Skip to main content
x

बडोदेकर, हिराबाई

किराणा घराण्याच्या पहिल्या ख्यातनाम स्त्री- गायिका हिराबाई बडोदेकर या अब्दुल करीम खाँ आणि ताराबाई माने यांच्या कन्या होत. त्यांचा जन्म मिरजेत झाला. हिराबाईंची जन्मकथा विलक्षण आहे. जन्मत:च मृत बालक समजून सुइणीने त्यांस फडक्यात बांधून बाजूला ठेवून दिले. त्यानंतर डॉक्टरांनी येऊन पाहिले असता, त्यांत थोडी धुगधुगी दिसली. तत्पर उपाय योजून डॉक्टरांनी त्यांना जगवले.

सुरेशबाबू, हिराबाई, कृष्णराव, कमलाबाई आणि सरस्वतीबाई अशी ही पाच भावंडे होत. सगळी संगीताचा वारसा घेऊनच जन्मली. ताराबाई माने यांची आई हिराबाई माने. या बडोदे सरकारच्या सेवेत होत्या. हिराबाईंनी त्यांचेच नाव लावले. हिराबाईंचे आप्तइष्टमित्र त्यांना ‘चंपूताई’ म्हणत. ताराबाईही संगीतात तयार होत्या. ताराबाई १९२२ साली अब्दुल करीम खाँपासून वेगळ्या झाल्या. ताराबाईंनी सर्वांची नावे बदलली. सुरेशबाबू, कृष्णराव व सरस्वतीबाईंना माने, तर हिराबाई, कमलाबाई यांना बडोदेकर असे आडनाव दिले.

हिराबाईंनाही लहानपणापासून गाण्याचे वेड होते; पण ताराबाईंना आपल्या मुलींनी शिकून समाजात प्रतिष्ठितपणे जगावे असे वाटे. त्या वेळी घरंदाज मुलींना गाणे शिकवण्याची प्रथाही नव्हती. पुण्याच्या हुजुरपागा शाळेत हिराबाई सातवीपर्यंत शिकल्या. ताराबाईंनी १९१८ साली आपल्या पाचही मुलांना घेऊन मुंबईला बिऱ्हाड केले. एका ज्योतिषाने ‘ही मुलगी गाण्यात नाव कमवेल’ असे सांगितल्यावर ताराबाई हिराबाईंना गाणे शिकवण्यास तयार झाल्या.

त्यांचे सुरुवातीचे शिक्षण ताराबाई व सुरेशबाबूूंकडे झाले, तसेच काही महिने आग्र घराण्याचे उस्ताद मुहंमद खाँ यांच्याकडेही झाले. पण त्यांना खरी तालीम मिळाली ती किराणा घराण्याच्या अब्दुल वहीद खाँची (१९१८ - १९२२ अशी चार वर्षे).

हिराबाई वयाच्या तेराव्या वर्षापासून सुरेशबाबूंबरोबर खाजगी बैठकीत गात होत्या. हिराबाईंचे पहिले जाहीर गाणे वयाच्या सोळाव्या वर्षी १९२१ साली मुंबईतील गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत परिषदेत झाले. त्यात त्यांनी पटदीप राग इतका चांगला गायला, की राग पटदीप म्हणजे हिराबाई असे समीकरण झाले. ताराबाईंनी १९२१ साली अर्थार्जनाकरिता म्हणून ‘नूतन संगीत विद्यालय’ सुरू केले होते. त्यातही हिराबाई शिकवत होत्या.

हिराबाई १९२२ पासून संगीताच्या व्यवसायात उतरल्या व त्यांनी जाहीर कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. थोड्या कालावधीतच त्यांचे नाव होऊ लागले. त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका १९२३ मध्ये निघाली. त्यांनी १९२४ मध्ये तिकिटे लावून आपल्या गायनाचा जाहीर जलसा लावला. एका स्त्रीने स्वत:चा जलसा तिकीट लावून करणे हा त्या काळातील पहिलाच धाडसी व क्रांतिकारकच प्रयोग होता.

त्यांनी १९२८ सालापासून आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून गायन प्रसारित करण्यास सुरुवात केली. जवळजवळ चाळीस केंद्रांवरून त्यांचे गाणे होई. आकाशवाणी आणि ध्वनिमुद्रिका यांतून त्यांचे गाणे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत पोहोचले. ‘उपवनी गात कोकिळा’, ‘राधेकृष्ण बोल’, ‘ब्रिजलाला गडे’ अशी कितीतरी गाणी जनमानसात लोकप्रिय झाली. महाराष्ट्राच्या बाहेर १९३७ नंतर त्यांची कीर्ती पसरली. कलकत्त्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांना गाण्याचे आमंत्रण मिळाले. जालंधरच्या १९४१ सालच्या हरवल्लभ मेळ्यात गाणार्‍या त्या पहिल्या स्त्री- कलाकार होत्या.

ताराबाईंनी ‘नूतन संगीत विद्यालया’ची नाट्यशाखा म्हणून नवी नाटक मंडळी सुरू केली. या नाट्यशाखेच्या ‘सौभद्र’ या नाटकातून सुभद्रेच्या भूमिकेत ५ सप्टेंबर १९२९ रोजी मुंबईतील बॉम्बे थिएटरात झालेल्या प्रयोगातून त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. त्यानंतर हिराबाईंनी ‘संशयकल्लोळ’, ‘सौभद्र’, ‘पुण्यप्रभाव’, ‘विद्याहरण’ इत्यादी जुन्या नाटकांतून, तसेच ‘साध्वी मीराबाई’ (स.अ. शुक्ल), ‘युगांतर’ (ना.सी. फडके), ‘जागती ज्योत’ (मामा वरेरकर), ‘स्त्री-पुरुष’ (कमतनूरकर) इत्यादी नव्या नाटकांतूनही भूमिका केल्या. हिराबाईंचे अतिशय गोड गायन व संयत अभिनय असला तरी हा नाटकधंदा फारसा जोर धरू शकला नाही. त्यामुळे कर्ज मात्र भरपूर झाले.

ही नाट्यशाखा १९३३ मध्ये बंद करावी लागली. पण हिराबाईंचे मनोधैर्य भक्कम होते. त्यांच्या भागीदारांनी लबाडी केली होती. हिराबाईंच्या नाचक्कीकरिता नादारी घ्यावी असाही त्यांनी अर्ज केला. परंतु नादारी घ्यायला स्पष्ट नकार देऊन, ‘‘कर्ज कसे फेडणार?’’ या न्यायाधीशांच्या प्रश्नावर ‘‘नाटक कंपनी बंद झाली असली तरी माझ्या गळ्यातलं गाणं गेलेलं नाही,’’ असे त्यांनी सडेतोड उत्तर दिले. त्यांनी हिमतीने गावोगावी जलसे करून दोन-चार वर्षांत कर्ज फेडले.

त्यानंतर रंगभूमीवर जायचे नाही असा हिराबाईंनी निश्चय केला असला तरी २२ एप्रिल १९४४ रोजी मराठी रंगभूमीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त झालेल्या साहित्य संघाच्या ‘सौभद्र’ या नाटकात बालगंधर्वांबरोबर (अर्जुन) हिराबाईंनी सुभद्रेची भूमिका केली. पुढे हिराबाईंचे बंधू कृष्णराव यांनी ‘सौभद्र’, ‘विद्याहरण’, ‘एकच प्याला’ वगैरे नाटके कंत्राटदारी पद्धतीवर नटसंच उभारून दौरे काढले, त्यात हिराबाई भूमिका करत होत्या. त्या रंगभूमीवर १९६५ पर्यंत  अधूनमधून भूमिका करत होत्या.

त्यांनी १९३४ ते १९३८ या काळात चित्रपटांतूनही भूमिका केल्या. मो.ग. रांगणेकर यांच्या ‘सुवर्णमंदिर’, बाबूराव पेंटरांच्या ‘प्रतिभा’ व नंतर ‘रवीन्द्र चित्र’च्या ‘संत जनाबाई’मध्ये त्यांनी भूमिका केल्या. या चित्रपटांतून थोडाफार आर्थिक फायदाही झाला, तरी फारसे यश मात्र पदरात पडले नाही.

त्यांनी १९४९ साली गाण्यासाठी आफ्रिकेचा दौरा केला. तसेच भारतीय शिष्टमंडळाबरोबर १९५३ साली त्यांनी चीनचा दौराही केला.

त्यांचा १९२४ साली सोलापूरमधील माणिकचंद गांधी या खानदानी श्रीमंत गृहस्थाशी रीतसर विवाह झाला. हिराबाईंना त्यांनी सन्मानाने वागविले. त्यांना गुरुनाथ नावाचा एक पुत्रही झाला. पुढे हिराबाईंनी नाटकात काम करायला सुरुवात केल्यावर त्यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाला. पुढे नाट्यशाखा बंद झाल्यावर त्यांचे संबंध पुन्हा पूर्ववत झाले.  हिराबाईंनी माणिकचंदांचा आर्थिक धक्क्याने डळमळलेला संसार सावरला, तसेच त्यांची दृष्टी अधू झाल्यावरही त्यांची मनोभावे सेवा केली. १९७९ साली माणिकचंदांचे निधन झाले.

हिराबाई रागसंगीताबरोबरच नाट्यपदे, ठुमरी, भावपदे, भजन-अभंग आवर्जून गात. त्यांच्या एकंदर १७५ ध्वनिमुुद्रिका निघाल्याची नोंद आहे. ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ कंपनीने १९२३ साली हिराबाईंच्या गाण्याची पहिली ध्वनिमुद्रिका काढली होती. यात ‘जया अंतरी भगवंत’ हे भजन व दुर्गा रागातील ‘सखी मोरी समझुम’ ही चीज त्यांनी गायली होती. पुढे १९३५ ते १९४० पर्यंत ओडियन व कोलंबिया रेकॉर्ड कंपन्यांनीही त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या.

त्यांच्या नाट्यगीतांवर बालगंधर्वांचा प्रभाव होता. त्यांच्या नाट्यपदे, भावपदे व ठुमरीच्या ध्वनिमुद्रिका लोकप्रिय झाल्या. याबरोबरच पटदीप, वृंदावनी सारंग, यमन इत्यादी रागदारी गायनाच्या ध्वनिमुद्रिकाही निघाल्या. हिराबाई आपल्या धाकट्या भगिनी सरस्वती राणे यांच्याबरोबर जुगलबंदी करीत. स्त्री-जुगलबंदी गायनाची सुरुवात हिराबाईंनी केली व या जुगलबंदीची ध्वनिमुद्रिकादेखील निघाली होती.

हिराबाईंच्या गायनातील वैशिष्ट्य म्हणजे तारषड्जाचा हमखास प्रभावी लगाव. हिराबाईंचे गाणे सहज, भावपूर्ण होते. सोज्ज्वळता व शालीनता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुण त्यांच्या सादरीकरणातूनही प्रतीत होत होता. शांत व संयत भाव हे त्यांच्या अभिव्यक्तीचे वैशिष्ट्य होते.

हिराबाईंना अनेक सन्मान मिळाले. वयाच्या एकविसाव्या वर्षीच किर्लोस्कर थिएटरमध्ये झालेल्या जलशात सर चुनीलाल मेहता यांनी त्यांना ‘गानहिरा’ ही पदवी दिली. मुंबई आकाशवाणीने त्यांना १५ ऑगस्ट १९४७ या पहिल्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीत गायला आमंत्रित केले. त्यांना संगीत नाटक अकादमीचा १९६५ मध्ये पुरस्कार, मराठी नाट्यपरिषदेचे १९६६ मध्ये ‘बालगंधर्व’ सुवर्णपदक मिळाले व याच वर्षी महाराष्ट्र शासनानेही त्यांचा गौरव केला. त्यांना १९७० मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण’ देऊन गौरविले. त्या १९७४ मध्ये ‘विष्णुदास भावे’ सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. कलकत्त्याच्या आयटीसी संगीत रिसर्च अकादमीने त्यांचा सन्मान केला. हिराबाई यांचा शिष्यपरिवार मोठा आहे. हिराबाईंनी बहीण सरस्वती राणे यांनाही तयार केले होते. त्यांच्या शिष्यवर्गातील प्रभा अत्रे, मालती पांडे, जानकी अय्यर, सीता कागल या प्रमुख शिष्या होत.

हिराबाई या कुटुंबवत्सल होत्या. देव व ज्योतिषशास्त्रावरही त्यांचा गाढा विश्वास होता. वयाच्या साठीनंतर आपले गाणे पहिल्यासारखे होत नाही असे जाणवल्यावर त्यांनी जाहीर मैफली थांबवल्या. स्त्री-गायिकांना त्यांनी समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. स्त्रियांनी बैठकीत कसे गावे याचा आदर्शच त्यांनी समाजापुढे ठेवला. अशा या असामान्य गायिकेचे वयाच्या चौर्‍याऐंशीव्या वर्षी पुण्यात निधन झाले.

माधव इमारते

बडोदेकर, हिराबाई