भागवत, राजारामशास्त्री रामकृष्ण
राजारामशास्त्री रामकृष्ण भागवत यांचा जन्म कशेळी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे झाला. लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. वडील मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होते. त्यांचे लहानपण कष्टात गेले. मुंबईस एल्फिन्स्टन हायस्कूलमधून १८६७मध्ये ते मॅट्रिक झाले. अभ्यासू वृत्ती म्हणून वडिलांच्या सांगण्यावरून ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तीन वर्षे वैद्यकीय शिक्षण घेतले. वडिलांच्या निधनानंतर हा अभ्यास सोडून ते संस्कृत वेदशास्त्रादी शास्त्रांचा अभ्यास करू लागले. शास्त्री म्हणून त्यांचा गौरव झाला. १८७५मध्ये रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर आयुष्याच्या अखेरपर्यंत सेंट झेवियर महाविद्यालयामध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांवर सुसंस्कार व्हावेत, शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा म्हणून १८८४मध्ये त्यांनी ‘बाँबे हायस्कूल’ आणि ‘मराठा हायस्कूल’ या शाळांची स्थापना केली. या शैक्षणिक संस्थेच्या कार्यात नारायण व्यंकोजी खोत यांचे त्यांना सहकार्य लाभले होते.
आयुष्यभर शिक्षणक्षेत्रात कार्यरत असताना अनेक भाषांचाही त्यांनी अभ्यास केला. त्यातल्या त्यात अरबी, ग्रीक, अवेस्ता, लॅटीन या भाषा ते आवर्जून शिकले. पाश्चात्य व पौर्वात्य संस्कृती यांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी या भाषाभ्यासाचा त्यांना विशेष उपयोग झाला. ‘विधवा विवाह - सशास्त्र की अशास्त्र?’ (१८८५), ‘ब्राह्मण व ब्राह्मणी धर्म किंवा वेद व वैदिक धर्म’ (१८८९), ‘ब्राह्मण म्हणविणार्यास सवाल’ (१८९९), ‘पारसी व पारसी धर्म’ (१८९१), ‘मोगल व मोगली धर्म’ (१८९०), ‘शककालविचार’ (१८९३), असे विविध धर्म-संस्कृतीविषयक प्रबोधनपर निबंध तत्कालीन विद्वानांमध्ये चर्चेचा विषय होते. स्त्री शिक्षण, विधवा विवाह, अस्पृश्यता निवारण, वेदोक्त प्रकरण हे त्यांचे भाषणाचे, प्रबोधनाचे व लेखनाचे विषय होते. त्यांच्या लेखनातून त्यांच्या वैदिक वाङ्मयाच्या सखोल अभ्यासाचा प्रत्यय येतो. ‘वेदार्थयत्नकारांचे स्मारक’ ही विविधज्ञानविस्तार या नियतकालिकातील लेखमाला विशेष लक्षणीय होती. त्यात ऋग्वेदातील वेगवेगळ्या सूक्तांचे भाषांतर व कठीण शब्दांची फोड करून, तसेच व्यक्तींची आणि प्रसंगांची ऐतिहासिक छाननी करून मूळच्या वैदिक कथा व पौराणिक कथा यातील तफावत त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे.
शास्त्रीबुवांच्या मते शाळेच्या अभ्यासक्रमात धार्मिक शिक्षणाचा अंतर्भाव होणे गरजेचे होते. त्याप्रमाणे त्यांनी स्वतःच शाळेत तुकाराम, एकनाथ इ. संतांच्या पुण्यतिथी दर वर्षी साजर्या करण्याचा उपक्रम सुरू केला. संतांची छोटी चरित्रे लिहून ती ते विद्यार्थ्यांना देत आणि त्या संतांची शिकवण तसेच भागवत धर्माची तत्त्वे मुलांना समजावून सांगत असत. त्यांना मराठी धर्माबद्दल प्रेम होते. त्यांच्या मते, ‘मराठी धर्म म्हणजे मराठी संतांचा भागवत धर्म म्हणजेच महाराष्ट्र धर्म; मुकुंदराय हा त्या धर्माचा आद्य जनक, ज्ञानदेव हा संस्थापक तर एकनाथ, रामदास, तुकाराम हे धर्माचे प्रचारक आहेत.’ ज्ञानदेवांना शास्त्रीबुवा ‘ज्ञानर्षी’ असे म्हणत. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास यांच्या काव्यरचनेचे निवडक वेचे घेऊन त्यांनी त्याचे निरूपण लिहिले. ‘ब्राह्मण पण हिंदू नव्हे’ अशा सहीने ते लेख लिहीत.
‘हिंदुस्थानाचा छोटा इतिहास : भाग १ ते ४’ (१८८७), ‘शिवाजी’ (१८९२), ‘संभाजी’ (१८९६), ‘राजाराम’ (१८९२), ‘एकनाथ’ (१८९३) इत्यादी चरित्रे त्यांनी लिहिली. ‘ऐतरेयोपनिषद्’ (१८९८) व ‘श्वेताश्वतरोपनिषद्’ (१९००) अशी दोन उपनिषदे विस्तृत प्रस्तावनेसह त्यांनी मराठीत व इंग्लिशमध्ये भाषांतरित केली. ‘प्राकृत भाषेची विचिकित्सा’, ‘संस्कृत भाषेची विचिकित्सा’ हे शास्त्रीबुवांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ. ‘महाभारताची विचिकित्सा’, ‘भगवद्गीतेतील बुड्या’, ‘एकपादकली वेदार्थयत्नाची गुरुकिल्ली’ इत्यादी संशोधनात्मक लेख त्यांनी लिहिले. विविधज्ञानविस्तारप्रमाणे सुधारक, ज्ञानप्रकाश, पुणे वैभव, दीनबंधू, सुबोधपत्रिका, इंदुप्रकाश इत्यादी मासिकांतून, वृत्तपत्रांतून त्यांचे अशा विविध विषयांवरचे लेख प्रसिद्ध झाले. वेदवेदान्त, गीता अशा विषयांवरील दहा निबंधवजा पुस्तके त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिली आहेत.
प्राचीन वाङ्मय बारकाईने वाचून पूर्वीचे विचार कोणते, आजचे काय आहेत, ते कसे योग्य असावयास पाहिजेत याचा विचार करून ते आपले लेख लिहीत असत. शास्त्रपरिपाटीपेक्षा मानवतेला धरून त्यांचे लेखन असे. ‘वैदिक समाजाची अर्वाचीन समाजाहून आचारांच्या बाबतीत भिन्नता त्यांनी वारंवार महाराष्ट्रीयांच्या नजरेस आणून दिली. त्यांनी वैदिक वाङ्मयावर मराठीमध्ये जितके लिहिले, तितके कोणत्याही महाराष्ट्रीयाने आजपर्यंत लिहिले नाही.’ असे ज्ञानकोशकार डॉ. केतकर यांनी म्हटले आहे. गोंडी भाषेचाही त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यावरील लेख त्यांच्या चिकित्सक अभ्यासू वृत्तीची साक्ष आहे. शास्त्रीबुवा हे गोंडी भाषेसंबंधी लेखन करण्यात महाराष्ट्रात नव्हे, तर सबंध हिंदुस्थानात पहिले विद्वान आहेत.
अव्याहत वैदिक वाङ्मयापासून थेट सोवळ्या-ओवळ्याच्या थोतांडापर्यंत अनेक गहन आणि साध्यासुध्या विषयांवर शास्त्रीबुवांनी सतत ३५ वर्षे लेखन केले. पुराणवस्तुशास्त्र शोधाचा विषय भागवतांनीच प्रथम मराठी भाषेत लिहून आपले वेगळे स्थान निर्माण केले. महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वाङ्मयीन क्षेत्रात त्यांचे असे महत्त्वाचे योगदान आहे. शिक्षणासाठी सर्व आयुष्य वाहून घेणार्या विद्वान राजारामशास्त्री यांनी एक उत्तम पिढी आपल्या शिकवणीतून निर्माण केली. त्यात महर्षी कर्वे, रँग्लर परांजपे, बॅरिस्टर जयकर इ. नामवंत विद्यार्थ्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. टिळक-आगरकरांच्या या काळात आपला स्वतंत्र बाणा राखून अनेक विषयांवर प्रक्षोभक मते व्यक्त करणारा स्वाध्यायनिरत, वैचारिक आंदोलक म्हणून मराठी वाङ्मयात राजारामशास्त्रींचे स्थान महत्त्वाचे आहे.
२. कुलकणीर्र् वि. गो.; ‘गाथा मुहूर्तमेढीची’, राजहंस प्रकाशन, पुणे, २००१.