बनहट्टी, श्रीनिवास नारायण
श्रीनिवास नारायण बनहट्टींचा जन्म पुण्यात झाला. १९१७मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयामधून ते संस्कृत व मराठी विषयात एम.ए नंतर एल्एल.बी. झाले. सुरुवातीस एल्फिन्स्टन महाविद्यालयात व्याख्याते म्हणून रुजू झाले. १९२७ साली नागपूरच्या मॉरीस कॉलेजात मराठीचे पहिले प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. याच काळात त्यांनी आपल्या लेखनास सुरुवात केली. ‘रत्नाकर’ मासिक, ‘मनोरंजन’, ‘लोकशिक्षण’, ‘प्रतिभा’ इत्यादी तत्कालीन महत्त्वाची नियतकालिके यांतून त्यांनी लेखन केले. १९३१मध्ये ‘नवभारत ग्रंथमाला’ व १९३४मध्ये ‘सुविचार प्रकाशन मंडळ’ या आपल्या प्रकाशन संस्थेची त्यांनी स्थापना केली. नवभारत ग्रंथमालेतर्फे त्यांनी वि.रा.शिंदे, केतकर, मिराशी, पेंडसे, कोसंबी अशा अनेक लेखकांचे ग्रंथ प्रसिद्ध केले. १९३४ ते १९३८ या काळात ‘विहंगम’ मासिक आणि १९४८ ते १९५१ या काळात ‘समाधान’ साप्ताहिक ह्यांचे त्यांनी संपादन केले. त्यांचे लेखन चतुरस्र स्वरूपाचे असून ज्ञानाच्या विविध शाखांत त्यांनी बहुमोल भर घातली.
लोकमान्य टिळकांची धर्मविषयक मते’ हा निबंध वयाच्या तेविसाव्या वर्षी लिहून ‘टिळक स्वराज्य संघा’तर्फे १९२४ साली त्यांनी तिसरे बक्षीस मिळविले. ब्रिटिश साहित्यकार जेम्स मॅथ्यू, रॉबर्ट लुई स्टिव्हन्सन यांच्यावर चरित्रपर लेखन करून उत्तम साहित्यनिर्मिती केली.
आगरकर यांच्याविषयी सखोल अभ्यासपूर्ण लेखन त्यांनी केले तर ‘मराठी नाटक व रंगभूमी’ याविषयीचे खोल वैचारिक संशोधनात्मक लेखन त्यांनी सातत्याने केले. ज्ञानेश्वरीविषयीचे संशोधन आणि काही प्राचीन ग्रंथांची संपादने त्यांनी परिश्रमपूर्वक हातावेगळी केली.
‘मयूर काव्यविवेचन’ (१९२६) हा त्यांचा पहिला ग्रंथ, ‘ज्ञानोपासना व भारतीयांचे कर्तव्य’ (१९३१), ‘टिळक आणि आगरकर’ (१९५७), ‘मराठी रंगभूमीचा इतिहास’ खंड १ व २, ‘मराठी नाट्यकला व नाट्यवाङ्मय’ (१९५९) ‘नाट्याचार्य देवल’, ‘नाट्यवाङ्मयातील नवे प्रवाह’, ‘नाट्यकलेचा नवोदय’ ‘नाट्यवाङ्मयाचा विकास’, ‘मराठी रंगभूमीचा उत्कर्ष’ असे नाट्यकलाविषयक संशोधनात्मक ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांची चौफेर दृष्टीने विचार करण्याची ताकद त्यांच्या लेखनातून प्रतीत होते. आजही हे ग्रंथ अभ्यासकांना मौलिक आधार देणारे ग्रंथ म्हणून मानले जातात.
‘श्लोक केकावली’ (१९५३), ‘आज्ञापत्र’ (१९६५), ‘नलदमयंती स्वयंवराख्यान’, ‘विष्णुपती’ (चिपळूणकरांच्या निवडक लेखांचे संपादन) अशी महत्त्वपूर्ण संपादने त्यांनी केली. याबरोबरच ज्ञानेश्वरीच्या पहिल्या, सातव्या व बाराव्या अध्यायांचे संपादन व प्रस्तावना यावरून त्यांच्या चिकित्सक लेखनाचा प्रत्यय येतो.
इतके चतुर्विध लेखन करीत असताना १९४५मध्ये आपली नोकरी सोडून ते गांधींच्या चळवळीत शिरले. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी भारतीय राज्य घटनेच्या भाषांतर समितीचे व भारतीय परिभाषा समितीचे सदस्य म्हणून कार्य केले.
१९६२ मध्ये त्यांची आकाशवाणीवरची व्याख्याने गाजली. १९७४मध्ये जोडयात्रा हे त्यांचे खुसखुशीत व नेटके प्रवासवर्णन प्रसिद्ध झाले. ‘आदरांजली’ (१९५७) या वैचारिक लेखसंग्रहात त्यांनी लोकमान्य टिळक, न.चिं.केळकर, महर्षि कर्वे, महात्मा फुले, पांगारकर, केशवसुत आदी महत्त्वपूर्ण लेखकांच्या कर्तृत्वाची ओळख करून दिली आहे.
श्री.ना.बनहट्टी हे मराठी वाङ्मयातील मराठी भाषेचे एक अधिकारी विद्वान, यशस्वी प्राध्यापक, साहित्याचे रसज्ञ समीक्षक, नाट्यवाङ्मयाचे मर्मज्ञ विमर्शकार म्हणून मानले जातात. विदर्भ साहित्य संघ उभा करण्यात आणि युगवाणी या संघाच्या मुखपत्राची जडणघडण करण्यात त्यांनी मोलाचे योगदान केले.
- रागिणी पुंडलिक