बोके, चंद्रप्रभा नरेंद्र
चंद्रप्रभा नरेंद्र बोके यांचा जन्म अमरावती येथे झाला. त्यांचे सासर व माहेर दोन्हीही कुटुंबे व्यवसायाने शेतकरी . त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले व उच्च शिक्षण एम.ए.,बी.एड.पर्यंत झाले. त्यांना तीन मुली व एक मुलगा अशी अपत्ये आहेत. त्यांनी पहिल्यापासूनच स्वतःला शेती व्यवसायाकडे झोकून दिले. त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतून ग्रामविकासाचा कानमंत्र मिळाला. तसेच त्या नेहमी कृषिक्रांतीचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या संपर्कात राहिल्या व त्यांनी शेतीची आवड जोपासली. संत्रा बागांचे पुनर्वसन व ऊस लागवडीची व्याप्ती वाढवणे आदी कार्यक्रम त्यांनी अग्रक्रमाने घडवले . त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये सेंद्रिय खते वापरून कापूस, तूर व गहू, हळद व भाजीपाला पिके घेतली आणि शेतकऱ्यांना सेंद्रिय खते वापरण्याविषयी प्रवृत्त केले. त्यांनी तिवसा येथे संत्रा बागायतदार शेतकऱ्यांची एक सहकारी संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत त्या संत्र्याच्या बागायतदारांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे व बागायतदारांच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करत. त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये ऊस लागवडीसाठी प्रयत्न केले आणि २००३ साली विदर्भ शुगर मिल स्थापण्याचा उपक्रम केला. त्यांच्या कारखान्याची गाळप क्षमता ५० हजार मेट्रिक टनपर्यंत पोहोचलेली आहे. ग्रामीण क्षेत्रातील अल्पभूधारक, निराश्रित महिलांना केंद्र तथा राज्य सरकारच्या योजनेतून आर्थिकदृष्ट्या स्वयंनिर्भर करण्याचे कार्य त्या करतात. त्यांची या कार्याची आणि कृषी विकासकार्याची दखल घेऊन त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई पुरस्कार (१९९३-९४), पंडिता ताराबाई शिंदे पुरस्कार (१९९९), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्य पुरस्कार (२००२), सेंद्रिय शेती शिल्पकार पुरस्कार (२००३), तेजस्विनी पुरस्कार (२००७), शारदा उद्योग मंदिर पुरस्कार (२००९) आदी पुरस्कार प्रदान करून गौरव केला आहे. त्यांनी जिल्ह्यामध्ये जिजामाता स्त्रीमंडळ व समाधान मंडळ, जागृत महिला मंडळ व मायबाई महिला मंडळाची स्थापना केलेली आहे. अमरावती येथे त्यांनी शारदा उद्योग मंदिर संस्थेमार्फत गृह उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कार्यक्रमामुळे शेकडो महिलांना दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन व विविध गृह उद्योगांतून स्वयंनिर्भरता प्राप्त झाली आहे. महिलांना आर्थिक स्वयंपूर्णता लाभल्यामुळे त्यांचे जीवनमानही सुधारले आहे. महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आयुष्य व्यतीत करण्याच्या कल्पनेतून ‘मायबाई’ हे नाव कृतीतून त्या सार्थकी लावताना दिसतात .