Skip to main content
x

बद्री, नारायण

                 हत्त्वाच्या भारतीय समकालीन चित्रकारांपैकी एक  असलेल्या व ‘बद्री’ या स्नेहपूर्ण नावाने कलाजगतात ओळखल्या जाणार्‍या बद्री नारायण यांचा जन्म आंध्रातल्या सिकंदराबाद या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अनंतलक्ष्मी नरसिंह, तर आईचे नाव इंदिरा होते. त्यांचे रीतसर शालेय शिक्षण झाले नाही; पण स्वतंत्रपणे शिकून बनारस विद्यापीठातून ते मॅट्रिक झाले. तसेच, कोणत्याही आर्ट स्कूलमध्ये न जाता चित्रकलेचे धडेही त्यांनी स्वतःचे स्वतःच गिरविले.

                 बद्री यांना बालपणापासून चित्र रंगविण्याची ओढ होती. त्या ओढीतून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ते आपली जन्मभूमी सोडून मुंबईला आले आणि स्थायिक झाले. मुंबईत त्यांना के.के. हेब्बरांसारखे ज्येष्ठ चित्रकार भेटले. त्यांचा सहवास, प्रेम व मार्गदर्शनही त्यांना मिळाले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत बद्री यांनी कलाजगतात आपले स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले. त्यांचा विवाह १९५८ मध्ये झाला. पत्नीचेही नाव इंदिरा आहे.

                 बद्री यांनी सुरुवातीच्या काळात कॅनव्हासवर ऑइल पेंटिंग  केले. त्याचबरोबर संगमरवरी/काचेचे नक्षीकाम (मोझेक), मृद्लाद्या (सिरॅमिक टाइल्स) आणि मुद्राचित्रण (प्रिंटमेकिंग) प्रकारात वुडकट व एन्ग्रेव्हिंग अशा विविध कलामाध्यमांमध्ये दर्जेदार काम केेले. त्यांनी सोळा वर्षे‘विट्रम टाइल्स’च्या स्टूडिओत चित्रकार म्हणून काम केले. नंतरच्या काळात म्हणजे १९८० नंतर मात्र त्यांनी फक्त जलरंगांमध्येच काम केले व दर्जेदार चित्रे काढली.

                 बद्रींच्या चित्रांचे वैशिष्ट्य असे, की वरकरणी त्यांची चित्रे लहान मुलांच्या चित्रांसारखी वाटतात. त्यात बालकांची निर्व्याज सहजताच अधिक असते. लहान मुले ज्या कल्पनाविश्‍वात रमतात, तेच कलाविश्‍व बद्रींच्या चित्रात फार मोठा जीवनाशय घेऊन येते.

                 बद्री यांचे चित्रविश्‍व हे त्यांच्या जगण्यापासून वेगळे नाही. ते जे काही जगतात, ते त्यांच्या चित्रात पाझरते. त्यांच्या चित्रात कधी अगदी साध्यासाध्या गोष्टीसुद्धा विलक्षण चित्ररूप घेऊन साकार होतात, तर कधी जीवनातली अमूल्य तत्त्वे गोष्टीतल्यासारखी सुरसपणे चित्रित झालेली दिसतात.

                 बद्रींना चित्रासाठी विषय कोणता निवडायचा असा विचार करावा लागत नाही. कारण जीवनातला प्रत्येक क्षण मनापासून जगता-जगता ते तो रंगवतही असतात. त्यामुळे त्यांच्या चित्रात अगदी रोजच्या विषयांपासून स्वप्नविषयांपर्यंतचे सगळे संदर्भ येत असतात. कधी एखाद्या पौराणिक कथेतल्या सत्यवान-सावित्रीच्या अतूट नात्याची प्रेमकथा चित्रित झालेली असते, तर कधी जातककथेच्या रूपातून जीवनाचे तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रसंग दिसतो. कधी माणसामाणसांतल्या नातेसंबधांचे धागेदोरे विषद करताना कुटुंबातला एखादा हळुवार, नाट्यमय प्रसंग विलक्षण ताकदीने चित्रित झालेला दिसतो.

                 बद्रींच्या चित्रात रंगसंवेदना अतिशय तीव्र आणि भावपूर्ण असतात. त्यांची रेषा साधी, पण बोलकी असते आणि पोत आशयानुरूप विविध अंगांनी प्रकट झालेले दिसतात.

                 बद्री यांनी १९४९ पासून देशात, परदेशात आपल्या चित्रांची अनेक एकल प्रदर्शने भरवली. तसेच बिनाले, त्रिनाले अशा आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनांत त्यांची चित्रे सातत्याने प्रदर्शित होत राहिली. त्यांच्या चित्राला १९६६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांना १९९० मध्ये ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कारही मिळाला व इतरही अनेक मानाची पारितोषिके मिळाली. त्यांना १९८४ ते १९८६ या दरम्यान भारत सरकारची, दिल्लीची सीनियर फेलोशिप मिळाली. ‘द आर्ट ऑफ द चाइल्ड अॅण्ड मॉडर्न पेंटर’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.

                 मुंबईच्या पंडोल आर्ट गॅलरीचे ते चित्रकार  होते. पंडोलने त्यांची अनेक प्रदर्शने भरवली. देशात, तसेच परदेशांतही बद्री यांच्या चित्रांचा फार मोठा चहाता वर्ग आहे. अनेक महत्त्वाच्या व्यक्तींकडे, संस्थांकडे त्यांची चित्रे संग्रहित आहेत. बद्री नारायण यांना १९८७ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला.

                 बद्रींना चित्रकलेव्यतिरिक्त भारतीय तत्त्वज्ञान, ज्योतिष, साहित्य इत्यादीमध्ये विशेष रस आहे. ते इंग्रजीत चांगले लेखन करतात. लहान मुलांसाठी त्यांनी पुस्तके लिहिली आहेत, तसेच लघुकथालेखनही केले आहे, व ते विविध अंकांत प्रसिद्धही झाले आहे. ‘स्टोरी टेलर’ म्हणून लहान मुलांमध्ये ते विशेष लोकप्रिय आहेत. ‘ओरिएंट लाँगमन’ने मुलांसाठी काढलेल्या ‘रामायण’, ‘महाभारत’ या पुस्तकांत बद्रींची अप्रतिम रंगचित्रे व रेखाचित्रे आहेत. यातील ‘रामायण’ या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात पुस्तक सजावट संकल्पनेचा सर्वोत्कृष्ट पुरस्कारही मिळाला आहे.

                 मुंबईमध्ये चेंबूरला एका अगदी लहान घरात बद्री अनेक वर्षे  राहत होते. त्यांचा स्वतःचा स्टूडिओ नव्हता. पण नंतरच्या काळात पंडोल आर्ट गॅलरीने त्यांना चित्रकाम करण्यासाठी शीव येथे एक स्टुडीओ दिला. ते २००६ मध्ये मुंबई सोडून बंगळुरू येथे स्थायिक झाले होते.

- ज्योत्स्ना कदम

बद्री, नारायण