Skip to main content
x

आफळे, गोविंदस्वामी

कृष्णा नदीच्या काठावर, साताऱ्याजवळील माहुली येथे गोविंदस्वामी आफळे यांचा जन्म झाला. मातु:श्री चिमुताई या रामशास्त्री प्रभुण्यांच्या घरातल्या असून त्या कर्तव्यनिष्ठ, कडक शिस्तीच्या आणि नीतिमान होत्या. श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधी मंदिरात दासनवमीच्या कीर्तनाचा मान आफळे घराण्याला लाभला होता. साडेतीनशे वर्षांची कीर्तन परंपरा लाभलेल्या घराण्यात गोविंदस्वामींचा जन्म माघ वद्य नवमीला (दासनवमी) झाला.

गोविंदा लहान वयापासून अतिशय हुशार, तरतरीत आणि दांडगोबा होता. गावातच त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. त्याच्या बालपणीच वडील निवर्तल्यामुळे त्यास शिक्षणासाठी सातारा, नंतर पुणे येथे जावे लागले. उपजीविकेसाठी त्याने विविध कामे केली. अपार कष्ट केले. माधुकरी मागितली, वार लावले, लोकांच्या घरी पडतील ती कामे केली. गाऊन-नाचून सण गाजवले, कुस्ती खेळले, नाटकांत कामे केली, पोवाडे रचून डफ- तुणतुण्यासह उत्सवात गायन केले.

प्रथम त्यांची शाहीर म्हणून प्रसिद्धी झाली. त्यांनी अकरा सिनेमांतूनही छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. अतिशय परिश्रम करून शिक्षण घेत ते एम.., एल.एल.बी. झाले. मात्र, आईने त्यांच्या हातात चिपळी देऊन, ‘‘कीर्तन कर,’’ ही आज्ञा दिली. ‘‘आई अगं, कीर्तनकाराची परिस्थिती फार वाईट असते. कोणी येत नाही हल्ली कीर्तनाला.’’

या तक्रारीवर आईने सांगितले, ‘‘आपल्या घराण्याला कीर्तनासाठी माहुली आणि आसपासच्या आठ गावांची जहागीर मिळाली आहे. सज्जनगडावर रामदास स्वामींच्या समाधीला नवस करून मी तुला मागितला तो सिनेमात नाचायला नव्हे, तुला कीर्तनच करायला हवं, काही कमी पडणार नाही. नभी जैसी तारांगणे । तैसे लोक ॥ तुझ्या कीर्तनाला येतील.’’ आईचा आशीर्वाद खरा ठरला.

गोविंदस्वामींचे कीर्तन केवळ श्रवणीयच नव्हे, तर बघण्यासारखे असे. त्यांचे कीर्तन म्हणजे एकपात्री अभिनयाचा उत्तम आविष्कार होता. पहाडी व्यक्तिमत्त्व, खणखणीत आवाज, नाट्यपूर्ण कथनशैली, भावमधुर गायन, राजकारणावर मार्मिक टीका-टिप्पणी, परखड सुस्पष्ट विचार, खळाळून हसवणारा विनोद, विविध विषयांचा परिपूर्ण अभ्यास, नितांत राष्ट्रप्रेम, क्रांतिकारकांवर अपार निष्ठा अशा असंख्य वैशिष्ट्यांनी त्यांचे कीर्तन गाजत असे. भारतीय इतिहास पुरुष, वीर स्त्रिया यांची आख्याने, आजकालच्या परिस्थितीपर्यंतचे सर्व विषय ते समर्थपणे हाताळीत.

पुण्याच्या हरिकीर्तनोत्तेजक सभेने आयोजित केलेल्या कीर्तन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गोविंदस्वामींनी एकूण कीर्तन क्षेत्रातच प्रथम क्रमांकाची मान्यता मिळवली. ४० वर्षांत २५,०००हून जास्त कीर्तने त्यांनी गाजवली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे तर त्यांचे जणू कुलदैवत होते. त्यांच्या राष्ट्रीय विचारांचा मोठ्या धडाडीने ते प्रसार करीत. स्वा. सावरकर आणि आचार्य अत्रे यांच्याकडे काही दिवस लेखनिक म्हणूनही  त्यांनी काम केले होते. हिंदुस्थानभर सर्वत्र त्यांनी कीर्तने केली. त्याशिवाय त्यांनी अमेरिकेतही १९८३-८४ च्या सुमारास तीन-तीन महिने दौरा केला. त्यांच्या स्वातंत्र्यनिष्ठा आणि हिंदुत्वनिष्ठा या गुणांमुळे आणि राजकारणातील अपप्रवृत्तींवर केलेल्या परखड, प्रखर टीकेमुळे अनेकदा कीर्तनावर बंदी घालण्यात आली व अटक, खटले यांनाही सामोरे जावे लागले. त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. अनेक सत्कार, पुरस्कार लाभले. एकेका दिवशी दोन-दोन क्वचित पाच-सहा कीर्तनेही त्यांनी केलेली आहेत.

समाजकार्याची, धार्मिक कार्याची त्यांना मोठी आवड होती. त्यांनी जवळजवळ १०० गरीब विद्यार्थी सांभाळले, शिकवले, आपल्या पायांवर उभे राहू शकतील इतके शिक्षण दिले. त्यांनी त्यासाठी व्यास गुरुकुल आणि समर्थ गुरुकुल चालवले. त्यांनी जगातले पहिले नारद मंदिर पुण्यात सदाशिव पेठेत स्वत:च्या पाठीवरून मूर्ती वाहून आणून बांधले. त्यांनी सर्व वर्णांच्या मुलांच्या सार्वजनिक मुंजी ११,२१,५१,१०८ अशा प्रतिवर्षी अल्प खर्चात लावल्या. आपले सर्व सण, वार, उत्सव गुरुकुलातल्या मुलांना घरच्यापेक्षाही जास्त आनंद मिळावा, असे साजरे केले.

कीर्तन जुगलबंदी हा आजकाल लोकप्रिय असलेला कीर्तन-प्रकार सर्वप्रथम गोविंदस्वामींनी रचला आणि आपली पत्नी डॉ. सुधा (पटवर्धन) आफळे आणि एक शिष्या सुधा धामणकर या दोघींकरवी १९७१-७२च्या सुमारास सादर केला. त्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळाला, की त्याचे २५ प्रयोग अल्पावधीत झाले.

गोविंद स्वामी उत्तम कवी होते. कीर्तनात लागणारी काव्ये, आर्या, साकी, दिंडी, राजहंस, पोवाडे, पदे ते अनेकदा स्वत: रचत. त्यांनी जवळजवळ १४०० कीर्तनाची पदे रचली आहेत. शिवाय ओवाळणी’, ‘संसार तरंगअसे त्यांचे दोन स्फुट कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रकार्यावर त्यांनी गीतरामायणाच्या धर्तीवरचे मोठे काव्य सावरकर गाथारचले आणि स्वत: त्या काव्याच्या गायनाचे १००-१२५ प्रयोग केले. त्यांनी अकरा नाटके लिहिली. त्यांपैकी काही नाट्यमंदारने तर काही चारुदत्त रंगभूमीइत्यादींनी रंगमंचांवर आणली.

समर्थ रामदास स्वामी हे त्यांच्या घराण्याचे दैवत होते.

करुणा कीर्तनाच्या लोटे । कथा करावी घडघडाटे ॥

श्रोत्यांची श्रवणपुटे । आनंदे भरावी ॥

या समर्थ वचनाप्रमाणेच त्यांचे कीर्तन आणि आचरण असे. आपले हे सांस्कृतिक राष्ट्रीय विचारधन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे म्हणून त्यांनी १९७७ ते ८६ या काळात कीर्तन महाविद्यालय चालवले.

भारतीय संस्कृतीचा डिंडिम विश्वभर गाजवून अनेक क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी करणारा हा कीर्तनसम्राट वयाच्या बाहत्तराव्या वर्षी किरकोळ आजाराने स्वर्गवासी झाला. देहाने ते या जगातून गेले; पण आपले कार्य आणि विचारधन आपल्या असंख्य शिष्यांना आणि आजचे आघाडीचे राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे आणि सौ. क्रांतिगीता महाबळ या आपल्या अपत्यांना देऊन गेले. त्यांचा व्यायामाचा वारसाही त्यांच्या दोन कन्या रेखा खडकीकर, प्राची मोडक चालवतात. तरुणांनी सशक्त बनावे, सुसंस्कारित व्हावे आणि आपल्या गुणांनी राष्ट्रपूजन करावे हेच त्यांचे जीवनध्येय होते.

- क्रांतिगीता  महाबळे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].