Skip to main content
x

बर्वे, अनिल सदाशिव

     साहित्य आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रांना अल्प कारकिर्दीत आपल्या लेखनाचे नवे परिमाण देणार्‍या अनिल सदाशिव बर्वे यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण बीड, जालना, औरंगाबाद येथे झाले. अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. झाले. शालेय जीवनापासूनच त्यांना लेखनाचे विलक्षण वेड होते. १९६७पासून त्यांनी लेख लिहिण्यास सुरुवात केली. आपल्या परखड आणि स्वतंत्र विचारांना मुक्त व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांनी १९६७मध्ये ‘संग्राम’ तर १९७३मध्ये ‘रणांगण’ नावाचे पाक्षिक काढले आणि त्यातून शोषित पीडितांच्या अन्यायाला समाजाच्या वेशीवर टांगले. १९७०मध्ये ‘फुलवा’ नावाचे सिनेसाप्ताहिक काढले.

     १९७३ साली त्यांची ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ ही कादंबरी प्रकाशित झाली. ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ ते ‘फाशी गेट’ १९७५पासून १९८७पर्यंत त्यांच्या एकूण आठ कादंबर्‍या प्रकाशित झाल्या. त्यांच्या जवळ-जवळ सर्वच कादंबर्‍या समकालीन वास्तव घटनेतून साकारल्या आहेत. ‘अकरा कोटी गॅलन पाणी’ चासना येथील कोळसा खाणीतील हादरवून टाकणार्‍या घटनेच्या संदर्भातून तर ‘आतंक’ तुरुंगातील एका कैद्याच्या भेटीतून अपरिचित अशा विषयांची मांडणी वाचकांसमोर ठेवते. समकालीन कादंबरीकार भालचंद्र नेमाडे, श्री.ना.पेंडसे, भाऊ पाध्ये ह्यांच्या साहित्यापेक्षा बर्वे यांची कादंबरी पूर्णतः वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे, याचा प्रत्यय येतो. अनिल बर्वे यांचे साहित्य गुजराती, हिंदी, उडिया, तेलगू, मल्याळम, उर्दू, पंजाबी इत्यादी भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. त्यांच्या अनुवादित नाटकांचे रंगभूमीवर अनेक प्रयोग यशस्वी झालेले आहेत.

     पत्रकार बर्वेही ललित लेखनाइतकेच सामर्थ्यवान होते. आंध्रमधील नक्षलवादी चळवळ, बांगला देश युद्ध, चासनाला कोळसा खाण अपघात इत्यादी विषयांवरच्या त्यांच्या लेखमाला अतिशय गाजल्या. रिपोर्टाज लेखन प्रकाराचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणूनही या लेखमालांचे विश्लेषण केले गेले. या सर्व लेखनावर मार्क्सवादाचा प्रभाव आहे. भाषासौंदर्यामुळे, वस्तुनिष्ठ आणि परखड भूमिकेमुळे हे लेखन दर्जेदार उतरले आहे.

     ‘रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता’ ते ‘चर्मणावती चंबळ’ या १९७२ ते १९८६ कालखंडातील एकूण पाच लेखमाला म्हणजे केवळ वृत्तान्त नसून ते इतिहासाचे दस्तऐवज आहेत.

     नाटक, कादंबरी आणि रिपोर्टाज या क्षेत्रांत अनिल बर्वे यांनी एक नवा मापदंड निर्माण केला आणि साठोत्तरी मराठी साहित्याला अधिक समृद्ध आणि सधन केले. मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी निधन झाले.

     - रेखा मैड

बर्वे, अनिल सदाशिव