Skip to main content
x

अन्वीकर, कुमार गोविंद

            रंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात अन्वी हे एक खेडेगाव आहे. गावाची भौगोलिक स्थिती शेतीस फारशी अनुकूल नाही. अपुरा पाऊस, खडकाळ जमीन व पाण्याचे दुर्भिक्ष अशा प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत अन्वीकर कुटुंबीयांनी उत्साहाने शेतीत प्रयोग करून शेती संपन्न केली आहे. 

            अन्वीकर कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजे कौटुंबिक ऐक्य. त्यामुळे जमिनीचे तुकडे झाले नाहीत व आधुनिक शेतीचे अनेक प्रयोग करता आले. पुढच्या पिढीतील माणिकराव तथा दादासाहेब, प्रभाकरराव तथा बापूसाहेब, जगन्नाथ तथा भाऊसाहेब व कुमार अन्वीकर या सर्वांनी एकत्र राहून शेतीत प्रगती केली.

            सदाशिवराव आणि गोविंदराव यांनी ८० वर्षांपूर्वी बागाईत शेतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी गावाच्या शेजारून वाहणार्‍या खेळणा नदीवर शेतीला पाणी देण्यासाठी बंधारा बांधला व तेथून शेतीला पाणी देण्यासाठी ऐंशी अश्वशक्तीचे इंजिन बसवले आणि पाइपलाइनद्वारे शेतात पाणी आणले. त्या काळात एवढे मोठे इंजिन भारतात तयार होत नव्हते; म्हणून त्यांनी ते जर्मनीहून आणले. या प्रकल्पाद्वारे त्यांच्या दोनशे एकर जमिनीला पाणीपुरवठ्याची शाश्‍वती मिळाली.

            सदाशिवराव व गोविंदराव यांनी घातलेल्या प्रगत व संपन्न शेतीच्या पायावर त्यांची मुले दादासाहेब व कुमार अन्वीकर यांनी हरितक्रांतीची भव्य इमारत उभारली. खेळणा नदीवरील बंधार्‍याद्वारे आणलेल्या पाण्यामुळे ऊसशेती किफायतशीर झाली. त्यामुळे आसपासचे शेतकरीही प्रभावित झाले व ऊसशेती लोकप्रिय झाली. त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, मका, डाळी, कापूस, ऊस, द्राक्षे अशा पिकांचे नवे वाण विकसित करून त्यांनी उत्पादनात प्रचंड वाढ करण्यात यश मिळवले. विशेषतः संकरित बियांची निर्मिती करण्यात त्यांनी मोठे यश मिळवले.

            आपण मिळवलेले हे यश स्वतःपुरते मर्यादित न ठेवता कुमारकाकांनी ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बारवाले, जवाहर गांधी, कागलीवाल,  लक्ष्मणराव साळुंके अशा उत्साही व कर्तबगार सहकार्‍यांबरोबर सुधारित व संकरित वाण तयार करणे व त्याचे लोकांना वितरण करणे यासाठी सुरुवातीला महिको व नंतर नाथ सिडस् या संस्थांची उभारणी केली. दादासाहेब यांनी 'भारत कृषक समाज' या संस्थेचा भार उचलला व त्या वेळचे कृषी क्षेत्रात काम करणारे दिग्गज बलराम जाखड व पंजाबराव देशमुख यांच्या साहाय्याने कृषी चळवळ देशातील कानाकोपर्‍यात पोहोचवली. त्यांच्या या चळवळीत कुमारकाकाही मनोभावे सहभागी झाले व त्यानिमित्ताने देशभर फिरले व त्यांनी शेतीप्रश्‍न समजून घेतले.

            अन्वीकर कुटुंब नुसते शेतकरी नव्हते. त्यांना लेखन, वाचन, व्याख्यान, साहित्य यातही रस होता. महाराष्ट्रातील भारत कृषक समाजाचे मुख्य केंद्र जळगावला उभारण्यात आले. त्यानिमित्ताने तेथे शेतकर्‍यांचा मोठा मेळावा व कविसंमेलन आयोजित केले होते. दादासाहेबांचे निधन झाल्यावर त्यांच्या नावाने वाचनालय सुरू झाले. हे त्यांच्या साहित्य, कला, संस्कृतीविषयीच्या अपार प्रेमाचे व श्रद्धेचे द्योतक होय. अन्वी, उंडणगाव, बुलढाणा, यवतमाळ, कारंजा, नागपूर, नगर, पुणे येथे शेतीतील उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवावेत; म्हणून कुमार अन्वीकर हे साहित्यिकांबरोबर फिरले, त्यात पळसखेडा येथील शेतकरी व श्रेष्ठ कवी ना.धों. महानोर हेदेखील होते.

            ना.धों. महानोर लिहितात, “मी शून्यातून शेती वाढवत गेलो. अडखळलो, कधी दुष्काळात पार बुडालो, उद्ध्वस्त झालो. माझ्या केळी, मोसंबी फळबागा नष्ट झाल्या; पण कुमारकाकांनी कधी नामोहरम होऊ दिलं नाही. ‘फक्त लढ’ हाच शेतीत व साहित्यातही मंत्र दिला.” दादासाहेबांनी शेतीत अनेक प्रयोग केले. विशेषतः अन्वीसारख्या लहानशा खेड्यात त्यांनी पन्नास वर्षांपूर्वीही द्राक्षबागा विकसित केल्या.

            औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अन्वी या लहानशा खेड्यातील एका सुशिक्षित, सुसंस्कृत कुटुंबात कुमार अन्वीकर यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण अन्वी, औरंगाबाद व पुणे येथे झाले. ते १९५५मध्ये पुणे विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.

            कुमारकाकांचे शेतीविषयक ज्ञान अगाध होते. शेतीवर होणारा खर्च व त्याचे उत्पादन याचे गणित पक्के होते. ते शेती हौस वा छंद म्हणून करत नव्हते, तर त्याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून ते पाहत. पेरणीच्या वेळेस जमिनीत किती ओलावा हवा, तापमान किती हवे हे ठरवून दिले होते. शेतकरी गव्हाचे उत्पादन किती होईल हे ढोबळमानाने ठरवे, पण कुमारकाका एकरात गव्हाच्या किती ओळी व एका ओळीत किती झाडे व एका लोंबीत किती दाणे याची मोजदाद करत व मग त्यांनी केलेला अंदाज अधिक शास्त्रशुद्ध व बरोबर असे.

            सिल्लोड तालुका हा कमी पावसाचा प्रदेश, पण पाणलोट क्षेत्र विकासाद्वारे अन्वीकरांनी शेतीसाठी पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली. पाऊसमान कमी झाल्यामुळे द्राक्ष, ऊस यासारखी जास्त पाणी लागणारी पिके घेणे अव्यवहार्य ठरू लागले. अन्वी एके काळी द्राक्ष उत्पादनात अग्रेसर होते. परंतु पाण्याअभावी द्राक्षबागा तोडाव्या लागल्या. बागायती क्षेत्र कमी झाले व गावाचे बागायती रूप जाऊन कोरडवाहू रूप आले. त्यामुळे त्यांनी कमी पावसावर येणारी पिके विकसित केली व त्यांचा प्रसार केला. सूर्यफूल, मका, सोयाबीन यांसारखी पिके लोकप्रिय झाली. निसर्गावर मात करण्यात अन्वीकर यशस्वी झाले. महाराष्ट्राला अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण करण्यात कुमारकाकांचा सहभाग मोठा होता. म्हणूनच शासनाने त्यांना ‘कृषिभूषण’ हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन अनेकांनी आपल्या शेतीत आमूलाग्र सुधारणा केली. नांदेड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर डोईफोडे या संदर्भात लिहितात, “कुमारकाकांशी संबंध जुळल्यावर आमची शेती आधुनिक करण्याची आम्हास स्फूर्ती मिळाली. संकरित मका, संकरित ज्वारी, एच ४ कापूस, सोनोरा ६४ गहू आम्ही नांदेड जिल्ह्यात सर्वप्रथम लावला व जिल्ह्यात संकरित लागवडीची मोहीम हाती घेतली.”

            शेतीची मशागत, पीक निवड, बी-बियाण्यांचे सुधारित वाण-विशेषतः संकरित वाण विकसित करणे, त्याचे उत्पादन करणे, नवी कीटकनाशके विकसित करणे व वापरून पाहणे आणि या सर्वांचा प्रसार करणे हे महत्त्वाचे कार्य कुमार अन्वीकर यांनी केले. नव्या बियाण्यांचा त्यांनी देशभर प्रसार केला. हे उद्देश साध्य करण्यासाठी त्यांनी अनेक संस्था उभारल्या व त्यांचे व्यवस्थापन पाहिले. 'महिको' व 'नाथ सीडस्' ही त्यांच्या उद्योजकतेची उदाहरणे होत. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा सर्वांना फायदा व्हावा; या उद्देशाने महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांनी कुमारकाकांना अनेक समित्या व कार्यक्रमांत सहभागी करून घेतले. १९७२मध्ये त्यांना भारत सरकारने शेतीमाल किंमत निर्धारण समितीचे सभासद म्हणून आमंत्रित केेले. महाराष्ट्र राज्य पातळीवर काम करणार्‍या महाराष्ट्र कृषक समाजाचे ते उपाध्यक्ष म्हणून तीन वेळा (१९८१-१९९२) बिनविरोध निवडून आले. त्याचप्रमाणे देशपातळीवर काम करणार्‍या भारत कृषक समाजाचे ते सभासद होते. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांचे मूल्यमापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९९१मध्ये समिती नेमली होती. त्याचे कुमारकाका एक सभासद होते. त्यांचा शेतीतील प्रत्यक्ष अनुभव, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव, यामुळे त्यांचा सल्ला समितीला अत्यंत उपयोगी पडला. जालना येथील ‘वॉर ऑन वॉन्ट’ व औरंगाबाद येथील शेतकी साहाय्य मंडळ या संस्थांचे ते आजीव सभासद होते. भारत सरकारच्या पुणे येथील आकाशवाणी केंद्राच्या सल्लागार समितीचे ते १९६५ ते १९६८ या काळात सभासद होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आकाशवाणीमार्फत शेतकर्‍यांसाठी विविध कार्यक्रम राबवले जात असत. आधुनिक शेतीत यंत्रांचा वापर अनिवार्य आहे याची जाण कुमारकाकांना होती आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ट्रॅक्टरचे उत्पादक फर्गसन यांनी प्रचलित केलेल्या ‘फर्गसन फार्म मॅनेजमेंट सिस्टीम’चा प्रचार केल्यामुळेच औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात जास्त ट्रॅक्टर्स सिल्लोड तालुक्यात होते. आधुनिक काळात शेतीत प्रगती करायची असेल तर एकट्याने प्रयत्न करून चालत नाही. सामुदायिक प्रयत्नांची नितांत गरज असते, हे कुमारकाकांनी जाणले होते. त्यामुळेच त्यांच्या अन्वीत त्यांनी बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे कार्य मन लावून, सर्वशक्तिनिशी केले. अन्वी येथील सहकारी सोसायटीचे १९८१ ते १९९२ अशी अकरा वर्षे ते अध्यक्ष होते.

            बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यावर बँका लोकाभिमुख झाल्या. भूतकाळातील परंपरा सोडून बँका शेतीला आर्थिक मदत करू लागल्या. राष्ट्रीयीकृत बँकांना सल्ला देण्यासाठी शेतीतज्ज्ञांची गरज भासू लागली. कुमारकाकांचे शेतीतील कार्य जाणून भारत सरकारने त्यांना स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकेच्या संचालक मंडळावर नेमले. त्यांनी १९७७ ते १९८३ या काळात बँकेसाठी अनमोल कार्य केले. कुमारकाका हे एक ज्ञानयोगी होते. त्यांचा अनुभवही सखोल व विस्तृत होता. शेती, ग्रामीण विकास व संशोधन या क्षेत्रांतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना 'वसंतराव नाईक पुरस्कार' देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

            कुमारकाकांचे कृषीविषयक ज्ञान व अनुभव महाराष्ट्र व भारतापुरते मर्यादित नव्हते. भारताबाहेरील प्रगत देशातील प्रश्‍नांची व प्रगतीची माहिती व्हावी, या उद्देशाने त्यांनी अमेरिका, इंग्लंड, जर्मनी व रशिया या प्रगत देशांना भेटी दिल्या. या भेटींतून मिळालेल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून त्यांनी बी-बियाण्यांचे उत्पादन व वितरण करणार्‍या ‘नाथ सीड्स’ या अग्रगण्य कंपनीच्या स्थापनेत भाग घेतला. त्या कंपनीचे एक कार्यक्षम व उत्साही संचालक म्हणून त्यांनी कार्य केले.

            कुमारकाकांजवळ हिंदी-मराठी गाण्यांचा बहुमोल संग्रह होता. क्रिकेट व अन्य खेळांची त्यांना आवड होती. उर्दू शायरी, गझल, नाट्यसंगीत याची त्यांना जाण व आवड होती. औरंगाबाद येथे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

- डॉ. नीळकंठ गंगाधर बापट

अन्वीकर, कुमार गोविंद