Skip to main content
x

बोरोले, मुकुंद निनू

         मुकुंद निनू बोरोले यांचा जन्म मलकापूर तालुक्यातील  (त्या वेळच्या मध्य प्रदेश) टेंभी (जहागीरपूर) येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण जन्मगावीच खडतर परिस्थितीत झाले. यानंतर ते १९५१मध्ये मध्य प्रदेश कृषी विभागात कृषी सहाय्यक म्हणून नोकरीस लागले. त्यांची १९५३मध्ये कीटकशास्त्र विषयात एम.एस्सी. (कृषी) करण्यासाठी निवड झाली. या दरम्यान भाषावार प्रांत रचना होऊन मध्य प्रदेशातील विदर्भ विभाग महाराष्ट्राला जोडला गेला. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते नागपूर येथील कृषी महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

         मुकुंद बोरोले यांनी नोकरीच्या काळात कीटक नियंत्रणाच्या कार्यात विविध मोहिमांमध्ये मोलाचे कार्य केले. त्यातील प्रमुख मोहिमा म्हणजे कोकणातील भातावरील खोडकिडा, विदर्भातील संत्र्यावरील सायला, कपाशीवरील बोंडअळी आणि भुईमुगावरील मावा यांच्या निर्मूलन मोहिमा होत.

         अमरावती विभागात कपाशीवर मोठ्या प्रमाणावर  किडींचे आक्रमण झाले तेव्हा बोरोले यांनी हवाई फवारणीचे कार्य हाती घेऊन पिकांचे संरक्षण केले. अशा प्रकारच्या अनुभवांनी संपन्न असल्यामुळे त्यांची एन्टोमोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याशिवाय महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना बुलढाणा जिल्ह्यासाठी नियोजन आणि विकास समितीवर सभासद म्हणून नेमण्यात आले. बोरोले भारतात विविध ठिकाणी होणार्‍या कीटकशास्त्रावरील चर्चासत्रांत सक्रियपणे  सहभागी होतात.

- संपादित

बोरोले, मुकुंद निनू