बोरकर, शामसुंदर धनीराम
शामसुंदर धनीराम बोरकर यांचा जन्म भंडारा जिल्ह्यातील कवलेवाडा येथे झाला. त्यांनी १९५३मध्ये नागपूर विद्यापीठामधून बी.ए. पदवी संपादन केली. लालबहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ या नाऱ्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी घरची शेती ‘व्यवसाय’ म्हणून करण्याचे निश्चित केले आणि शेतीमध्ये सातत्याने नवीन तंत्रे व नवीन जाती यांचा वापर करून विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली. या प्रयोगशील वृत्तीमुळे १९६१-६२ आणि १९६६-६७ मध्ये १०६३३ किलो हेक्टरी भाताचे उत्पादन घेऊन देशामध्ये सर्वोच्च विक्रम केला. त्याबद्दल केंद्र सरकारतर्फे त्यांना अखिल भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते कृषी पंडित पुरस्कार दिला होता. याच विक्रमी उत्पादनाबद्दल त्यांना ‘एस्कॉर्ड ३७-ट्रॅक्टर’ यांचा सुब्रमणियम् पुरस्कार देऊन गौरवले. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष या पदापर्यंत अनेक समित्यांवरील मुख्य व महत्त्वाची पदे भूषवली.
आपल्या परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांची मुले ज्ञानापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांनी बॅकवर्ड क्लासेस शैक्षणिक व सांस्कृतिक सुधारणा मंडळ या शैक्षणिक संस्थेची स्थापना करून विद्यादानाच्या कार्यास सुरुवात केली. आज या संस्थेचे प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये असे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक जाळे पसरलेले आहे. कृषी तंत्रज्ञान समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. या एकाच ध्यासाने शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्यरत होते.