अरविंदकुमार
भारतातील विज्ञान-शिक्षणक्षेत्रात मोलाची कामगिरी करणार्या प्रा. अरविंदकुमार यांचा जन्म दिल्लीला झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीला झाले. १९६९ साली मुंबई विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्र या विषयात पीएच.डी. संपादन केली.
लंडन विद्यापीठात आणि जिनिव्हातील सर्न येथून पोस्ट-डॉक्टरल काम केल्यानंतर, प्रा. अरविंदकुमार भारतात परतले. त्यानंतर १२ वर्षे त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या भौतिकविज्ञान विभागात अध्यापनाचे काम केले. १९८४ साली प्रा. अरविंदकुमार यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.च्या) होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र येथे आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर अल्पावधीतच म्हणजे १९९४ साली त्यांच्यावर होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ३१ ऑक्टोबर २००८ या दिवशी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातून ते ज्येष्ठ प्राध्यापक आणि संचालक म्हणून निवृत्त झाले.
आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात अरविंदकुमार यांनी सैद्धान्तिक भौतिकशास्र या विषयामध्ये संशोधन केले व याच विषयाचे अध्यापनही केले. शिवाय सैद्धान्तिक भौतिकशास्र शाखेतील अनेकविध विषयांवरील पीएच.डी.च्या प्रबंधांना मार्गदर्शन केले; परंतु प्रा. अरविंदकुमार यांनी मुख्यत्वेकरून, विज्ञान-शिक्षणाच्या क्षेत्रात विविध प्रकारचे काम केले. विज्ञान शिक्षणावर संशोधन आणि सुधारणा होण्याच्या दृष्टीने अधिक काम व्हायला हवे, या विचाराला त्यांनी चालना दिली आणि पुढे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात, ‘विज्ञान-शिक्षण’ या विषयावर पीएच.डी.च्या पदवीसाठी काम करण्याची सुविधा उपलब्ध केली गेली. २००५ सालचा राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्याच्या समितीचे ते सदस्य होते. त्या आराखड्यातील विज्ञान शिक्षणाशी संबंधित भागाचे काम करणार्या विशेष गटाचे ते अध्यक्ष होते. अनेक वर्षे त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (एन.सी.ई.आर.टी.) पदार्थविज्ञानाची पुस्तके लिहिण्यातही सहभाग घेतला. त्यांच्या प्रोत्साहनामुळे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातल्या त्यांच्या इतर सहकार्यांनी शालेय विज्ञान शिक्षणाला दिशा देणारा स्वत:चा असा अभ्यासक्रम तयार केला.
विज्ञानाचे उत्कृष्ट विद्यार्थी घडण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरून केल्या जाणार्या अनेक प्रयत्नांमध्ये प्रा. अरविंदकुमार यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्याच दृष्टीने त्यांनी उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्या ‘विज्ञान ऑलिम्पियाड’ या स्पर्धापरीक्षेची, भारतातील युवा पिढीला प्रशिक्षित करण्यासाठी त्यांनी उभी केलेली चळवळ! १९९७ सालापासून त्यांच्या नेतृत्वाखाली होमी भाभा विज्ञान-शिक्षण केंद्रामध्ये देशातले विज्ञान ऑलिम्पियाड प्रशिक्षण केंद्र उभे केले गेले. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि खगोलशास्त्र या विषयांतील ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आणि भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवता यावे, यासाठी होमी भाभा विज्ञान-शिक्षण केंद्रातील तज्ज्ञ, वर्षभर अनेक आव्हानात्मक अशा प्रयोगांचे आणि माहितीचे संकलन आणि अभ्यास करत असतात. २००१ सालच्या तेहेतिसाव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे, २००६ सालच्या अकराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडचे आणि २००८ सालच्या एकोणिसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्राच्या भारतात भरलेल्या ऑलिम्पियाडचे नेतृत्व प्रा. अरविंदकुमार यांनी केले. त्या प्रत्येक वेळी, जगभरातील तज्ज्ञांकडून केंद्राच्या कार्याचे कौतुक केले गेले. तसेच अरविंदकुमार यांनी बंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेतर्फे घेतल्या जाणार्या ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजने’च्या अनेक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला.
प्रा. अरविंदकुमार यांना २००३ साली इंडियन न्यूक्लियर सोसायटीचे विज्ञान प्रसाराचे पारितोषिक प्राप्त झाले. त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या २००६ सालच्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवले. २००६ साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘ज्ञान’ या विभागातला ‘गोदावरी’ पुरस्कार प्राप्त झाला आणि २००८ साली शिक्षण या विषयासंबंधी ‘थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस’चे क्षेत्रीय पारितोषिक मिळाले. विज्ञान आणि गणिताच्या अनेक संकल्पना स्पष्ट करणार्या विविध पुस्तकांचे लेखनही प्रा. अरविंदकुमार यांनी केले आहे. ‘सायन्स - अ ह्यूमन सागा’ या विज्ञानाचा इतिहास सांगणार्या प्रदर्शनाची संकल्पना त्यांनी मांडली आणि ती पूर्णत्वाला नेण्यासाठी मार्गदर्शनही केले.
विज्ञान-शिक्षणाशी संबंधित अनेक उपक्रम त्यांनी योजले आणि यशस्वी केले. भारतातल्या विज्ञान-शिक्षणाला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून दिले.