Skip to main content
x

बरवे, प्रभाकर शिवराम

      आधुनिक भारतीय चित्रकला प्रवाहातील स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली प्रस्थापित करणारे, संवेदनशील मनाचे आणि विलक्षण कल्पनाशक्ती असलेले चित्रकार प्रभाकर शिवराम बरवे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील नागाव येथे झाला. वडील शिवराम विश्‍वनाथ बरवे यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेचे शिक्षण घेतले होते व त्यांच्या एका शिल्पाला कांस्यपदकही प्राप्त झाले होते. सुरुवातीला प्रभात स्टुडीओत व नंतर २५ ते ३० वर्षे फिल्मिस्तान स्टुडीओत ते शिल्पकार म्हणून काम करत होते. महाराष्ट्रातील ख्यातनाम शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर हे त्यांचे मामा. प्रभाकर बरव्यांच्या आईचे नाव शांता होते. प्रभाकर बरव्यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. शाळेत असताना एका निबंधस्पर्धेत ‘तुम्हांला कोण व्हावेसे वाटते’ या विषयावर लिहिलेल्या एका निबंधात ‘मला चित्रकार व कलेचे उपासक होऊन आयुष्यभर कलेची सेवा करण्याची इच्छा आहे’, असे त्यांनी लिहिले होते.

     लहानपणी ते नाटकांतून कामे करीत व जादूचे प्रयोगही करत. नानासाहेब करमरकर एकदा सहज घरी आले असताना वडिलांनी बरव्यांना त्यांचे एक स्केच करायला सांगितले. ते बघितल्यावर प्रभाकरने जे.जे. स्कूलमध्ये शिक्षण घ्यावे असा करमरकरांनी आग्रह धरला व शिक्षणाचा खर्च करण्याची तयारीही दर्शवली. ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक प्रभाकर बरव्यांनी करमरकरांनाच अर्पण केले आहे.

     प्रभाकर बरवे यांनी १९५४ मध्ये जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला व १९५९ मध्ये पेंटिंगचा डिप्लोमा घेतला. जे.जे.मध्ये त्या काळात, वॉल्टर ग्रेपियस या जर्मन स्थापत्यकाराने स्थापन केलेल्या बा हाउस या संस्थेत अध्यापनाचे काम करणारे स्विस चित्रकार पॉल क्ली यांच्या शैलीचा व विचारांचा प्रभाव होता. व्ही.एस. गायतोंडे यांच्यावर हा प्रभाव होता. साहजिकच बरव्यांच्या चित्रांवरही पॉल क्लीच्या चित्र घडविण्याच्या प्रक्रियेचा परिणाम झाला. आर्ट स्कूलमधील व नंतरच्या एक-दोन वर्षांतील त्यांच्या जलरंगात असलेल्या कामांत हा प्रभाव विशेष जाणवतो.

     बनारसमधील वास्तव्यात आलेल्या एकाकीपणामुळे कामभावना आणि हिंसा यांच्याबद्दलचा एक सुप्त ध्यास बरवे यांच्या मनात होता आणि तो त्यांच्या चित्रांमधल्या तत्कालीन संकेतांच्या विरोधात जाऊन केलेल्या बंडखोर मांडणीत दिसून येतो. तंत्र आर्टमधील प्रतिमा आणि कामभावनेचा एक अंत:स्तर त्यांच्या चित्रांच्या मांडणीत दिसतो. नंतरच्या काळात अमेरिकेत वॉशिंग्टन येथे त्यांनी पॉल क्लीची सत्तर ते ऐंशी चित्रे एका संग्रहालयामध्ये पाहिली. पॉल क्लीला असलेले लघुचित्रशैलीतील सपाट रंगांचे आकर्षण आणि तंत्र आर्टमधील भौमितिक आकारांचे कुतूहल बरव्यांना तिथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. यानंतरच्या काळात पॉल क्लीची कलातत्त्वे बरवे यांच्या चित्रांमध्ये स्वत:ची सखोल मर्मदृष्टी घेऊन अवतरलेली दिसतात.

     त्यांना १९६१ मध्ये बनारसच्या वीव्हर्स सर्व्हिस सेंटरमध्ये नोकरी लागली. मधल्या दोन-तीन वर्षांत त्यांनी चरितार्थाकरिता थोडी व्यावसायिक कामेही केली; पण त्यांत त्यांचे मन रमले नाही. ते १९६५ पर्यंत  बनारसला होते. ते १९६५ पासून मुंबईच्या वीव्हर्स सेंटरमध्ये काम करू लागले. त्यांचा विवाह १९७० मध्ये प्राची यांच्याशी झाला. त्यांनी १९८१ मध्ये पूर्णवेळ पेंटिंगकरिता स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

     प्रभाकर बरव्यांची नऊ एकल प्रदर्शने झाली व जवळजवळ बारा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांतून त्यांचा सहभाग होता. त्यांचे पहिले एकल प्रदर्शन १९६१ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीत झाले. त्यानंतर अमेरिकेतील विस्कॉन्सीन येथील बुक वे गॅलरीत (१९६३), पंडोल गॅलरी, मुंबई (१९७०), गॅलरी चाणक्य, न्यू दिल्ली (१९७१, १९७८), गॅलरी केमोल्ड (१९७३, १९८३, १९८७, १९९२) याशिवाय १९७६ मध्ये बिनाले (फ्रान्स), गीता कपूर यांनी आयोजित केलेले ललित कला अकादमीचे ‘पिक्टोरिअल स्पेस’, पाचवे आंतरराष्ट्रीय त्रिनाले (१९८२) अशा अनेक प्रदर्शनांतून त्यांची चित्रे दाखविण्यात आली. गॅलरी केमोल्ड येथे १९९५ साली नोव्हेंबरमध्ये झालेल्या सहा चित्रकारांच्या प्रदर्शनात त्यांची जलरंगातील चित्रे होती. बरवे यांचा हा प्रदर्शनातील शेवटचा सहभाग होता. पुढे त्यांच्या निधनानंतर २००० साली बिर्ला सेन्च्युरी आर्ट गॅलरीत ‘इन्सिडेंटल नोटेशन्स’ या एकल प्रदर्शनातून वीव्हर्स सर्व्हिस सेंटरमध्ये १९७२ ते १९७७ च्या दरम्यान बरवे यांनी केलेल्या डिझाइन्सचे प्रदर्शन झाले.

      टोकिओमध्ये १९६९ मध्ये भरलेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय तरुण चित्रकारांच्या प्रदर्शनात त्यांना ‘योमिवी शिमबम्’ हे पारितोषिक मिळाले. त्यांच्या ‘निळा ढग’ (ब्ल्यू क्लाउड) या चित्राला १९७६ मध्ये ललित कला अकादमीचा पुरस्कार लाभला. टिटोग्रॅड, युगोस्लाव्हिया येथे १९८५ मध्ये झालेल्या ‘सिक्स इंडियन पेंटर्स’ या प्रदर्शनात त्यांचा सहभाग होता. यानिमित्त त्यांना आय.सी.सी.आर.ची ग्रँट मिळाली व ते युगोस्लाव्हिया, फ्रान्स आणि तुर्कस्तान येथे जाऊन आले. हा त्यांचा पहिला परदेश प्रवास होता. या प्रवासात त्यांनी अनेक संग्रहालयांना भेटी दिल्या. त्यांना १९८८ साली याडो आर्टिस्ट कॉलनीची रेसिडन्सी फेलोशिप ग्रँट, तसेच अमेरिकेतील प्रवासाकरिता शिष्यवृत्ती मिळाली. त्यांचे ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक मौज प्रकाशनाने १९९० साली प्रसिद्ध केले. वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

      प्रभाकर बरव्यांच्या एकंदर चित्रनिर्मितीचा आणि चित्रशैलीबद्दलचा विचार करताना १९६१ ते साधारण १९७३-७४ पर्यंतचा काळ व त्यानंतरचा काळ असा विचार करावा लागेल. ते १९६१ साली बनारस येथे वीव्हर्स सर्व्हिस सेंटरमध्ये गेले. पुपुल जयकर यांच्या पुढाकाराने भारतीय अभिजात कला, तसेच भारतातील विविध लोकचित्रकलाशैली, प्रतीके यांतून आधुनिक काळाशी सुसंगत रचना करून त्याचा प्रचार करण्याचे उद्दिष्ट या संस्थंने ठेवले होते व त्याकरिता पेंटिंगचे शिक्षण घेतलेले चित्रकार घेतले होते. यामुळे या कामाचा प्रभाव इथे काम करणार्‍या सर्वच चित्रकारांवर पडला.

      बनारसच्या मुक्कामात बरव्यांवर भारतातील तांत्रिक पंथाचा परिणाम झाला. तांत्रिक पंथातील यंत्राच्या आकृत्या; लिंग, योनी इत्यादींचे प्रतीकात्मक आकार यांचाही त्यांच्या चित्रांवर परिणाम झाला. याच काळात भारतीय चित्रकला क्षेत्रात पारंपरिक भारतीय चिन्ह-प्रतीकांचा पाश्‍चात्त्य आधुनिक दृश्यजाणिवांशी मेळ घालण्याचा एक जोरदार प्रयत्न चालला होता. बीरेन डे, संतोष, पळशीकर इत्यादी चित्रकारांचा त्यात समावेश होता. याशिवाय बनारसच्या वातावरणात जाणवत असलेला एकटेपणा, मनातील लैंगिक भावनांचा उद्रेक या मानसिकतेतून त्यांची चित्रे घडत गेली.

      भारतात त्या वेळी अस्तित्वात असलेल्या चित्रकलेबद्दल बरवे फारसे समाधानी नव्हते. पाश्‍चात्त्य शैलीतील ‘कोलाज’, ‘ऑप आर्ट’ या तंत्रांचाही त्यांच्यावर काही काळ पगडा होता. अशा अनेक घटकांनी त्यांची चित्रे घडत गेली. हा स्वत:चा शोध घेण्याचाच एक प्रयत्न होता.

      या काळातील त्यांची ही चित्रे प्रायोगिक स्वरूपातील होती असे म्हणता येईल. तांत्रिक पंथातील रेखांकित, सांकेतिक, भौमितिक आकृत्या व प्रतीके, मधुबनीसारख्या लोकशैलीतील रंग व रेषा अशा पारंपरिक दृश्यघटकांबरोबरच पत्त्यांच्या खेळातील किल्वर, बदाम राणी, काचेचे तुटलेलेे तुकडे, आगपेटीच्या काड्या, सिगारेटच्या पाकिटातील चांदीचा कागद, लाकडी बाहुल्या, कृत्रिम डोळा अशा विविध वस्तूंचा वापर त्यांच्या चित्रांतून होत असे. अशा पद्धतीतली लहान चित्रे ते माउण्ट बोर्डवर करत, नंतर ते ही चित्रे मोठ्या आकारात हार्डबोर्डवर करायला लागले.

      सपाट व लाल-पिवळे असे शुद्ध व तीक्ष्ण रंग व रेषांनी बांधलेले आकार अशा प्रकारच्या त्यांच्या चित्रांत रेषेला विशेष प्राधान्य दिसे. ही रेषा किंचित कंप असणारी असे. ही रेषा १९७६ नंतरच्या पेंटिंगमध्ये दिसून येत नाही. पूर्वनियोजनापेक्षा उत्स्फूर्ततेवर त्यांचा भर असे. त्यांचा रचनाबंध एकाच वेळी मोकळा तरीही बांधीव वाटतो. बरवे १९७२ ते १९७७ पर्यंत वीव्हर्स सर्व्हिस सेंटरच्या मुंबई शाखेत काम करत होते. त्या काळातल्या चित्रांचे प्रदर्शन २००० मध्ये भरवण्यात आले. तंत्र आणि लोककलेशी निगडित अशा प्रतीकात्मक आकारांच्या मांडणीमधून बरवे स्वत:ची चित्रभाषा शोधताना दिसतात.

      ते या तंत्रातून १९७२-७३ नंतर पूर्णपणे मुक्त झाले. त्यांची स्वत:ची एक वेगळी शैली आकार घेऊ लागली. चित्रातील दृश्य अवकाश, वस्तू व अवकाश यांचे नाते, मूर्त-अमूर्त संकल्पना, प्रत्यक्ष वस्तू आणि त्याची मन:पटलावर उमटलेली भावप्रतिमा, रंगछटांची तरलता, भावलेला विशिष्ट रंग अशा काही संकल्पनांतून त्यांची चित्रे घडत गेली. काही चित्रांतून मानवी प्रतिमाही दिसायला लागल्या. विशेषत:, आपल्या नित्य परिचयातील, सभोवतालातील वस्तुरूपेही दिसायला लागली. चित्रातील सपाट अवकाश जाऊन अवकाशाला खोली व विस्तीर्णता लाभली. आकार आणि अवकाशाच्या नाट्याचा एक संवाद होऊ लागला.

      प्रभाकर बरव्यांच्या चित्रांच्या निर्मितिप्रक्रियेत उत्स्फूर्तपणाला विशेष महत्त्व होते. कोऱ्या कॅनव्हासच्या पृष्ठभागावर ‘प्रतिमा’ गोचर होईपर्यंत ते तिष्ठत राहायचे. प्रतिमा दिसल्यावरच रेखांकन करायचे. त्यानंतर त्या प्रतिमेच्या अनुषंगाने इतर आकार-घटक वेगवेगळ्या जागी ठेवून त्यांची रचना पूर्ण होत असे. जणू काही त्या प्रतिमेचा जन्म त्या विशिष्ट कॅनव्हासकरिता व अवकाशाकरिताच झाला आहे.

      विविध वस्तुरूपांची अवकाशात उत्स्फूर्त, पण नीटसपणे मांडणी करून चित्राच्या समग्ररूपाचे भान त्यांच्या चित्रात दिसते. वेगवेगळ्या संदर्भातील वस्तु-रूपांच्या संयोजनातून एक वेगळेच, काहीसे स्वप्नमय गूढ वास्तवापलीकडच्या प्रदेशात जाणारे अतिवास्तव वातावरण त्यांच्या चित्रातून प्रतीत होते. पुरातनकालीन वास्तूंसारख्या दिसणाऱ्या इमारती, बांधकामासाठी रचलेल्या विटांचे ढीग, घाटासारखी बांधलेली जलाशये, वाळूचे, मातीचे ढीग, पुरातनकालीन अवशेष, निसर्ग, पुरातत्त्वकालीन वस्तू आणि रोजच्या वापरातल्या वस्तू त्यांच्या चित्रांतून प्रतिमा होऊन अवतरत.

      बरवे वास्तवातील वस्तूंचे रूपांतर मन:पटलावरील भाव-प्रतिमांमध्ये करीत. कधी त्यांच्या चित्रातील वस्तू जादुई रूपही घेत. ग्रमोफोनमधून झाडाच्या फांद्या उगवत, तर काही वस्तू मानवी चेहर्‍यासारख्या भासत. इंद्रधनुष्य रंगहीन होई. मेंढी एका काचेच्या पेटीतून डोकावताना दिसे, तर कधी झाडाच्या बुंध्यापासून/खोडापासून झाडाचा वरचा भाग अलग होऊन ढगासारखा तरंगताना दिसे. या प्रवाही प्रतिमांमधून बरव्यांच्या कवि-मनाची सर्जनशीलता दिसते. त्यांच्या चित्रांची रचना काहीशी लघुचित्रांसारखी (मिनिएचर) असे. यात यथार्थ-दर्शनाचा उपयोग दिसत नाही, मात्र यथार्थदर्शनाचा परिणाम दिसतो. बरव्यांच्या बर्‍याचशा चित्रांतील वस्तू काही वेळा तरंगणार्‍या, तर काही अवकाशात रुतलेल्याही दिसतात. वास्तव वस्तू आकारातून असंख्य कल्पनातीत अशी भावलेली रूपे हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्यच होय.

      बरव्यांच्या चित्रांत सावल्या हा एक महत्त्वाचा घटक म्हणून वावरत असतो. वस्तूंची सावली, अवकाश-अंतर-दिशा यांचे सूचन करत असते. ही त्या वस्तूच्या रूपाची सावली नसते. बरव्यांनी कॅन्व्हसवर एनॅमलचे रंग वापरले. या रंगांचा काहीसा कठीणपणा व सपाटपणा,  काहीशी चकाकी हे त्यांचे गुण आहेत. या रंगांतच त्यांनी जलरंगासारख्या तरल छटाही मिळवल्या. बरव्यांनी या रंगलेपनाचे तंत्र विकसित केले. या रंगाची ओघळण्याची प्रवृत्ती असल्यामुळे कॅनव्हास जमिनीवर ठेवूनच काम करावे लागते. हे रंग एकमेकांत मिसळत नसल्यामुळे रंगछटांचा सूक्ष्म विचार करावा लागतो. या सर्व गुणावगुणांचा विचार करून बरव्यांनी एनॅमल रंगाचा चातुर्याने उपयोग केला.

      बरव्यांच्या बहुतेक चित्रांतील पृष्ठभाग हा निळ्या, करड्या रंगाचा (न्यूट्रल) असल्यामुळे त्यातील अवकाशाची खोली सहजच जाणवत असे. बरव्यांची चित्रे त्यामुळे कधीच भडक - उत्तेजक वाटली नाहीत. अर्थात हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही भाग होता. सौम्य, तरल रंगछटांचा सुरेल मेळ, संयमित भावना, शांत व गूढ वातावरण यांनी त्यांची चित्रे भारलेली असत.

      गॅलरी केमोल्ड येथील १९९२ च्या त्यांच्या प्रदर्शनातून व नंतर १९९५ मध्ये त्यांची काही चित्रे प्रदर्शित झाली होती. उत्स्फूर्त व जलद परिणाम साधणार्‍या जलरंगातही त्यांनी सुंदर काम केले. ‘आकाशकंदिलाचा सांगाडा’, ‘रिकामा खोका आणि सेफ्टी पिन’, ‘कुलूप आणि पेटी’, ‘फळ आणि पेटी’ अशा शीर्षकांची एक बॉक्स सिरीज म्हणता येईल अशी ही मालिका होती. यात पारदर्शक/अपारदर्शक पेट्यांत विविध नित्य परिचयाच्या वस्तू ठेवल्या होत्या. काहींत लोकरीचे गुंडाळे, पक्षी, कुलूप इत्यादी. यांत रंगलेपनाचा मुक्तपणा, विविध पोत, दृश्य परिणामांची विविधता होती, त्याचबरोबर अवकाश आणि वस्तू यांचे बंदिस्त नाते यांसारख्या संकल्पनादेखील होत्या. त्यांनी १९९५ च्या जलरंग चित्रमालिकेत विशेष करून लिफाफे, पाने, घड्याळ अशा वस्तू चित्रित केल्या होत्या. ही काहीशी प्रतीकात्मक चित्रे होती. त्याशिवाय जलरंगातील काही चित्रे निसर्गचित्राकडे झुकणारी होती. ‘सॉलिटरी ट्री’, ‘क्लाउड’ यांसारख्या चित्रांतून हा प्रत्यय येतो. प्रतिरूप / वास्तव आणि अमूर्त यांच्या सीमारेषेवरील ही चित्रे वाटतात. एनॅमल रंगलेपनाच्या विरुद्ध यांत रंगलेपनाचा मुक्त खेळ पाहावयास मिळतो.

      जहांगीरच्या ‘इंडियन ड्रॉइंग टुडे १९८७’ या चित्रप्रदर्शनातून त्यांची काही रेखाटने प्रदर्शित झाली होती. यांतील प्रतिमा त्यांच्या पेन्टिंगमधीलच बहुतांशी असल्या, तरी यांतील रेषा ही बिंदूंची असल्यामुळे ती काही ठिकाणी पॉल क्लीची आठवण करून देते. या रेखाचित्रातील कृष्णधवल परिणाम अतिशय तरल आहे. पुरातत्त्वकालीन अतिवास्तव अशा भासप्रदेशाचा प्रत्यय त्यामधून येतो.

      बरवे नियमितपणे रोजनिशीत सभोवतालच्या वस्तूंच्या आकारांच्या नोंदी करत असत व मनात येणार्‍या चित्रविषयक जाणिवांचीही नोंद करत असत. त्यातूनच ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक आकाराला आले. १९९० मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात चित्र घडण्यापूर्वी व चित्र घडत असताना येणारे अनुभव बरव्यांनी आपल्या लालित्यपूर्ण व सहज भाषेत मांडले आहेत. हे सौंदर्यशास्त्र नाही, तर सर्जनशील कलाकाराने आपल्या स्वत:च्या मनात डोकावून आपल्या जाणिवांचा, आपल्या अंतर्मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आकार, अवकाश, रंग, प्रेरणा, कल्पना, मूर्त-अमूर्त संवेदना, आशय इत्यादी मूलभूत सर्जनक्रियांतील घटकांवर बरव्यांनी या पुस्तकातून अनुभवाधारित लिहिले आहे. दृक्कलेतील अतिशय मूलभूत गोष्टींचे स्वानुभवातून केलेले अशा प्रकारचे लेखन मराठीत तरी दुर्मीळ आहे.

      प्रभाकर बरवे हे कविवृत्तीचे चित्रकार होते. ते कविताही करत. सत्यकथेमधून त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. (जे.जे.च्या ‘रूपभेद’ या पाक्षिकातून त्यांच्या दीर्घ कवितेचा काही भाग आला आहे.) त्यांच्या कविमनाचा प्रत्यय त्यांच्या चित्रांतून व लेखनातूनही जाणवतो. बुद्धिनिष्ठ संकल्पनेपेक्षा भाववादी वृत्तीने व अंत:स्फूर्तीने चित्रनिर्मिती करण्याकडे त्यांचा विशेष कल होता. चित्रातील मूर्त रूपापेक्षा अमूर्त आशयाकडे त्यांचा अधिक ओढा होता. हेतुशुद्धता व प्रामाणिकपणा हे गुण त्यांनी अंगी जोपासले होते. स्वत:च्या कलाकृतीकडेही ते वस्तुनिष्ठपणे बघत. त्यांनी कधीही यांत्रिकपणे चित्रनिर्मिती केली नाही. त्यामुळे त्यांच्या चित्रांना बराच अवधीही लागत असे.

      बरवे यांची प्रतिमासृष्टी वास्तव आणि कल्पिताच्या चंचल आणि लवचीक अशा वास्तवाच्या विभ्रमांना दृश्यरूप देत राहिली. बरव्यांची सारी धडपड होती ती आकार-निराकारामधून आत्मभानाच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याची. या प्रवासात ठोस आकार गवसण्याची उमेद तर बाळगायची; पण प्रत्यक्षात अनंत आकारांचे विभ्रम तेवढे हाती लागायचे हा जीवनातला, म्हटले तर वैय्यर्थतेचा, म्हटले तर सार्थकतेचा अनुभव बरवे यांच्या चित्रांमध्ये अनेक रूपे घेऊन येतो आणि त्यांची चित्रे पाहणाऱ्याला हा अनुभव एका वेगळ्या अनुभूतीमध्ये घेऊन जातो.

     प्रभाकर बरव्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. चित्रकलेतील विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद अत्यंत मोकळेपणाने होत असे. अशा या सर्जक, चिंतनशील, भावनाशील प्रतिभावंताचे दीर्घ आजाराने अकाली निधन झाले.

- माधव इमारते

बरवे, प्रभाकर शिवराम