Skip to main content
x

बेंद्रे, दत्तात्रेय रामचंद्र

     दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील केळशीचे. कारणपरत्वे त्याचे कुटुंब तासगाव, शिरहट्टी व धारवाड येथे स्थायिक झाले. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण धारवाड येथे झाले. बी.ए.ची पदवी फर्गसन महाविद्यालय पुणे येथून घेतली तर एम.ए.ची पदवी मुंबई विद्यापीठातून प्राप्त केली. ‘अंबिकातनयदत्त’या टोपणनावाने त्यांनी लिखाण केले. त्यांना संतवाङ्मयाचा परिचय त्यांच्या आईमुळे झाला.

     १८१८ ते १८३२ या काळात व्हिक्टोरिया हायस्कूल, धारवाड येथे तसेच राष्ट्रीय शाळा धारवाड आणि गदग, हुबळी येथे शिक्षक म्हणून काम केले. १९४३नंतर न्यू इंग्लिश स्कूल (पुणे) येथे इंग्रजीचे अध्यापक आणि कॉमर्स कॉलेज (पुणे) येथे भाषासाहित्याचे प्राध्यापक म्हणून काम केले. तत्पूर्वी १९३२ साली ‘नरबली’ या कवितेमुळे त्यांना तुरुंगवास आणि अज्ञातवास भोगावा लागला.

     १९४४ ते १९५६ ह्या काळात डी.ए.व्ही.कॉलेज सोलापूर येथे ते कन्नडचे प्राध्यापक होते. १९५६ ते १९६६ ह्या काळात धारवाड आकाशवाणीवर साहित्य सल्लागार म्हणून काम केले. काही काळ जीवन, कर्नाटक, वाग्भूषण, स्वधर्म या कन्नड पाक्षिकांचे संपादन केले. मातृभाषा मराठी असली, तरी १९१६च्या आधीपासूनच त्यांनी मराठी, कन्नड, इंग्रजी व संस्कृत ह्या भाषांमधून काव्यरचना केली.

     मराठी गद्यपद्यसंग्रह- ‘संवाद’ (१९६५), ‘विठ्ठलसंप्रदाय’ (१९६५), ‘संतमहंंतांचा पूर्ण शंभू विठ्ठल’ (१९८०) हे त्यांचे उल्लेखनीय मराठी ग्रंथ होत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कानडी या चार भाषांमधून लेखन केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सांसारिक, समीक्षक, कवी, तत्त्वज्ञ असे विविध पैलू दिसून येतात. मात्र काव्य हाच त्यांच्या प्रेमाचा विषय आहे.

     ‘नाकुतंती’ या काव्यसंग्रहात मी, तू, ते आणि कल्पक आत्मा ही कवीच्या व्यक्तिमत्त्वाची चार अंगे दिसून येतात. कवीचे व्यक्तिमत्त्व या चार तत्त्वांचा शोध आध्यात्मिक आणि सौंदर्यात्मक अनुभवांच्या क्षेत्रात घेते. शब्द, अर्थ, लय आणि सहृदयवर्णन या काव्याच्या चार मूल घटकांचे वर्णन. ऐंद्रिय, कल्पनात्मक, बौद्धिक व आदर्शात्मक ही त्यांच्या सौंदर्यकल्पनेची चार अंगे.

     रवींद्रनाथ टागोर आणि योगी अरविंद यांच्याविषयी अपार श्रद्धा त्यांचे ठायी होती. सर्त्रचाही त्यांनी अभ्यास केला होता.

     योगी अरविंदाचे साहित्य आणि तत्त्वज्ञान यांवर बेंद्रे यांनी ‘साहित्य- द विराट स्वरूप’ यामध्ये विवेचन केले आहे. त्यांनी लोकपरंपरांचा वापर करून कन्नड भाषेला सामर्थ्य प्राप्त करून दिले आणि मानवी भावनांच्या आणि अनुभवांच्या आविष्काराचे साधन म्हणून कन्नड भाषेला स्थान प्राप्त करून दिले. त्यांच्या कन्नड कवितेने गूढवादाचा शोध घेतला, तसेच निसर्ग, प्रेम, देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि आध्यात्मिक चिंतन हेही त्यांच्या काव्याचे विषय झाले. त्यांना गांधीयुगातील सर्वश्रेष्ठ स्वच्छंदतावादी कवी मानले जाते.

     बेंद्रे यांना मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत.

     ‘संवाद’ (१९६५ मराठी गद्यपद्य संग्रह)- न.चिं.केळकर पुरस्कार मिळाला. ‘अरळुमरळु’ला (१९५८) साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. १९९८साली भारत सरकारने ‘पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला.

     मातृभाषा मराठी असूनही त्यांनी कानडी भाषेत साहित्यनिर्मिती केली, त्यामुळे कवी बेंद्रे ही महाराष्ट्राने कर्नाटकला दिलेली खास देणगी आहे, असे मानले जाते. जशी रवींद्रनाथ टागोरांमुळे बंगाली भाषेला प्रसिद्धी मिळाली, तशी बेंद्रे यांच्यामुळे कानडी भाषेला प्रसिद्धी मिळाली. म्हणूनच त्यांना ‘कर्नाटकाचे टागोर’ म्हणून गौरवले जाते.

     - डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर

बेंद्रे, दत्तात्रेय रामचंद्र