Skip to main content
x

बापट, पुरुषोत्तम विश्‍वनाथ

     डॉ. पुरुषोत्तम विश्‍वनाथ बापट हे पाली भाषेचे व बौद्ध धर्माचे विश्वविख्यात प्रकांडपंडित धर्मानंद कोसंबींचे छात्रोत्तम होते. ते फर्गसनमध्ये पालीविभाग प्रमुख असून डेक्कन शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य होते. पंडित नेहरूंनी त्यांच्या अधिपत्याखाली चीन देशाला पहिले शिष्टमंडळ पाठवले. अमेरिकेत हार्वर्ड येथील येन चिंग संस्थेमध्ये त्यांनी चिनी भाषेचे शिक्षण घेतले होते. डॉ. हिराकरबा यांच्यासह बुद्धघोषाचार्यांच्या विनयपिटकावरील समन्तपासादिका या महाअट्टकथेचा चिनी अनुवाद शान-शिन-पिपोशा म्हणून प्रसिद्ध केला आणि तो भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे प्रकाशित झाला.

     डॉ. बापट १९२९ मध्ये अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या निमंत्रणावरून अमेरिकेस गेले. तेथे ‘विसुद्धीमग्ग’ या पाली ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर करण्याचे काम यांच्याकडे सोपवले गेले होते. तो ग्रंथ इसवी सनाच्या पाचव्या शतकात तयार झाला असून प्राचीन काळच्या बौद्ध धर्माचे स्वरूप त्यावरून कळून येते. त्याकरिता ते तेथे तीन वर्षे होते. तेवढ्या अवधीत त्यांनी चिनी भाषेचा अभ्यास केला आणि पीएच.डी. ही पदवी संपादन केली. मूळ बौद्ध ग्रंथांचे ज्ञान व अध्ययन करायचे असल्यास चिनी भाषेचे ज्ञान आवश्यक असते. ते मिळवून १९३२मध्येे हिंदुस्थानात परत आले. १९४३मध्ये बनारस येथे भरलेल्या ओरिएन्टल कॉन्फरन्सच्या वेळी ते पाली व बौद्ध विभागाचे अध्यक्ष होते.

     त्यांनी पुरातन पाली ग्रंथांची इंग्रजीत व मराठीत भाषांतरे बरीच केली आहेत. त्यात ‘विमुत्ति-मग्ग’, ‘विसुद्धि-मग्ग’, ‘सूत्तनिपातो’, ‘धम्मसंगणि’ व ‘अठ्ठसालिनी’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. यापैकी शेवटची दोन पुस्तके त्यांनी प्रो. र.द. वाडेकर यांच्या मदतीने भाषांतरित केली आहेत. मातृभाषा मराठी व इंग्रजी याशिवाय त्यांना संस्कृत, पाली, चिनी व तिबेटी या भाषांचे चांगले ज्ञान होते. आवश्यक जर्मन व फ्रेंच भाषांचे ज्ञानही त्यांनी संपादन केले.

     काही काळाने शांतीनिकेतनमध्ये संशोधनकार्य करण्यासाठी त्यांची नेमणूक झाली. चिनी-बौद्ध वाङ्मयासंबंधी संशोधन करून ग्रंथप्रकाशन करणे हे त्यांचे तेथील मुख्य काम होते. हिंदुस्थानातून नेलेले हजारो ग्रंथ ऐतिहासिक कालात (चौथ्या-अकराव्या शतकात) चिनीत भाषांतरित झाले. त्यापैकी सुमारे दोन हजार ग्रंथ १९४६पर्यंत संशोधून प्रसिद्ध झाले आहेत.

     ‘संघभद्र’ नावाच्या चिनी पंडिताने इ.स. ४७०मध्ये ‘समंतपासादिका’ नावाचा ग्रंथ पालीतून चिनीत भाषांतरित केला. तो पाली ग्रंथ आता उपलब्ध नाही, म्हणून त्या ग्रंथाचे पाली किंवा इंग्रजी भाषांतर करण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले. शांतिनिकेतनमध्ये राहून, तेथील चीनभवनातील मुख्य प्रो. तानू-युन-शान यांच्या देखरेखीखाली ते हे काम करीत होते.

     आयुष्यभर मुख्यत्वे बुद्धघोषाचार्यांचा अभिधर्मपर विश्वकोश ‘विसुद्धीमग्ग’ या विषयावर त्यांनी अमेरिकेत हार्वर्ड येथे व शान्तिनिकेतन, दिल्ली व पुणे येथे संशोधनपर कार्य केले. ‘विसुद्धीमग्ग व विमुत्तिमग्ग - एक तौलनिक अध्ययन’ हा त्यांचा संशोधन प्रबंध होता.

     फर्गसन महाविद्यालयातून निवृत्त झाल्यावर बापटसरांची नेमणूक दिल्ली येथे सुरू केलेल्या बौद्ध-अध्ययन केंद्राचे प्रमुख म्हणून झाली. शान्तिनिकेतनला राहून त्यांनी तिबेटी भाषा व तिब्बती बौद्धधर्म यांचा अभ्यास केला. शान्तिनिकेतननेच त्यांचे सुत्तनिपातातील अट्टकवग्ग यावरील पुस्तक प्रकाशित केले.

     डॉ. बापट यांनी सुत्तनिपात, मज्झिमनिकारा (मज्झिमपर्‍णासक), अट्टसालिनी व धम्मसङ्गणि ही दोन पुस्तके (सहाकार्याध्यापक प्रा. रं.द. वाडेकर यांच्या सहकार्याने) प्रकाशित केली. कै. पुरुषोत्तम मंगेश लाड यांनी सुरू केलेल्या, पण त्यांच्या निधनामुळे अपूर्ण राहिलेल्या धम्मपद (धर्मपद) या ग्रंथाचे सानुवाद, सटीप संपादन त्यांनी केले. ते महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केले. या कार्यात त्यांना त्यांच्या चिनी भाषेचा व्यासंग फार उपयोगी पडला. उदाहरणार्थ, ‘विस्संधम्मं समादाय’ याचा बुद्धघोषकृत ‘विश्वधर्म’ हा अर्थ चुकीचा आहे. त्याचप्रमाणे ‘वेश्यधर्म’ वा ‘वेश्मधर्म’ हे अनुवादही प्रमादिक आहेत, चिनी परंपरेत विस्तधर्म (शिळा स्वभाव) हा अर्थच योग्य आहे, असे ते प्रतिपादन करू शकले.

     नालंदा महाविहाराने त्रिपिटकाची देवनागरीतली आवृत्ती प्रकशित केली. यातील काही खंड प्रा. बापट यांनी संपादित केले. मुख्य म्हणजे ‘बौद्ध धर्माची २५०० वर्षे’ (ढुशिीूं ऋर्ळींश र्कीविशीशव ूशरीी षि ुरववहळीा) या संक्षिप्त विश्वकोशाचे ते प्रधान संपादक होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले बापटांचे पालि सिलेक्शन्स (पाली-संग्रह) महत्त्वाचे आहे.

डॉ. मो.गो. धडफळे

बापट, पुरुषोत्तम विश्‍वनाथ