Skip to main content
x

बोरुडे, साहेबराव गणपत

        साहेबराव गणपत बोरुडे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील पारगावसुद्रिक येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रयोगशील शेतकरी होते. साहेबराव यांचे प्राथमिक शिक्षण बोरुडेवाडी, पारगावसुद्रिक  या ठिकाणी झाले. पुणे इंग्लिश स्कूलमधून एस.एस.सी. झाले व पुणे येथील शेतकी महाविद्यालयातून बी.एस्सी.(कृषी) १९६०साली झाले. १९६७ साली एम.एस्सी. (कृषी) नागपूर विद्यापीठातून पूर्ण केली.   

        बोरुडे यांनी एम.एस्सी.च्या काळात पीक विमा या विषयावर संशोधन केले. शासनातर्फे पीक विम्याच्या योजना राबवून शेतकऱ्यांना  संरक्षण दिले जाते. नंतर त्यांची दापोली येथे कृषी -अर्थशास्त्र विषयाचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी १९९३मध्ये कृषी -अर्थशास्त्र विषयातून पीएच.डी. पदवी मिळवली. या काळात त्यांनी प्रमुख अन्वेषक म्हणून कार्य केले. पीक उत्पादन खर्च, आंब्याची विक्री व्यवस्था, आंबा, नारळ, काजू, सुपारी यांवरील प्रक्रियेचे अर्थशास्त्र, विहीर व मोटार पंप यांवरील भांडवल गुंतवणूक, सहकारी बँका व व्यापारी बँकांमार्फत अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज, दुग्धोत्पादन खर्च व विक्री व्यवस्था, भाजीपाला उत्पादन खर्च व विक्री व्यवस्था, फूल पिकांचे अर्थशास्त्र, शेतकरी कुटुंबांना रोजगाराची उपलब्धता, मच्छीमार बोटींचे अर्थशास्त्र, नियोजन काळातील कृषि-विकास, कोकणातील लोकांची आहार पद्धती व पौष्टिकता अशा स्थानिक प्रश्‍नांवर त्यांनी अर्थशास्त्रीयदृष्ट्या संशोधन केले.

        ग्रामीण भागातील ग्राहकांच्या आवडीनिवडी व प्राधान्यक्रम, महाराष्ट्रातील पशुधन व पशुधन उत्पादने यांची विक्री व्यवस्था, भारतीय आयुर्विमा महामंडळाची महाराष्ट्र व गुजरात या राज्यांत विम्याची विक्री व्यवस्था व प्रसार या विषयांतीलही प्रकल्प त्यांनी पूर्ण केले.

        नोकरीच्या काळात कृषीविषयक अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये त्यांनी संशोधनपर लेख प्रसिद्ध केले. ‘बळीराजा’ या मासिकातही त्यांनी नियमितपणाने लेखन केले आहे. त्यांनी सेवानिवृत्तीपूर्वी १९९२ ते १९९४ या काळात महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही काम पाहिले.

- वर्षा जोशी-आठवले

बोरुडे, साहेबराव गणपत