जे.जे. रुग्णालयात केले. १९४५ ते १९६० या कालावधीत डॉ.आजगावकर सातत्याने मधुमेहावर काम करत होते. १९४८ साली प्रायोगिक पद्धतीवर त्यांनी स्वत:चे केंद्र सुरू केले. १९६० साली जे.जे. रुग्णालयात मधुमेह उपचाराचे केंद्र सुरू झाले. डॉ.आजगावकरांनी डॉ.साठेंचे स्वप्न पुरे केले. या केंद्रामुळे मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर्स तयार झाले. डॉ.आजगावकरांच्या संशोधनास १९६० साली ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने मान्यता दिली.
आजगावकरांचे कार्य ‘रोग्यांवर फक्त उपचार करणे’ एवढ्यापुरते मर्यादित नव्हते. त्या काळी सामान्य लोकांना मधुमेहाविषयी काहीच माहिती नव्हती. लोकांना मधुमेहाची सबंध माहिती देऊन सज्ञान करणे आवश्यक होते. ते काम त्यांनी हातात घेतले. मधुमेहाची लक्षणे कोणती, त्याचे निदान पक्के करण्यासाठी काय चाचण्या करायच्या, औषधे कोणती व कधी घ्यायची, आहारावरील पथ्ये काय असावीत, व्यायाम कसा, केव्हा व किती करायचा, ही सर्व माहिती त्यांनी भाषणरुपात देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मुंबई आणि नंतर सबंध भारतात फिरुन ते भाषणे देत असत. त्यासाठी त्यांनी स्लाइड्स केल्या होत्या व स्वत:चा स्लाइड प्रोजेक्टर बरोबर घेऊन जात असत. भाषणे मराठी व इंग्रजीतून असत. विशेषत: वैद्यकीय महाविद्यालये, इंडियन मेडिकल कौन्सिल व सामाजिक संस्था यांमध्ये जाऊन त्या काळी नवीन असणाऱ्या या रोगाविषयी माहिती देणे त्यांना फार आवडे. जणू या प्रेषणकार्याचे त्यांनी व्रतच घेतले होते. या कार्यात मानधनाची अपेक्षा न करता, त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते.
त्यांनी तज्ज्ञांसाठी चर्चासत्रे आयोजित केली. या कार्याची व्याप्ती वाढल्यावर त्यांनी ‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीझ’ची स्थापना केली. या संस्थेत त्यांनी कार्यवाह, उपाध्यक्ष, अध्यक्ष अशा निरनिराळ्या पदांवर काम केले. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांत या संस्थेच्या ३२ शाखा काढल्या.
आजगावकरांनी मधुमेहावर मराठी व इंग्रजीत पुस्तके लिहिली. या पुस्तकांना पाठ्यपुस्तकांचे महत्त्व प्राप्त झाले. डॉक्टरांनी पुढाकार घेऊन मुंबईतील माहीम येथे खास मधुमेहींसाठी २०० खाटांचे अद्ययावत रहेजा रुग्णालय काढले.
‘आंतरराष्ट्रीय मधुमेह संस्थे’च्या कार्यकारिणीचे ते १९६४ सालापासून सभासद होते. त्यानंतरच्या २६ वर्षांमधील सर्व वार्षिक परिषदांना त्यांची उपस्थिती होती. त्यांच्या प्रयत्नाने १९७६ साली दिल्लीत आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद भरली होती. त्या परिषदेत आंतरराष्ट्रीय संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली व पुढे १९७९ साली अध्यक्ष म्हणूनही निवड झाली.
मराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेपासून (१९६६) ते परिषदेशी निगडित होते. कार्यकारिणी सभासदापासून विश्वस्त व सन्माननीय सदस्य अशी वेगवेगळी पदे त्यांनी भूषविली.
१९५२ साली आजगावकरांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी मधुमेहाच्या संस्था, ‘मराठी विज्ञान परिषद’, ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ इत्यादी संस्थांसाठी आयुष्य वेचले.