Skip to main content
x

आवटी, मनोहर प्रल्हाद

       मनोहर प्रल्हाद आवटी यांचा जन्म गुजरात राज्यातील सुरत येथे झाला. त्यांच्या आईचे नाव शांताबाई होते. नगर जिल्ह्यातील त्या वेळच्या राहुरी तालुक्यातील मळुंजे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे पूर्वज नारोपंत रत्नपारखी ह्यांनी राघोबादादांची नदीत हरवलेली वस्तू शोधून परत आणून दिली. त्यांच्या ह्या कामगिरीवर खूश होऊन पेशव्यांनी त्यांना ‘आवटकी’ (शासकीय महसुलाचा अंदाजे एक दशांश भाग) बहाल केली. त्याच आवटकीचे पुढे आवटी ह्या आडनावात रूपांतर झाले.

     आवटी ह्यांचे पूर्वज उच्चशिक्षित, वैभवसंपन्न असून समाजसुधारणेसाठी, विशेषत: स्त्रियांच्या प्रश्नांबाबतीत कार्यरत होते. एफ.आर.सी.एस., एम.आर.सी.पी. पर्यंत शिक्षण घेतलेल्या त्यांच्या आजी श्रीमती द्वारकाबाई केळवकर ह्या सुरतच्या महिलांसाठी असलेल्या तत्कालीन गोषा रुग्णालयाच्या पर्यवेक्षिका होत्या.

     आवटी यांचे शालेय शिक्षण हे १९३५ ते १९४२ ह्या कालावधीत मुंबईतील दादरमधील राजा शिवाजी विद्यालय (तत्कालीन किंग जॉर्ज शाळा) येथे झाले. १९४२मध्ये महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आवटी भावंडांची रवानगी कोल्हापूर येथे झाली. जून १९४२मध्ये त्यांनी कोल्हापूरहून थेट पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील शाळेत (सध्याची विमलाबाई गरवारे प्रशाला) सातवीत प्रवेश घेतला.

     ‘डफरीन’ या प्रशिक्षण जहाजावर शिकणाऱ्या मोठ्या भावाच्या रुबाबाकडे आकर्षित होऊन ऑक्टोेबर १९४२मध्ये त्यांनीही डफरीनची प्रवेश परीक्षा दिली. शिष्यवृत्तीसह उत्तीर्ण झाल्यावर त्यांचे पुढील शिक्षण डफरीनमध्ये पार पडले. सप्टेंबर १९४५मध्ये रॉयल इंडियन नेव्हीच्या परीक्षेत त्यांची सरकारतर्फे पुढील शिक्षणासाठी ब्रिटन येथे रवानगी झाली व मार्च १९५० मध्ये शिक्षण पूर्ण करून ते भारतात परतले.

     स्वातंत्र्यप्राप्तीनंतर रॉयल इंडियन नेव्हीचे ‘भारतीय नौसेने’त रूपांतर झाले. त्या वेळचे राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी २७ मे १९५१ रोजी आपला पहिला ध्वज नौसेनेला मुंबईत बहाल केला.

     आवटी यांनी १९६१ ते १९६४ ह्या कालावधीमध्ये लंडन येथे तत्कालीन उपायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांचे सल्लागार म्हणून काम पाहिले. त्यांनी १९६०मध्ये ‘आय.एन.एस. बेटवा’चे कमांडिंग ऑफिसर म्हणून काम पाहिले. पुढे १९६५-१९६६ मध्ये ‘आय.एन.डी.एस. तीर’ या प्रशिक्षण नौकेचे व १९६६-१९६७ मध्ये सिग्नल स्कूलचे काम त्यांनी पाहिले. वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे मुख्य प्रशिक्षक म्हणून १९६७ ते १९७० मध्ये त्यांनी कार्यभार सांभाळला.

     १९७१मध्ये पाकबरोबरील युद्धात त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय नौसेनेने अतुलनीय कामगिरी बजावली. त्यांनी शत्रुपक्षाची तीन जहाजे ताब्यात घेतली, तसेच एक पाणबुडी उद्ध्वस्त केली. १९७१च्या युद्धामधील युद्धकैद्यांना घेऊन त्यांनी चितगाव ते कलकत्ता असा प्रवास केला. त्यांच्या ह्या कामगिरीबद्दल त्यांना जानेवारी १९७२मध्ये ‘वीरचक्र’ प्रदान करण्यात आले तसेच फलटणजवळ जमीनही देण्यात आली.

     ‘आय.एन.एस. म्हैसूर’चे १९७३-१९७४मध्ये ते कमांडिंग ऑफिसर होते. १९७५मध्ये रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजचे, तर १९७६-१९७७मध्ये राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनी (एन.डी.ए) चे कमांडर म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर १९७९-१९८० दरम्यान नौसेना मुख्यालयात उपप्रमुख, तर १९८० ते १९८३ या काळात ते नौसेनेच्या पश्चिम विभागाचे प्रमुख होते.

     ३१ मार्च १९८३ रोजी ते सेवानिवृत्त झाले. नौदलातील त्यांच्या सेवेबद्दल २६ जानेवारी १९८२ रोजी त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदक’ बहाल करण्यात आले.

     निवृत्तीनंतर त्यांनी तोलानी शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये अध्यक्ष म्हणून नोकरी पत्करली, तसेच ब्लिट्झ प्रकाशनाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम बघितले. भारताच्या सागरी इतिहासाच्या अभ्यासाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि त्याबद्दलची एकंदर अनास्था पाहून त्यांनी १९७८मध्ये ‘मेरिटाइम हिस्टरी सोसायटी ऑफ इंडिया’ची स्थापना केली. याद्वारे सागरी सामरिक इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणे, त्याच्या अभ्यासाकरिता शिष्यवृत्ती देणे व विद्यापीठांमध्ये या विषयाचा समावेश करण्याचा आग्रह धरणे इत्यादी उपक्रम या संस्थेतर्फे केले जातात.

     मराठा आरमाराचे प्रमुख सरदार कान्होजी आंग्रेंच्या अलिबाग येथील स्मारकाच्या कामात त्यांनी या संस्थेचे प्रमुख म्हणून विशेष लक्ष घातले. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून भारतीय नौसेनेचा इतिहास सांगणारे संग्रहालय त्याच परिसरात उभे राहिले आहे. सध्या त्याची देखभाल भारतीय नौसेना करीत आहे. ‘वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर’ या संस्थेच्या महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले .

     मेरिटाइम हिस्टरी सोसायटी ऑफ इंडियातर्फे आत्तापर्यंत सागरी इतिहासाशी संबंधित बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांमध्ये आवटी यांचा पूर्ण सहभाग होता. भारतीय वनसेवेतील आय.एफ.एस अधिकारी एम.एम. जामखंडीकर यांच्या डायरीवर आधारित ‘रिलेशन ऑफ होमोसॅपिअन अ‍ॅण्ड पॅन्थेरा लिओ’, तसेच ‘द व्हॅनिशिंग इंडियन टारगर’ या दोन पुस्तकांचे त्यांनी संपादन केले .

     संपूर्ण भारतीय बनावटीच्या जहाजामधून जगप्रवास करण्याच्या मोहिमेचे ते मार्गदर्शक होते तसेच त्यांनी इकॉलॉजिकल सोसायटीच्या माध्यमातून  ‘पर्यावरण’ हा विषय हाताळला . निवृत्तीनंतर त्यांचा मुक्काम फलटणजवळील विंचुर्णी या गावात होता . अशा ह्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे २०१८मध्ये निधन झाले.

     - प्रणव पवार

आवटी, मनोहर प्रल्हाद