Skip to main content
x

बाविस्कर, महारू सोनू

               खान्देशी मुलखात ‘राजू बाविस्कर’ या नावाने परिचित असलेल्या बापू बाबूराव बाविस्कर यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील चोपडे तालुक्याच्या लासूर येथे अशिक्षित दलित-कष्टकरी कुटुंबात झाला. आईचे नाव अनुबाई. गावाबाहेरच्या वस्तीतले जिणे या चित्रकाराने जवळून अनुभवले, एवढेच नव्हे तर ते या चित्रकाराच्या जगण्याचा प्रत्यक्ष भागही होते. गावातील गुरे-ढोरे मेली की त्यांना गावाबाहेरच्या वस्तीत आणले जाई व आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी हे काम राजू बाविस्करही करीत; कारण तेच या मांग समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन होते. असे काम नसेल तेव्हा आई ‘गाव मागायची’ व त्यात मिळालेल्या अन्नावर कशीबशी गुजराण व्हायची. आठव्या-नवव्या वर्षी राजूला आपले हे आयुष्य वेगळे असल्याची जाणीव होऊ लागली. पुढे वडिलांनी बँड सुरू केला व या बँडमुळे आर्थिक परिस्थिती १९८० च्या दरम्यान सुधारली. बाविस्करांचे शालेय शिक्षण सुरू झाल्यावर या मुलाच्या हातात कलागुण असल्याचे चित्रकला शिक्षक आर.टी. पवार यांनी हेरले व या विद्यार्थ्याला त्यांनी विशेष उत्तेजन दिले. शालेय शिक्षण झाल्यानंतर खिरोदा येथील सप्तपुर ललित कलाभवन विद्यालयातून प्रतिकूल परिस्थितीत बाविस्करांनी चिकाटीने ड्रॉइंग टीचर्स डिप्लोमा आणि आर्ट मास्टरचा अभ्यासक्रम २००० मध्ये पूर्ण केला. गव्हर्न्मेंन्ट स्कूल ऑफ आर्ट, औरंगाबाद येथून त्यांनी बी.एफ.ए. (कमर्शिअल) ही पदवी प्राप्त केली.

               गेल्या वीस वर्षांपासून जळगाव येथे कलाशिक्षक म्हणून ते काम करीत आहेत. त्यांचा विवाह १९९२ मध्ये भारती यांच्याशी झाला. पत्नी भारतीची त्यांना सातत्याने साथ आहे. त्यांच्या चित्रांना दक्षिण मध्य सांस्कृतिक विभाग नागपूर (१९९१), ऑल इंडिया फाईन आर्टस् अॅण्ड क्राफ्टस् सोसायटी दिल्ली (२०००), ऑल इंडिया कॅम्लीन आर्ट टिचर अॅवॉर्ड  (२००३), (२००६) असे पुरस्कार मिळाले.

               जळगावच्या आसपासचा परिसर खान्देश म्हणून ओळखला जातो. इथे चित्रकारांना व त्यांच्या कला- निर्मितीस प्रोत्साहन मिळेल असे उत्साही वातावरण नाही. कलेच्या वाढीसाठी पोषक अशी पार्श्‍वभूमी नसतानाही राजू बाविस्कर यांनी आपल्या कलानिर्मितीत सातत्य ठेवले आहे.

               स्वत: जगलेले आणि भोगलेले आयुष्य राजू बाविस्कर यांच्या कलाकृतीतून प्रभावीपणे व्यक्त होते. त्यांच्या जीवनशैलीची नाळ ही गाव-खेड्यांशी जुळलेली आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रांत मानवी आकृत्या, त्यांच्याशी निगडित घटक, गाय, बैल, कुत्री, झाडे आदींची मांडणी बघावयास मिळते.

               अशी चित्रे वास्तववादी शैलीच्या मुशीतून विरूपीकरणाचा मार्ग चोखाळत असली तरी त्यात प्रायोगिकता आहे. स्वत:च्या पूर्वायुष्यातील अनुभवविश्‍व त्यांच्या रेखाटनांमधून व्यक्त होते. स्वजनांचे अनुभवलेले हे जिणे बघून मनात उमटलेले काहूर, जीवनातील ओंगळपणा, अपरिहार्यता व जीवनसंघर्ष या चित्रांमधून येतो. प्रसंगी ते धक्कादायक वाटले तरी त्यामागची भावना व प्रेरणा अस्सल आहे. रापलेले चेहरे, मृत जनावरे, पोटातील भुकेची वखवख व त्यातून जगण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड इथे प्रत्ययाला येते. ग्रमीण भागात अजूनही जातिव्यवस्थेची मुळे घट्ट रुतून आहेत. गाव-खेड्यातील माणसांना स्वत:चे चेहरे नसल्यामुळे राजू बाविस्करांनी आपल्या चित्र-रेखाटनांत मानवी आकृत्यांमध्ये चेहर्‍यांचे पुसट चित्रांकन केले आहे.

               त्यांची एकल प्रदर्शने अखिल भारतीय साहित्य संमेलन-नाशिक (२००५) व जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये  (२०१०) झाली आहेत. समूह प्रदर्शनांतही त्यांनी भाग घेतला आहे. तसेच ‘हंस’, ‘अनुष्टुभ’, ‘शब्दवेध’, ‘अंतर्नाद’, ‘अनुभव’ अशा अनेक दिवाळी अंकात त्यांची रेखाटने प्रसिद्ध झाली आहेत. 

- लखीचंद जैन, साधना बहुळकर

बाविस्कर, महारू सोनू