Skip to main content
x

भागवत, अशोक लक्ष्मण

        शोक लक्ष्मण भागवत यांचा जन्म रंगून येथे झाला. त्यांचे वडील भारतीय शास्त्रीय संगीताचे अभ्यासक व अध्यापक होते. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथे पार पडले. त्यांनी १९५४मध्ये अकरावीची परीक्षा प्रथमश्रेणी मिळवून उत्तीर्ण केली. अकरावीमध्ये शिकत असताना मुके प्राणी व पक्षी यांच्यासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी १९५७मध्ये मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि १९६१मध्ये बी.व्ही.एस्सी. ही पदवी संपादन केली. त्यांनी जून १९६१मध्ये कल्याण येथे पशुवैद्यकीय अधिकारी या पदावर रुजू होऊन शासकीय सेवेचा प्रारंभ केला. सेवेमध्ये असतानाच ऑक्टोबर १९६१मध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पशु-संवर्धन विभागाच्या अंतर्गत भुवनेश्‍वर (ओेरिसा) येथे प्रक्षेत्र अधीक्षक या पदावर नियुक्ती मिळाली. त्यांनी तेथे १९६३पर्यंत काम करून स्वतःच्या कामाचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला. त्यांनी १९६३ ते १९६८ दरम्यान मुंबई येथील आरे कॉलनीतील कुक्कुटपालन या स्वतंत्र कक्षाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. याच काळात भारतात प्रथमच एक दिवसाच्या पिलाचे लिंगनिश्‍चिती करणाचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या वर्गासाठी जगविख्यात जपानी कुक्कुटतज्ज्ञ सातरू निझोमा यांना आमंत्रित करण्यात आले होते.

        डॉ. भागवत दिल्ली येथे कृषी मंत्रालयात १९६८ ते १९७२ या काळात साहाय्यक कुक्कुटपालन विकास अधिकारी या पदावर कार्यरत होते. या काळात प्रत्येक धोरण ठरवताना त्यांनी ग्रामीण भागामध्ये नवनवीन तंत्रज्ञान कसे पोचेल व पचेल याचा सातत्याने विचार केला. त्यांनी १९७२-७४ या काळात अमेरिकेमधील कॅनसास विद्यापीठामधून एम.एस. पदवी संपादन केली. उच्च शिक्षण घेतल्यावर ते पुन्हा कृषी मंत्रालयामध्ये रुजू झाले व याच पदावर १९७७पर्यंत कार्यरत होते. ते १९७७मध्ये परत अमेरिकेमध्ये कॅनसास विद्यापीठामध्ये दाखल झाले व त्यांनी जेेनेटिक्स अँड ब्रिडींग इन पोल्ट्री या विषयावर पीएच.डी. संपादन केली. तीन वर्षांमध्ये डॉक्टरेट मिळवणारे डॉ. भागवत निवडक पशुवैद्यकांपैकी एक आहेत. अमेरिकेमधील वास्तव्यात त्यांनी अनेक पोल्ट्री व्यवसायांना अभ्यासभेटी देऊन यशस्वी व्यवस्थापनाचा अभ्यास केला.

        व्यवसायाशी प्रामाणिक असणे, व्यवसायवाढ हे एकमेव ध्येय ठेवणे, प्रत्येक नुकसान किंवा अपयश याचा सर्वांगाने अभ्यास करणे या गोष्टी त्यांना या भेटीमध्ये प्रामुख्याने जाणवल्या. पुन्हा भारतात आल्यावर ते १९८०मध्ये हिस्सारगठ्ठा बंगलोर येथे सेंट्रल पोल्ट्री-ब्रिडींग फार्म संचालक या पदावर रुजू झाले. येथे असताना त्यांनी प्रथमतः देशपातळीवर पोल्ट्रीफिड खरेदी करताना निकषात्मक दर्जावर किंमत निश्‍चित केली पाहिजे, या महत्त्वपूर्ण निर्णयास राजमान्यता मिळवली. त्यांनी संचालक म्हणून १९८०-८३ या काळामध्ये चंदिगड येथे कुक्कुटपालन विभागामधील ४ पोटशाखा असलेले युनिट  सांभाळले. या काळातच त्यांनी प्रादेशिक खाद्य चिकित्सा प्रयोगशाळा (रिजनल फिड अ‍ॅनॉलिटीकल लॅबोरेटरी) स्थापन केली. आज स्थानिक पातळीवर पोल्ट्रीफीडचे दर्जा निश्‍चितीकरण सहजगत्या होऊ शकते, हे याचेच यश आहे. त्यांनी १९८३ ते १९८५ या काळात पुन्हा आरे वसाहतीमध्ये राज्यस्तरीय कुक्कुटपालन विभागाचे संचालकपद भूषवले आणि १९८५मध्ये शासकीय सेवेमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांनी निवृत्तीनंतर विद्यादानाचे व्रत स्वीकारले आणि १९८५ ते २००३ या काळात इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट ऑफ इंंडिया या संस्थेची स्थापना केली व ते तेथे संस्थापक संचालक होते. जेथे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम व प्रात्यक्षिक ज्ञान यांचा उत्तम समन्वय आहे, अशी ही संपूर्ण भारतामध्ये एकमेव संस्था आहे. या विद्यादान कार्याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे भागवत हे वर्ल्ड पोल्ट्री सायन्स असोशिएशनचे सचिव व मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.

- मानसी मिलिंद देवल

भागवत, अशोक लक्ष्मण