Skip to main content
x

बाळकृष्ण

      त्रपती शिवाजी महाराजांवर लेखन करणारे एक साक्षेपी, चिकित्सक व व्युत्पन्न इतिहासकार म्हणून डॉ. बाळकृष्ण ओळखले जातात. त्यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील मुलतान येथे झाला. बालपणीच त्यांच्यावरील मातापित्यांचे छत्र हरपले. एका मुसलमान शेतकरी कुटुंबाने त्यांचे संगोपन केले. पुढे आजोबांनी त्यांना आपल्या घरी आणून त्यांचे शिक्षण केले. त्यांनी मुलतान हायस्कूल आणि दयानंद महाविद्यालय (लाहोर) यांतून अध्ययन करून १९००मध्ये इतिहास व अर्थशास्त्र या विषयांत बी.ए. व १९०२मध्ये एम.ए. पदव्या मिळवल्या. विद्यार्थिदशेतच त्यांचा विवाह दयाबाई मालसे या बालिकेसोबत झाला.

     त्यांनी श्रद्धानंदांच्या गुरुकुल कांग्री विद्यापीठात (हरिद्वार) अध्यापनाची जबाबदारी स्वीकारले. इथे त्यांनी दहा वर्षे अध्यापन केले. ते उपप्राचार्य आणि पुढे प्राचार्यही झाले. या काळात त्यांना दम्याचा विकार जडला व त्याने अखेरपर्यंत पिच्छा पुरवला. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची तीव्र इच्छेपोटी त्यांनी अथक प्रयत्न करून १९१९मध्ये इंग्लंडमधील ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स’ या जगन्मान्य संस्थेत प्रवेश घेतला. तिथे त्यांनी संशोधन करून ‘कमर्शिअल रिलेशन्स बिट्विन इंडिया अँड इंग्लंड’ हा महत्त्वपूर्ण प्रबंध लंडन विद्यापीठाला सादर केला. १९२२मध्ये ते पीएच.डी. झाले आणि त्या वर्षीच्या मार्चमध्ये भारतात आले. मे १९२२मध्ये कोल्हापूर संस्थानने राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नियुक्ती केली. अखेरपर्यंत ते त्या पदावर होते. या पदाबरोबरच त्यांच्याकडे संस्थानच्या शिक्षण अधिकार्‍याचे काम देण्यात आले. त्यांनी संस्थानातील सर्व माध्यमिक विद्यालयांतील शैक्षणिक दर्जाचे, सोयीसुविधांचे सर्वेक्षण करून एक अहवाल संस्थानला सादर केला. हा अहवाल तत्कालीन शैक्षणिक परिस्थितीवर प्रकाश टाकतो.

     राजाराम महाविद्यालय ही त्या वेळी दक्षिण महाराष्ट्रातील एक नामवंत व उच्च शिक्षण देणारी एकमेव संस्था होती. तीत फक्त कला महाविद्यालय होते आणि जेमतेम तीनशे विद्यार्थी शिकत होते. डॉ. बाळकृष्णांनी आपल्या कारकिर्दीत पदव्युत्तर शिक्षणाची सोय करून महाविद्यालयाच्या विद्याशाखांचा विस्तार केला. तसेच शास्त्रशाखाही सुरू केली. शहरात एक विधी महाविद्यालय आणि अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालय सुरू केले. दक्षिण महाराष्ट्रात मुख्यत्वे कोल्हापूरला, शिवाजी विद्यापीठ स्थापन करण्याची मूळ कल्पना बाळकृष्णांचीच होती. कोल्हापूरच्या आर्य समाजाच्या चळवळीत ते अग्रणी असत. त्यांनी अर्थशास्त्र व इतिहास या विषयांना आयुष्य वाहिले. त्यावर व्याख्याने दिली. चर्चासत्रे आयोजित केली.

     प्राचार्यपदाच्या सुमारे अठरा वर्षांच्या कारकिर्दीत बाळकृष्णांनी शिवचरित्राला सर्वार्थाने वाहून घेतले. त्यांनी उपलब्ध सर्व कागदपत्रांचा धांडोळा घेऊन त्याचा साक्षेपी अभ्यास करून १९४०मध्ये ‘शिवाजी द ग्रेट’ हा चार खंडात्मक सुमारे १६३० पृष्ठांचा बृहद्गंथ सिद्ध केला. या चरित्राची व्याप्ती आणि आवाका फार मोठा आहे. ‘शिवाजी द ग्रेट’ हा त्यांचा महत्त्वपूर्ण संशोधनात्मक ग्रंथ होय. पहिल्या खंडाच्या प्रास्ताविकात त्यांनी या चरित्राच्या रूपरेेषेविषयी व उद्देशांविषयी स्पष्ट कल्पना दिली आहे. त्यांनी मूळ साधनांतून अस्सल साधने निवडून पारखून त्यांवर प्रथम लक्ष केंद्रित केले. याकरिता त्यांनी लंडन, द हेग, बटेव्हिया (अमेरिका), मुंबई, पणजी (गोवा), पुदुचेरी (पाँडेचरी), चेन्नई (मद्रास), तंजावर, सातारा, पुणे येथे पुराभिलेखागारांना भेटी देऊन शिवाजी महाराजांच्या संदर्भातील असंख्य कागद पाहिले. त्यांतून टिपणे काढली. याशिवाय परदेशी प्रवाशांचे तत्कालीन वृत्तान्त, फॅक्टरी रेकॉडर्ज आणि बखरी यांचे सूक्ष्म अवलोकन केले. ‘इंग्लिश रेकॉडर्ज ऑन शिवाजी’ (पहिला व दुसरा खंड - १९३१) हे तत्पूर्वी प्रसिद्ध झाले होते. डॉ. एस.एन. सेन व रॉलीसन्स यांच्या पुस्तकांचाही उपयोग केला. हेग व बटेव्हिया येथील डच साधनांचा भरपूर उपयोग केला आणि नंतर शिवचरित्रातील प्रमुख घटना निवेदन केल्या. तिसरा खंड त्यांनी शिवराज्याभिषेक (१६७४) आणि कर्नाटकाची मोहीम (१६७६-१६७८) या दोन महत्त्वांच्या विषयांना वाहिला आहे. शेवटच्या चौथ्या खंडात बाळकृष्णांनी महाराजांची लष्करी व्यवस्था, नागरी प्रशासन, आर्थिक व्यवस्था, न्यायपद्धती, आरमार व धार्मिक धोरण यांची सविस्तर माहिती दिली असून तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या संदर्भात ती किती शिस्तबद्ध, कडक व काटेकोर होती, याचे वर्णन केले आहे.

     या चरित्रात बाळकृष्णांनी उपलब्ध - विशेषत: डच साधनसामग्रीतील पत्रे, उतारे जसेच्या तसे उद्धृत केले असल्यामुळे इतिहासाचा सूक्ष्म अभ्यास करणार्‍या संशोधक-अभ्यासकाला एक संदर्भग्रंथ म्हणून या ग्रंथाचे मोल वादातीत आहे.

     बाळकृष्णांनी शिवचरित्र लिहिण्यासाठी मराठी आत्मसात करून मोडी लिपीचा अभ्यास केला. उत्तर हिंदुस्थानात जीवनातील ४० वर्षे व्यतीत करूनही अखेरच्या पर्वात ते कोल्हापूर संस्थान आणि महाराष्ट्र यांच्याशी एकरूप झाले.

     शिवचरित्राव्यतिरिक्त त्यांनी लिहिलेले अन्य ग्रंथ हे प्रामुख्याने अर्थशास्त्रविषयक आहेत. त्यांचा प्रबंध पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. याशिवाय ‘द इंडस्ट्रियल डिक्लाइन ऑफ इंडिया’, ‘द वेदिक साम्स्’, ‘द थिअरी ऑफ द स्टेट इन एन्शंट इंडिया’ आणि ‘फ्रॉम द कौंटर टू द क्राऊन’ हे त्यांचे आणखी काही ग्रंथ होत. त्यांनी हिंदीतूनही स्फुट लेख लिहिले होते.

संपादित

बाळकृष्ण