अथय्या, भानू सत्येंद्र
‘ऑस्कर’ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व मानाचे पारितोषिक मिळवणाऱ्या वेषभूषाकार म्हणून भानू अथय्या विख्यात आहेत. भानू अथय्या यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये असे त्यांचे मूळ नाव होते. त्यांच्या आईचे नाव शांताबाई होते. अण्णासाहेब राजोपाध्ये छत्रपतींचे पुरोहित होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून भानुमतींनी चित्रकलेशी दोस्ती केली. तर त्याच दरम्यान त्यांनी ‘एकादशी महात्म्य’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. भानुमती ९ वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांची चित्रकलेविषयीची आवड पाहून त्यांच्या आईने घरीच चित्रकलेसाठी शिक्षक ठेवले. शालेय शिक्षण संपताच त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. शेवटच्या वर्षी त्यांना सुवर्णपदक मिळाले.
साठच्या दशकात टाईम्स ऑफ इंडियाच्या ‘ईव्हज वीकली’मधील भानू यांची रेखाटने पाहून अभिनेत्री नर्गिस प्रभावित झाल्या. नर्गिस यांच्यामुळेच भानू यांना राज कपूरच्या ‘श्री ४२०’ च्या वेषभूषेचे काम मिळाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. गुरुदत्त यांचा ‘साहिब, बीबी और गुलाम’, देव आनंद यांचा ‘गाईड’, ‘आम्रपाली’, शम्मी कपूर यांचा ‘ब्रम्हचारी’, शाहरूख खान यांचा ‘ओम् शांती ओम्’ इ. हिंदी चित्रपटांतून वेषभूषेचे काम करता करता त्यांना रिचर्ड अॅटेनबरोच्या ‘गांधी’साठी काम करण्याची संधी मिळाली आणि या चित्रपटातील गांधीजींच्या वेषभूषेसाठी ऑस्कर पारितोषिक मिळाले. जोम मोलो यांच्याबरोबर विभागून हे पारितोषिक मिळाले होते. हे पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत. तसेच ‘लगान’, ‘स्वदेश’ यासारख्या चित्रपटांमधील कलाकारांच्या वेषभूषा त्यांनी समर्पकपणे साकारल्या.
भानू यांनी अमोल पालेकरांच्या ‘महर्षी कर्वे’ या मराठी चित्रपटासाठी वेषभूषा केली होती. दाक्षिणात्य वेषभूषाकार सत्येंद्र अथय्या यांच्याशी त्यांनी विवाह केला.
- श्रीराम ताम्हणकर