बेर्डे, प्रिया लक्ष्मीकांत
ग्रामीण बाजाच्या भूमिका करताना लागणारा रांगडेपणा, तरीही चेहऱ्यावर दिसणारा गोडवा, गालावर पडणारी खळी आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर थोड्याच कालावधीत प्रेक्षकप्रिय झालेल्या अभिनेत्री म्हणजे प्रिया अरुण कर्नाटकी. यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला, पण त्यांचे बालपण मात्र मुंबईत गेले. त्यांचे वडील अरुण कर्नाटकी हे दिग्दर्शक होते, तर आई लता अरुण या उत्तम अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक नाटकांमधून कामे केली होती. मुंबईतील राजा शिवाजी विद्यालयातूून प्रिया यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बेबी नंदा या अभिनेत्री आत्याच्या मार्गदर्शनाने व माया जाधव या मामीकडे प्रिया अरुण नृत्य शिकल्या. माया जाधव यांच्यासमवेत वयाच्या १२ व्या वर्षापासून प्रिया अरुण यांनी नृत्याचे कार्यक्रम केले. त्यासाठी त्या पॅरिस, मॉरिशस, स्वीत्झर्लंड आदी देशांमध्ये जाऊन आल्या.
या कार्यक्रमांमध्ये नृत्य करत असतानाच त्यांना व्ही. शांताराम यांच्या ‘तेरा पन्ने’ या हिंदी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे हे काम चालू असतानाच त्यांना गिरीश घाणेकर व सचिन पिळगावकर यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ (१९८८) या चित्रपटातील भूमिकेसाठी विचारले. पण या वेळी त्यांना वयाची अठरा वर्षेही पूर्ण झालेली नसल्यामुळे या चित्रपटाच्या करारनाम्यावर त्यांच्या वडिलांनी - अरुण कर्नाटकी यांनी सही केली. या चित्रपटातील ग्रामीण ‘कमळी’ त्यांनी नेटकेपणाने रंगवली. या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांना ग्रामीण ढंगाच्या भूमिकाच प्रामुख्याने मिळत गेल्या. त्यात ‘थरथराट’ (१९८९), ‘येडा की खुळा’ (१९९१), ‘शेम टू शेम’ (१९९३), ‘बजरंगाची कमाल’ (१९९४) या चित्रपटांची नावे घ्यावी लागतील. यात त्यांना साथ लाभली ती सहकलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांची. आणि पुढे तर अनेक चित्रपटांमध्ये ही जोडी वारंवार दिसत गेली.
‘जत्रा’ (२००६) या विनोदप्रधान चित्रपटात प्रिया अरुण यांनी सरपंचाची भूमिका साकारली. संपूर्ण चित्रपट विनोदावर आधारित असूनही ही सरपंच स्त्री गंभीर प्रवृत्तीची दाखवली आहे. आजूबाजूला घडणाऱ्या सर्व घटना हास्यप्रधान असूनही त्याचा आपल्या अभिनयावर परिणाम न होऊ देता गंभीर भूमिका साकारण्याचे तंत्र प्रिया बेर्डे यांनी या चित्रपटात सातत्याने सांभाळलेले दिसते. ‘फुल थ्री धमाल’ (२००८) या चित्रपटात दैनंदिन आयुष्याला कंटाळलेल्या आणि काहीतरी नवीन करण्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आचवलेल्या तीन मैत्रिणींपैकी एकीची भूमिका प्रिया बेर्डे यांनी केली. ‘जोगवा’ (२००९) या चित्रपटात त्यांनी मुख्य देवदासी स्त्रीची भूमिका केली. ‘चल धर पकड’ (२०१०) या ग्रामीण पार्श्वभूमीच्या चित्रपटातही त्यांनी केलेली भूमिका वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘नटरंग’मधील (२०१०) त्यांनी साकारलेली आईही तंतोतंत उतरली आहे. याच दरम्यान त्यांनी ‘तमाशा’ या चित्रपटात फडावर नाचणाऱ्या तमासगिरिणीची केलेली भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील वेगळ्या धाटणीची भूमिका होती. ग्रामीण ढंगाच्या भूमिकांमधून त्यांनी सातत्याने कामे केलेली असली, तरी त्या पार्श्वभूमीवर तमासगिरिणीची त्यांची भूमिका वेगळेपणाने उठून दिसते.
प्रिया बेर्डे यांनी छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवले आणि ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कोन’ या चित्रपटांमध्येही कामे केली. मराठी व हिंदी चित्रपटात काम करत असतानाही त्यांनी दूरदर्शनवरच्या मालिकांमध्ये काम करणे चालूच ठेवले. ‘अजूनही चांदरात आहे’ या स्टार प्रवाहच्या मालिकेत त्यांनी कर्नाटकी पद्धतीची आऊसाहेब रंगवली.
आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत व्यग्र असतानाही त्या चित्रपट महामंडळाच्या संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. तसेच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावाने स्थापन केलेल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही त्यांनी केले आहे. 'रंपाट', 'मला आण्णा व्हायचंय', 'योद्धा', 'बोकड' अशा काही चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आहेत. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आणि त्या प्रिया बेर्डे या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.
- संपादित