Skip to main content
x

बर्वे, परशुराम महादेव

           प्रा.परशुराम महादेव बर्वे यांचा जन्म कोकणात व शालेय शिक्षण मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे झाले. मुंबईच्या विल्सन  महाविद्यालयातून १९२७ साली बी.एस्सी. झाल्यानंतर त्याच महाविद्यालयात त्यांनी डेमॉन्स्ट्रेटर आणि फेलो म्हण्ाून कारकिर्दीस आणि कलील रसायनशास्त्रात (कोलाईडल केमिस्ट्री) संशोधनास सुरुवात केली. १९३० साली आपले संशोधन पूर्ण करून मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्राची एम.एस्सी. (ऑनर्स) पदवी मिळविली. लगेचच विल्सन महाविद्यालयात व्याख्याता, १९३२ साली दुय्यम प्राध्यापक, १९४४ साली प्राध्यापक आणि १९४६ सालापासून रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख असे सन्मान प्राप्त करीत, १९६४ साली ते नोकरीतून निवृत्त झाले. रसायनशास्त्राचा अभ्यास, संशोधन आणि त्यासंबंधीचे इंग्रजी आणि मराठीतून लेखन करण्याचा परिपाठ सुरूच ठेवला. कलील रसायनशास्त्रातील  संशोधनावर आधारित त्यांचे २३ शोधनिबंध अनेक परदेशी नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. १९५७ साली त्यांनी इंडियन केमिकल सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले आणि १९६१ साली विज्ञान विभागाचे अधिष्ठाता होण्याचा बहुमानही त्यांना मिळाला. १९५२ ते १९६४ सालापर्यंत त्यांची मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हण्ाून नियुक्ती झाली होती. १९३१ सालापासून त्यांनी सर्वसाधारण वाचकांना सहज समजेल असे विज्ञान विषयावर मराठीतून लेखन सुरू केले. त्यांचे निरनिराळ्या मराठी नियतकालिकांतून सुमारे १२५ लेख प्रसिद्ध झालेले आहेत. आकाशवाणीवरही त्यांची विज्ञानविषयावर मराठीतून अनेक भाषणे प्रक्षेपित झालेली आहेत. मराठी विश्वकोशासाठीही रसायनशास्त्रातील विषयांवर त्यांनी लिखाण केलेले आहे. महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाच्या रसायनशास्त्र उपसमितीचे सदस्य असताना, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात, इंग्रजी शब्दांसाठी, सार्थ आणि सोपे मराठी प्रतिशब्द रूढ करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्याबरोबर, सर्वच क्षेत्रांत झपाट्याने प्रगती होऊ लागली. या संक्रमणकाळात, मातृभाषेतून विद्यापीठीय स्तरापर्यंत शिक्षण दिले गेले पाहिजे ही मूलभूत विचारप्रणाली पक्की रूढ झाली. त्या अनुषंगाने देशभराच्या शिक्षणतज्ज्ञांनी आटोकाट प्रयत्न केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना, आधुनिक शास्त्रे, ज्ञानविज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रांत, मराठी भाषेला विद्यापीठाच्या स्तरावर ज्ञानदान करण्याचे सामर्थ्य यावे यासाठी लागणार्‍या सोयीसुविधा निर्माण करण्याचे कसोशीने प्रयत्न केले गेले. मराठी विश्वकोश, विज्ञानमाला, भाषांतरमाला वगैरे ग्रंथ मराठीतून लिहिण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची निवड केली गेली आणि दर्जेदार विज्ञानसाहित्य लिहवून घेतले गेले. प्रा. बर्वे हे त्यांपैकीच एक आघाडीचे विज्ञानलेखक होते आणि त्यांची पुस्तके याच मंडळाने प्रकाशित केलेली आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेल्या प्रत्येक पुस्तकाला शास्त्रीजींनी विद्वत्तापूर्ण प्रस्तावना लिहिली.

जीवनाच्या भाषेतच ज्ञान व संस्कृती यांचे अधिष्ठान तयार व्हावे लागते. जोपर्यंत माणसे परकीय भाषेच्याच आश्रयाने शिक्षण घेतात, कामे करतात, विचार व्यक्त करतात, तोपर्यंत शिक्षण सकस होत नाही; संशोधनाला परावलंबित्व राहते आणि विचारांना अस्सलपणा येत नाही. एवढेच नव्हे, तर वेगाने वाढणार्‍या ज्ञानविज्ञानाला सर्वसामान्य माणसे वंचित राहतात. प्रा. बर्वे यांनी याच दृष्टिकोनाचा पाठपुरावा केला आणि दैनंदिन जीवनात अत्यंत आवश्यक असणार्‍या वस्तू, पदार्थ आणि साहित्य यांसंबंधी सामान्य जनतेला समजेल उमजेल अशा भाषेत विज्ञान आशयात तडजोड न करता लेखन केले. त्यांनी साखर’ (मार्च १९७७), ‘खनिज तेल व तज्जन्य रसायने’ (ऑक्टोबर १९७७), ‘निर्मलके साबण व तत्सम रसायने’, (मे १९८८) इत्यादी विषयांवर १२ मराठी पुस्तके लिहिली.

साखर या पदार्थाला दैनंदिन जीवनात पर्याय नाही. आपल्या आयुष्यातील आनंददायक प्रसंग, मनाचे समाधान, संतोष वगैरे भावना व्यक्त करण्यासाठी आणि आप्तेष्टांना व सन्मित्रांना त्यांत सहभागी करण्यासाठी आपण पेढे-बर्फी यांसारखी मेवामिठाई वाटतो. स्वातंत्र्यपूर्व काळात साखर आयात केली जात असे. साखरउद्योग जवळजवळ नव्हताच. साखरउद्योगामुळे, उसाची लागवड, त्यावरील संशोधन, त्यावरील व्यापारी आणि आर्थिक उलाढाल, सरकारचे धोरण, साखरेचे निरनिराळे प्रकार आणि त्यांची उत्पादन तंत्रे, साखरेचे आहारातील आणि आरोग्यविषयक महत्त्व वगैरे बाबींचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार असलेली प्रकरणे, त्यांच्या साखरया पुस्तकात समाविष्ट केलेली आहेत. खनिज तेल व तज्जन्य रसायने या सुमारे ३०० पानांच्या पुस्तकात प्रा. बर्वे यांनी भरपूर तांत्रिक माहिती तर दिली आहेच; शिवाय भरपूर आकडेवारीही दिली आहे. त्या काळी भारतात, बोटावर मोजता येतील एवढेच भारतीय तंत्रज्ञ होते. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी अचूक माहिती मिळविली आणि भारतासंबंधी तांत्रिक आकडेवारीही उपलब्ध केली. पेट्रोरसायनांच्या शोधामुळे आणि उत्पादनांमुळे भारतीयांची जीवनशैली कशी बदलू शकेल याचा आढावा या पुस्तकात घेतला गेला आहे. पुस्तकाच्या शेवटी इंग्रजी संज्ञा आणि स्पष्टीकरणे, पूरक माहिती, इंग्रजी-मराठी आणि मराठी-इंग्रजी पारिभाषिक शब्द, संदर्भ ग्रंथसूची, प्रांतवार कारखान्यांची यादी आणि संबंधित आकडेवारी, विषयसूची, वगैरे माहिती असलेली परिशिष्टे दिली असल्यामुळे प्रा. बर्वे यांची पुस्तके परिपूर्ण वाटतात.

साबण हादेखील आपल्या दैनंदिन जीवनातील अपरिहार्य घटक आहे. पेट्रोरसायनांच्या उत्पादनामुळे, प्लॅस्टिक, कृत्रिम धागे, रंग, निर्मलके वगैरे पदार्थांविषयी कुतूहल जागृत झाले. धातू, काच, सिरॅमिक, बांबू आणि लाकूड वगैरेंच्या वापराला सोयीस्कर पर्याय निर्माण झाले. त्यांच्या वापरातील फायदे-धोके, समज-गैरसमज वगैरेसंबंधी प्रबोधन होणे आवश्यक होते. हे आव्हान प्रा. बर्वे यांच्यासारख्या चतुरस्र विज्ञान लेखकांनी परिणामकारकरीत्या पेलले.

अवकाशयात्रा’, ‘सागराचे दिव्यदर्शन’, ‘रसायनशास्त्राची करामत’, ‘सागरतळाचा शोध’, ‘एक ग्रह- त्याचे नाव पृथ्वी’, ‘विज्ञानाचे युगप्रवर्तक’, आणि जीवन रसायनाचा ओनामा’, या सात विज्ञान विषयक इंग्रजी पुस्तकांचे त्यांनी सुबोध मराठी अनुवादही केले. रसायनशास्त्राचे सातत्याने केलेले चिंतन, पुस्तकरूपाने प्रसिद्ध केल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि ते जनतेपर्यंत पोहोचतही नाही. विज्ञान विलास’ (१९५५), ‘विज्ञान शोभा’ (१९५८) आणि विज्ञान सौंदर्य’ (१९५९) या तीन पुस्तकांचे लेखन, प्रा. बर्वे यांच्यातील विज्ञानसाहित्यिकाचे पैलू दाखवितात. म्हण्ाूनच वरील पुस्तकांना राज्यसरकारकडून त्या-त्या वर्षाचा, सर्वोत्तम विज्ञान साहित्य म्हणूनही पुरस्कार मिळाला. प्रा. बर्वे यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासन व इतर ग्रंथोत्तेजक संस्थांकडून गौरवार्थ पारितोषिके मिळालेली आहेत.

मराठी विज्ञान परिषदेचे एक संस्थापक, आजीव सभासद, कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष, आणि विश्वस्त या नात्यांनी त्यांनी परिषदेला मार्गदर्शन केलेले आहे. मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचे पहिल्यापासून एक संपादक  म्हणूनही त्यांनी लिखाण केले आहे. जालना येथील आठव्या विज्ञान संमेलनात त्यांचा गौरव झालेला आहे.  त्यांचे वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी मुंबईत वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

गजानन वामनाचार्य

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].