Skip to main content
x

बेलुर, गासप्पा माजप्पा

              गासप्पा माजप्पा बेलुर यांनी १९५२मध्ये पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केली. ते ऑक्टोबर १९५२मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत रुजू झाले. त्यांना १९६१मध्ये  पदोन्नती मिळाली. त्या वेळी त्यांची मुख्य पर्यवेक्षक (कत्तलखाने) या पदावर नेमणूक झाली. त्यानंतरच्या काळात त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले.

              दरम्यानच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत बांद्रा, कुर्ला, आर्थर रोड व इतर अनेक ठिकाणी चालू असलेले कत्तलखाने एकाच ठिकाणी हलवण्याचे ठरले होते. त्या दृष्टीने देवनार येथील जागेची निवड करण्यात आली. तेथे शास्त्रीय पद्धतीने व आरोग्याच्या सर्व अटींचे पालन करून कत्तलखाने सुरू करण्यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या गेल्या. अत्याधुनिक कत्तलखान्याची इमारत बांधण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणी कत्तलखान्यांमध्ये काम करणारी सर्व मंडळी देवनार येथे जाण्यास तयार नव्हती. डॉ.बेलुर यांनी प्रामाणिकपणे व अथकपणे केलेल्या प्रयत्नांमुळे ते लोक देवनार येथे स्थलांतरित झाले. पुढे १० ऑगस्ट १९७२ रोजी देवनार कत्तलखान्यातील प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. त्यानंतर डॉ.बेलुर तेथे कत्तलखान्याचे महाव्यवस्थापक म्हणून सर्व विभागांवर देखरेख करू लागले. त्यांनी आरोग्यरक्षक अटींवर आधारित मांसाची हाताळणी करण्यासंबंधी कत्तलखान्यातील सर्व कर्मचार्‍यांना खास प्रशिक्षण दिले. जंतूविरहित वातावरण, शास्त्रीय पद्धतीचा अवलंब, प्रशिक्षित कर्मचारी इ. कारणांमुळे देवनार कत्तलखाना देशातील एक अत्याधुनिक कत्तलखाना म्हणून ओळखला जाऊ लागला.

              देवनार कत्तलखान्यातून मलेशिया, मॉरिशस व मध्यपूर्व देशांना मांसाची निर्यात करण्यात डॉ.बेलुर यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये व चर्चासत्रांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले गेले. डेन्मार्कमधील कोपनहेगन येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांनी भारताचे प्रतिनिधी म्हणून महत्त्वपूर्ण व लक्षणीय  कामगिरी बजावली. डॉ.बेलूर १९८१मध्ये स्वेच्छेने सेवानिवृत्त झाले.

- संपादित

बेलुर, गासप्पा माजप्पा