बेहरे, गणेश रामचंद्र
गणेश रामचंद्र बेहरे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कुर्धे गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मराठी पाचव्या इयत्तेपर्यंत झाले. त्यांचे वडील संगीतप्रेमी असल्याने संगीताची आवड निर्माण झाली होती; पण वडिलांची आर्थिक स्थिती फारशी बरी नसल्याने आणि गावात शिकण्याची सोय नसल्याने वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि १९०४ साली ‘नाट्यकला प्रवर्तक मंडळी’त ते दाखल झाले. बालवयातल्या नटांना तिथे गणपतीबुवा भिलवडीकर शिकवत असत. तिथे त्यांचे प्राथमिक संगीत शिक्षण झाले. पुढे नाटक कंपनी सोलापूरला पोहोचली. तिथे उ. अब्दुल करीमखाँचे वास्तव्य होते. त्यांनी शिकवायचे कबूल केल्यावर बेहऱ्यांनी नाटक कंपनी सोडून दिली.
उ.अब्दुल करीम खाँची तालीम वर्षभर चालली. मात्र आर्थिक अडचणींमुळे खाँसाहेबांनी बेहरेबुवांना घरी परत पाठवले. मग बुवा कुर्ध्यास घरी परतले. नंतर रावबहादूर देवलांच्या मदतीमुळे बेळगावी पं. रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे त्यांचे शिक्षण सुरू झाले. पुढे इंदूरला रजब अली खाँकडे बेहऱ्यांना तनैयतीचे विशेष शिक्षण मिळाले. त्यांच्याबरोबर कैक ठिकाणी बेहरेबुवा फिरले. त्यानंतर पुण्याला वर्षभर जमखिंडी संस्थानात बेहरे यांनी काही काळ नोकरी केली. त्यांना भास्करबुवा बखले यांचीही तालीम मिळाली.
उ.अब्दुल करीम खाँनी १९१८ साली मुंबईत कांदेवाडी येथे विद्यालय स्थापन केले. तिथे बेहरेबुवा शिकवू लागले. त्यांना तेथे काही शिकवण्या मिळाल्या आणि ते चरितार्थ चालवू लागले.
अत्यंत तयार ताना, स्पष्ट व गंभीर आवाज, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेले बेहरेबुवा गायक म्हणून मान्यता पावले. त्यांच्या आवाजात कधीही कंप नव्हता. विविध गुरूंच्या शिकवण्याने त्यांची गायकी समृद्ध झाली होती.
१९१५ साली ते मुंबई म्युनिसिपालिटी शाळेत संगीत शिक्षक म्हणून काम करू लागले. परंतु १९३२ साली पत्नी निवर्तल्यावर ते संन्यस्त वृत्तीने राहू लागले. ते १९४० साली आपल्या मूळ गावी, कुर्धे येथे परतले व १९६५ साली तेथेच वृद्धापकाळी त्यांचे निधन झाले.