Skip to main content
x

बाळ, मालतीदेवी गणेश

   हाराष्ट्रातील मिरज या गावी योगिनी मालतीदेवी गणेश बाळ यांचा जन्म झाला. अध्यात्मविद्येची अथवा परमार्थाची पार्श्वभूमी नसतानाही साधनेच्या बळावर परमार्थात प्रगती साधता येते, हे मालतीदेवी यांनी आपल्या उदाहरणातून सिद्ध केले. त्यांचे वडील पांडुरंग रामचंद्र करमरकर हे वैद्य होते. मालतीदेवींचे शिक्षण मिरजेतच चौथ्या इयत्तेपर्यंत झाले. परंतु, त्याच वेळी त्यांची आई अकालीच देवाघरी गेली आणि मालतीदेवींची आबाळ होऊ लागली. त्यामुळे पांडुरंगशास्त्र्यांनी आपल्या मुलीचा विवाह, मिरजेतीलच गणेश हरी बाळ यांच्याशी बाराव्या वर्षीच करून दिला.

गणेश म्हणजेच अण्णासाहेब बाळ यांनी आपले शिक्षण पूर्ण करून काही काळ स्वतंत्र व्यवसाय केला. ते दिवस दुसर्‍या महायुद्धाचे होते. त्यामुळे त्यांनी सैन्यातील नोकरी पत्करली. मालतीदेवींसह त्यांचा मुक्काम पुण्याच्या छावणीत हलवावा लागला. महायुद्ध संपल्यानंतर त्यांची नोकरी गेली; परंतु पुन्हा लष्करातून त्यांना बोलावणे आले आणि या वेळी त्यांना दिल्ली तळावर नियुक्त व्हावे लागले.

दिल्लीत १९५५ साली आल्यानंतर देवाधर्माकडे ओढा असलेल्या मालतीदेवी एकदा हिमालयात हृषिकेश येथे तीर्थयात्रेला गेल्या, आणि तेथेच त्यांच्या आध्यात्मिक आयुष्याला सुंदर वळण मिळाले. हृषिकेश येथे त्यांना तत्कालीन प्रसिद्ध योगाचार्य स्वामी शिवानंद यांचे दर्शन झाले. स्वामींच्या एकूणच विचार आणि साधनेने त्या भारावून गेल्या आणि त्या हळूहळू अध्यात्माकडे झुकू लागल्या. स्वामी शिवानंदांनी त्यांना ‘शिवानंद योगमयी’ हा ग्रंथ वाचावयास दिला.

‘शिवानंद योगमयी’ या ग्रंथाचा मोठा प्रभाव मालतीदेवींवर पडला आणि त्या ‘ध्यान’ या विषयाकडे आकृष्ट झाल्या. त्या तासन्तास ध्यानस्थ बसू लागल्या. एकदा ध्यानमग्न असलेल्या त्यांच्या चक्षूंसमोर एक कमंडलू आले आणि त्यातून मानवी हाताच्या बोटाने त्यांना काही संकेत दिला. या सार्‍या प्रकाराने मालतीदेवी भयभीत झाल्या. परंतु, त्यांच्या असामान्य आध्यात्मिक प्रवासासाठीचा तो साक्षात्कार होता, हे त्यांनी जाणले.

१९५८ साली जेव्हा सूर्यग्रहण होणार होते, त्या वेळी त्यांना हृषिकेश येथे जाऊन गंगास्नान करण्याची तीव्र इच्छा झाली. त्यांच्या समजूतदार व प्रेमळ पतींनी त्यांना हृषिकेश येथे पाठविले. हृषिकेशच्या प्रवासात त्यांची एकमेव ठेवणीतील साडी हरवली. त्या वेळी त्यांच्या एका सहप्रवासी स्त्रीने त्यांना स्वत:ची शुभ्र साडी दिली आणि म्हटले, ‘‘सारंच परमेश्वराचं आहे, तुम्ही ही साडी घ्या.’’ परिधान केलेल्या त्या शुभ्र साडीत मालतीबाईंना एक वेगळीच अनुभूती प्राप्त झाली. स्वत:मधील दिव्यत्वाची जाणीव होऊ लागली.

ध्यानावस्थेत असताना त्यांना अनेक संत-सज्जन मंडळी दर्शन देऊन गेली.  परमपूज्य स्वामी शिवानंद यांच्याबरोबरच कलकत्त्याची कालीमाता, कोल्हापूरची महालक्ष्मी, अष्टभूजा, व्याघ्रांबरी, भिल्लिणीच्या रूपातील पार्वती आणि भोलेशंकर अशा देवदेवतांसह संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, पंतमहाराज बाळेकुंद्री, नारायणमहाराज केडगावकर अशा कित्येकांचा त्यांत समावेश आहे, असे म्हणतात. या संतांच्या दिव्यदर्शनाने त्या काही वर्षांतच परमहंस स्थितीत पोहोचल्या. मालतीदेवींचे सद्गुरू श्री स्वामी शिवानंद यांच्याशी त्यांची चार वेळा प्रत्यक्ष भेट झाली होती. स्वामींनी त्यांना प्रपंचात राहूनही एखादी स्त्री आध्यात्मिक क्षेत्रात आत्मोद्धार आणि जगदोद्धार करू शकते अशी प्रेरणा दिली. मालतीदेवींना त्यांच्या योगसाधनेमुळे अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. अनेक भाविकांना त्यांची प्रचिती आली. देवींनी अनेकांना त्यांना आलेल्या अडचणींवर उपाय सुचविले आणि समस्यामुक्त केले.

अनेक संतपुरुषांप्रमाणे मालतीदेवी यांच्याही चमत्कारांचे भक्तांना अनुभव आले आहेत. साधनेच्या शिखरावर पोहोचलेल्या साधकांच्या बाबतीत असे चमत्कार घडून येत असतात. त्यामागचा कार्य-कारणभाव लक्षात न आल्यामुळे अनेक जण या गूढ गोष्टी मानतात व त्यावर विश्वास ठेवत नाहीत. पण सूक्ष्मदेहाने मालतीदेवी वावरत असतात, असा त्यांच्या भक्तमंडळींचा अनुभव आहे. मालतीदेवींच्या या व्यस्त दिनक्रमामुळे त्यांचे गुरू स्वामी शिवानंद यांच्या विचारांचा प्रचार करण्याचे काम खंडित होऊ लागले. त्यामुळे पुढील काळात त्यांनी ध्यानयोग शिक्षण वर्ग, तसेच स्वामीजींच्या विचारांचा प्रचार सुरू केला. त्यांचे शिष्यगण आणि भाविक भारतभर पसरले आहेत. सांगली, मिरज, जळगाव, पुणे, दिल्ली येथील केंद्रांतून आज सर्वधर्मियांसाठी विनामूल्य ध्यानवर्गाचे आयोजन केले जाते. १९८३ साली त्या हृषिकेश येथे गेल्या असताना तेथील माधवानंद स्वामींनी त्यांना साधक, शिष्यांना मंत्रदीक्षा देण्याचे काम करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी मंत्रदीक्षेचे कार्य सुरू केले, अर्थात शिष्य, भक्तगण साधनेतून तावूनसुलाखून निघाल्यानंतरच.

‘स्वत:च्या अंतर्मनात डोकावून तेथील परिस्थिती अवलोकूनच पुढे वाटचाल करा. आत्मिक बळ वाढवा. अंतर्मनातील अमृतमय स्रोताचा आस्वाद घ्या,’ असे सांगणार्‍या मालतीदेवींनी काव्यही विपुल लिहिले आहे. या कवितांमधून अद्वैत भाव, मानवप्रेम, धर्म, ईश्वरभक्तीचे रसाळ वर्णन केले आहे. देवींनी आपल्या अनुभवांचे वर्णन व लेखन ‘संतकृपा’ मासिकातून दीर्घकाळ केले आहे. ‘कोण्या एका साधकाची साधनगाथा’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

संदीप राऊत

बाळ, मालतीदेवी गणेश