Skip to main content
x

आनंदगडकर, भगवान महाराज

वारकरी संप्रदायाच्या बंधुभाव प्रस्थापनेच्या कार्यात गेल्या ५० वर्षांपासून अखंड योगदान देणारे आणि उपेक्षित-पीडित-दु:खितांविषयी ममतायुक्त कळकळ, -शाश्वत सत्याचा सहजसोपा सामान्यांतील सामान्य माणसाला उमजेल-समजेल-रुचेल असा अन्वयार्थ  सांगणारा, भक्तास त्या मार्गावर चालण्यास सहज उद्युक्त करणारा कर्मयोगी संत म्हणजे ह.भ.प. श्री भगवान महाराज आनंदगडकर! बाबांचा जन्म मार्गशीर्ष वद्य एकादशीस, जालना जिल्ह्यातील पीर पिंपळगाव येथे झाला. भगवानबाबांचे कार्य हे सुमारे १९६५ साली सुरू झाले. शालेय वयापासूनच बाबांनी प्रवचन, कीर्तन करायला सुरुवात केली होती.

शिक्षण झाल्यानंतर जंगल खात्यात नोकरी केली, जालन्यात सेवादलात नोकरी केली. तलाठी पदासाठी आणि सैन्यामध्ये रुजू होण्याचे पत्र मिळाले असतानाही ती नोकरी स्वीकारली नाही. घरात लग्नाचा विषय निघाल्यानंतर संसारी मायाजाळात न अडकता गृहत्याग करून रामटेक व नंतर पैठणला जाणे केले.

पैठणच्या नाथ मंदिरात त्यांनी सलग तीन दिवस एकनाथी भागवताचे पारायण केले. त्यांची ह.भ.प.श्री भारदे महाराजांशी भेट झाली. विदर्भात श्री बाबा आमटे यांच्या सोबतही त्यांनी काम केले. श्रीक्षेत्र आळंदीस श्रीकिशन साखरे महाराज यांच्याकडे जाऊन दीक्षेसाठी विनंती केली. त्यांनी पंढरपूर येथील ह.भ.प. श्री धारूरकर शास्त्री यांच्याकडे पाठवल्यावर त्यांच्याकडून बाबांनी वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली. श्रीगुरूंच्या प्रेरणेने तिथेच अभ्यास केला. जालना जिल्ह्यातील न्हावाशेवा येथील मठ ह.भ.प.श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांनी स्थापन केला आहे. भगवानबाबा या मठाचे मठाधिपती झाले. या संस्थानाच्या भौतिक कार्यकलापात शुद्ध वारकरी परंपरेला शोभणार नाहीत असे काही घटना-प्रसंग झाले. भगवानबाबा आनंदगडकरांनी ‘सोने रुपे आम्हां मृत्तिकेसमान’ या संतवचनाप्रमाणे न्हावाशेवा संस्थान तत्काळ सोडले. जालना शहरापासून दहा कि.मी. अंतरावर असलेल्या जांबवाडी गावाजवळ माळरानात, देऊळगाव राजा रोडवर बाबांनी वस्ती केली.

सर्वत्र आनंदाचे तरंग पसरविणारी जगन्माता भवानी श्री आनंदेश्वरी मातेचे मंदिर या माळरानावर त्यांनी १३ एप्रिल १९९५ रोजी निर्माण केले. गोंदेगाव शिवार हा माळ तसा पूर्वी दरोडे आणि लूटमारीसाठी कुप्रसिद्ध!  अशा ‘रुखल्या-सुखल्या भूमीवरती, सद्भावाने करुनी वस्ती, संस्काराचे जल शिम्पूनिया सोन मळे पिकवीन’ या उक्तीप्रमाणे बाबांनी आपल्या पुण्यपावन वास्तव्याने या ओसाड माळरानावर आनंददायी वारकरी परंपरेला पुष्ट करणारा आनंदगड वसवला आहे. आनंदाचा सोनमळा पिकविला आहे. याच वडार वस्तीतील बांधव त्यांच्या पूर्वसुकृत पुण्याईमुळे श्री भगवानबाबांचे भक्त झाले. माळकरी, टाळकरी, वारकरी झाले. चोर्‍या सुटल्या, दारू सुटली, दरोडे-खून सुटले. ह.भ.प. श्री भगवानबाबांनी आनंदगडाच्या पायऱ्यांचे दगड या वडार बांधवांसोबत त्यांच्याच फडक्यात बांधून आणलेली मीठभाकर खाऊन घडवले, घाम गाळला. भगवानबाबांना वडार भाषा उत्तम येते. या भक्तमंडळींमध्ये श्री तुळशीराम अण्णा आहेत. त्यांनी बाबांच्या प्रेरणेने वडार (तेलुगू) भाषेत अभंग रचलेले आहेत. त्यांना ते पाठ आहेत. ते त्या अभंगांचे मराठीत निरूपणही करतात. कुठलेही लौकिक शिक्षण त्यांनी घेतलेले नाही हे इथे उल्लेखनीय होय.

एकदा काही संतमंडळी गडावर वस्तीला होती. त्यांत काही जण उत्तर भारतीय होते. जेवणाची वेळ झाली. दुरड्या टोपल्यांत जेवण घेऊन या वडार माता गडावर आल्या. त्यांतील काही जणांनी हे जेवण घेणार नाही अशी भूमिका घेतली. बाबांनी त्यांना समजावले. ते म्हणाले, ‘‘महाराज जी, रोटी आपको जवार या बाजरा की ग्रहण करनी है, रोटी वडार की नहीं बनती जो खा नहीं रहे हो!’’ तेव्हा चूक त्यांच्या लक्षात आली.

आनंदगडावर श्री आनंदेश्वरी माता, श्रीगणेश, श्रीमहादेव, श्रीहनुमान, श्रीशबरी माता यांची मंदिरे आहेत. भक्तजनांचा अखंड प्रवाह या गडावर अखंडपणे वाहत असतो. भक्तिमार्गाला कर्ममार्गाची जोड देऊन धर्म पुनर्स्थापनेचा मार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय. भगवान महाराजांनी हा प्रवाह पुष्ट करण्याचा, समृद्ध करण्याचा उत्तम आदर्श प्रस्तुत केला आहे. हा कर्मयोगी भक्तिमार्ग पुष्ट होण्यासाठी काही महत्त्वाचे उपक्रम झालेले आहेत.

बाबांनी बारा गावांच्या एकादशी मंडळांचे संघटन घडवून आणले. जालना परिसरात बारा महादेव मंदिरांची स्थापना करण्यात आली. ह.भ.प. श्री भगवान महाराज भक्त मित्र मंडळाद्वारे ‘समता-ममता-समरसता मेळावा’ १७ सप्टेंबर १९९६ रोजी भरविण्यात आला.

‘ज्ञानामृत मिशन’ हे (जय हरी रुग्णालय, जालना) अन्य विविध सेवाकार्ये व विविध उपक्रम चालविण्यासाठी निर्मिलेले एक व्यासपीठ आहे. त्याचप्रमाणे, ‘संतानुग्रह’ हे मासिक, चैतन्य साधना शिबिर (अखंड मौन आणि आत्मचिंतनयुक्त ईश्वर सान्निध्य साधना), अखंड हरिनाम सप्ताह व या सप्ताहादरम्यान भव्य रोगनिदान शिबिर, महिला उद्योजिका प्रशिक्षण शिबिर आदी उपक्रमही आहेत.

रंगपंचमीस श्री क्षेत्र आनंदगड जालना येथे उर्दू मुशायरा आणि हिंदी कवी संमेलन आयोजित केले जाते. संत श्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज पुण्यतिथी दिनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराला पोहोचणारी समरसतेची वारी आनंदगडावरून प्रस्थान करून श्री क्षेत्र संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथांच्या समाधी स्थळी, पौष वद्य एकादशीस पोहोचते. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारी/दिंडी निघते. कार्तिक अमावास्येस जालन्यापासून निघून लोणी ता. जि. वाशीम येथे पोहोचणारी ह.भ.प. श्री सखाराम महाराज लोणीकर दिंडी आहे.

पंढरपूर येथे टेंभूर्णी रस्त्यावर चंद्रभागेतिरी श्री दत्तधाम मंदिराची स्थापना २०१३ साली करण्यात आली. १५ ऑगस्ट रोजी आनंदगडावर गुरुपौर्णिमा उत्सव असतो. देऊळगावराजा येथील ह.भ.प. श्री भगवानबाबांचे भक्त श्री मालोजीराव यांच्या नेतृत्वात दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी वारी निघते. हा दिवस म्हणजे शक्य असेल तेवढा अश्लीलतेचा उच्चार आणि बेधुंद वागण्याचा जणू परवानाच घेऊन आलेला असतो. अशा दिवशी मुखात अखंड हरिनाम, पवित्र वीणा, टाळ - मृदंगाच्या गजरात श्री आनंदेश्वरी मातेचा आणि भगवानबाबांचा जयजयकार करीत ही भक्तमंडळी देऊळगावातून पायी आनंदगडावर पोहोचतात. गावातील मातंग बांधव आणि अन्य भक्तमंडळी मोठ्या संख्येने सहभागी होतात. गडावर प्रबोधनात्मक प्रवचन, भाषणे व भगवानबाबांचे आशीर्वादपर बोलणे होते. मातंग शौर्य परंपरा, या समाजाचे मोठे सामाजिक योगदान या सर्वांवर प्रकाश टाकला जातो.

आपल्याच हाडा-मांसाचे, परमेश्वराचा अंशच नव्हे, तर प्रत्यक्ष भगवंतच असलेले हे समाज-बांधव आहेत, त्यांना प्रेम, बंधुभावाची वागणूक दिली पाहिजे हे भगवानबाबांचे उद्गार उराशी कवटाळत हे मातंग बांधव ही रंगपंचमी खऱ्या अर्थाने परमेश्वर सान्निध्यात साजरी करतात. आपलेच सहोदर प्रेमापासून वंचित राहिल्यामुळे अन्य धर्मांकडे वळतात. त्यांचे रक्षण, त्यांना प्रेम, आपुलकी देणे, सन्मान देणे याचा वस्तुपाठ आनंदगड सातत्याने देत असतो. भटक्या-विमुक्त समाजाचा मेळावा, संत संमेलन, धर्माचार्य सभा, एक ना अनेक उपक्रम श्री आनंदगडावर सातत्याने सुरू असतात. विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे ह.भ.प. श्री भगवानबाबा सदस्य आहेत.

डॉ. दिवाकर कुलकर्णी

संदर्भ :

१. डॉ. चौधरी, श्रीराम; ‘समता, ममता, समरसता’.   

२. ‘संतानुग्रह’ मासिक.

आनंदगडकर, भगवान महाराज