Skip to main content
x

बोस, कृष्णम्माचारी

                भारतीय समकालीन दृश्यकला क्षेत्रातील कलाकार व कलासंयोजक (आर्ट क्युरेटर) म्हणून परिचित असलेल्या कृष्णम्माचारी बोस यांचा जन्म व शालेय शिक्षण केरळमध्ये झाले. त्यांनी १९८४-८५ मध्ये केरळ कला पीठम्, कोची येथून कलाविषयातील पदविका प्राप्त केली. त्यानंतर १९८६ ते १९९१ या काळात त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून बी.एफ.ए (फाईन आर्ट) ही पदवी प्राप्त केली. जे.जे मध्ये पेन्टिंग शिकण्याच्या काळात आणि त्यानंतरही अकबर पदमसी, लक्ष्मण श्रेष्ठ, गीव्ह पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ चित्रकारांशी आणि रियाझ कोमू, प्रभाकर कोलते, अतुल दोडीया, सुदर्शन शेट्टी, अशा समकालीनांशी त्यांचा संवाद होत असे. त्यातून कृष्णम्माचारी बोस यांचा आत्मविश्‍वास वाढला. बोस यांनी १९९९ ते २००० या काळात गोल्डस्मिथ कॉलेज, लंडन येथून ‘मास्टर्स इन व्हिज्युअल आर्ट’ ही पदवी प्राप्त केली. लंडनमधील वास्तव्यात पाहिलेल्या ब्रिटिश आधुनिक कलेने त्यांना प्रभावित केले.

कृष्णम्माचारी बोस यांचा केरळमधून मुंबईसारख्या शहरामध्ये येण्याचा प्रवास म्हणजे जीवनशैली व समाज संस्कृतीमधल्या विविध विचारधारणा समजून घेण्याचा एक अनुभव होता. केरळमध्ये असताना चित्रकलेबरोबर त्यांना चित्रपट, नाट्य, संगीत, साहित्य आदी कलांविषयी आकर्षण होते. या पायावर त्यांची आजची कलानिर्मिती उभी आहे. आज मूर्त-अमूर्त चित्रे, रेखाटने, शिल्पे, छायाचित्रे आणि मल्टिमिडीया मांडणशिल्प अशा अनेक माध्यमांची सांगड घालणारे असे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे.

त्यांनी १९९० मध्ये प्रदर्शित केलेल्या चित्रांमधली पांढर्‍या परफोरेटेड कागदावर पाठपोट काढलेली ‘मिनिमॅलिस्टिक’ शैलीतील चित्रे त्यांच्या चित्रनिर्मितीमधला महत्त्वाचा टप्पा ठरली. यानंतरचे त्यांचे महत्त्वाचे कलाप्रदर्शन म्हणजे १९९२ सालातील ‘अॅम्युझियम’ हे होते. यामध्ये काही चित्रे व काव्य असलेल्या स्पायरल बाउंड वह्यांची, व हे होते. अशा कलाकृतींची मालिका होती. कलावस्तुसंग्रहालयातील काचेच्या खोक्यांप्रमाणे असणाऱ्या खोक्यांतून त्यांनी या कलाकृती प्रदर्शित केल्या. साहित्य, संकल्पन आदींच्या एकत्रीकरणामधून म्यूज (काव्य देवता), यूज (वापर), अॅम्यूज (मनोरंजन) अशा तीन घटकांचे एकत्रीकरण  त्यात होते. पुढे एका मांडणशिल्पात त्यांनी मुंबईकरांचे जेवणाचे डबे, धातूचे हँडल, दिवे आणि कामगारांचे हातमोजे, सोने यांचा वापर करून अशाच काचेच्या खोक्यांमधून त्या वस्तू प्रदर्शित केल्या.

यानंतरच्या एका प्रदर्शनात त्यांच्या घरासाठी काम करणाऱ्या कामगारांची ‘बॉल पाँईट’मध्ये केलेली व्यक्तिचित्रे व एकशेआठ छायाचित्रे त्यांनी प्रदर्शित केली. ही व्यक्तिचित्रे व छायाचित्रे या कामगारांच्या आणि सर्वसामान्य मुंबईकरांच्या आयुष्याविषयी सांगू पाहतात.  ‘बिब्डर्स अँड द रेड कार्पेट’ या मांडणशिल्पात त्यांनी लांब लाल टेबल व त्यावर ठेवलेले १०८ ध्वनिक्षेपक आणि खुर्च्या यांच्या साहाय्याने पत्रकार परिषदेचा देखावा उभा केला. यातील टेबलांमागील तेरा पांढर्‍या खुर्च्यांना लिओनार्दो दा व्हिंचीच्या ‘लास्ट सपर’ या भित्तिचित्राचा संदर्भ होता. आर्थिक आणि राजकीय शक्तींचा समाजावरचा प्रभाव आणि चोवीस तास चालणार्‍या बातम्यांच्या वाहिन्या यांच्याविषयी या मांडणीशिल्पातून भाष्य केले गेले.

कृष्णम्माचारी बोस यांच्या कलाकृती भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रदर्शित झाल्या आहेत. या व्यतिरिक्त जगभरात न्यूयॉर्क, लील (फ्रान्स), दुबई, टोकियो इत्यादी ठिकाणी त्यांच्या कलाकृतींची प्रदर्शने झाली आहेत. बॉम्बे आर्ट सोसायटी पारितोषिक (१९९१ व १९९२), ब्रिटिश कौन्सिल अॅवॉर्ड (१९९३) एम.ए.ए.ए. - युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका पारितोषिक (१९९६), चार्ल्स वॉल्स (इंडिया) पारितोषिक - लंडन विद्यापीठ (२०००) हे त्यांना मिळालेले काही उल्लेखनीय सन्मान आहेत.

कृष्णम्माचारी बोस हे समकालीन भारतीय दृश्यकला जगतात कलासंयोजक (आर्ट क्युरेटर) म्हणूनदेखील परिचित आहेत. क्युरेटर ही एक प्रकारची जबाबदारी असते, असे ते मानतात. ही जबाबदारी उचलायला पुढे यायला हवे, पण आपल्याकडे तसे व्यासपीठ आजतरी उपलब्ध नाही, म्हणूनच इतर पर्यायांचा शोध घ्यावा लागतो, असे त्यांना वाटते. त्यांनी २००३ मध्ये ९४ भारतीय कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश असलेले ‘द क्युरेटिंग’ या प्रदर्शनाचे संयोजन केले. त्यासाठी तीन वर्षाचा संशोधन कालावधी लागला. अशा प्रदर्शनातून नवीन कलाकारांना हेरून त्यांना प्रस्थापित कलाकारांच्या बरोबरीने व्यासपीठ मिळवून देण्याचे काम कृष्णम्माचारी बोस करत आहेत.

सैद्धान्तिक संकल्पना आणि विचार यापेक्षा कलाकाराने प्रत्यक्ष कामाला महत्त्व द्यायला हवे, असे ते मानतात. कार्ल मार्क्सचे माणसाच्या कर्तृत्वशक्तीबद्दलचे हे तत्त्व त्यांना महत्त्वाचे वाटते. त्यांची कलानिर्मितीची नाळ इतिहासाशी जोडलेली असते. आपण जर इतिहासाबद्दल अनभिज्ञ असू, तर कलेचा अवाका कळणे कठीण आहे, असे ते म्हणतात. कला स्थानिक (लोकल) असण्यावर त्यांचा विश्‍वास नाही. त्यांच्या मते कला ही जागतिकच असते, असायला हवी. कलेचा आस्वाद घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला चित्रे रंगवण्याचा अधिकार आहे. बोस यांच्या मते कला ही प्रत्येकाची भाषा आहे. कृष्णम्माचारी बोस समकालीन दृश्यकलेतील मधल्या फळीच्या कलावंतांचे प्रतिनिधित्व करतात.

- माणिक वालावलकर

 

बोस, कृष्णम्माचारी