Skip to main content
x

भांडारकर, देवदत्त रामकृष्ण

      देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचा जन्म पुणे येथे झाला. रामकृष्णपंत व मातोश्री अन्नपूर्णाबाई यांचे देवदत्त हे तिसर्‍या क्रमांकाचे चिरंजीव. देवदत्त आणि रामकृष्णपंतांचे भाचे भास्कर गोठोस्कर (पुढे एशियाटिक सोसायटीचे ग्रंथपाल झाले) यांचे शिक्षण एकत्र झाले आणि ते कुटुंबामध्ये सर्वांत अधिक शिकले. डेक्कन महाविद्यालयामधून १८९६मध्ये बी.ए. झाल्यावर कायद्याचा अभ्यास सुरू केला. मुंबई विद्यापीठासाठी त्यांनी ‘पूर्व मुसलमान काळातील महाराष्ट्राच्या ग्रमीण-नागरी वसाहतीचे संक्षिप्त समालोचन’ हा प्रबंध सादर केला. त्यात त्यांना ‘भगवानलाल इंद्रजी’ पारितोषिक मिळाले. आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी १९०० साली संस्कृत-प्राचीन भारतीय इतिहास आणि पुराभिलेख’ या विषयावर मुंबई विद्यापीठाची एम.ए.ची पदवी संपादन केली. नंतर तीन वर्षे भारताच्या ‘शिरगणती’ खात्यात नोकरी केली. ब्रिटिश अधिकार्‍यांना देवदत्तांनी पुढे संशोधन करण्याची अपेक्षा होती. पहिली नोकरी सोडून मुंबई मंडलाच्या पुरातत्त्व विभागात ‘साहाय्यक सर्वेक्षक’ पद स्वीकारून १९०४ ते १९०७ अशी चार वर्षे काम केले. १९१५साली पुरातत्त्व विभागाच्या पश्चिम मंडलाचे ते अधिकारी झाले. या काळात अनेक शिलालेख-ताम्रपट यांवर त्यांनी शोधनिबंध लिहिले. १९१७ साली पुण्यात वडिलांच्या नावे संस्था स्थापन होत असताना, देवदत्त कोलकात्यात दाखल झाले आणि कोलकाता विद्यापीठात ‘प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती’ या विषयाचे ‘कारमाईकल प्राध्यापक’ म्हणून रुजू झाले. हे काम १९३६मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी समर्थपणे पार पाडले.

     सर रामकृष्ण गोपाळ या आपल्या वडिलांपेक्षा देवदत्तांचा स्वभाव वेगळा होता. वाडवडिलांचा घराण्याचा मोठेपणा न सांगता, अधिकार व द्रव्यप्राप्ती यांचा लोभ न ठेवता हा विद्वान स्वत:च्या आवडीच्या विषयांमध्ये रमला होता. प्राचीन इतिहास, पुराभिलेख, नाणक शास्त्र या वडिलांपेक्षा वेगळ्या विषयांत अभ्यास करून, त्यांनी निष्णात पद प्राप्त करून घेतले होते. एम.ए.साठी गुजरात राष्ट्रकूट युवराज पहिला कर्क्क याच्या नवसारी ताम्रपटावर (इ.स. ७३८) केलेला अभ्यास आणि कुशाण राजपरंपरा आणि शककाला उगम याविषयीचे शिलालेखांवरून काढलेले निष्कर्ष, फ्रेंच प्राच्यविद्यापंडित डॉ. बार्थ आणि सर भांडारकरांना खूप आवडले होते.

     एकीकडे वेगळ्या विषयावर अभ्यास करत असताना, तसेच ‘जनगणना’ कार्यालयात काम करत असताना, ‘धर्म आणि धर्मपंथ’, ‘जाति आणि जमाती’ यांसारख्या तदनुषंगिक विषयात प्रा. एंथोवन यांना मदत करून एक वेगळी दृष्टी दिली. तसेच ‘अहिर’ जमातीवर स्वतंत्र संशोधन करून संशोधकाचा पिंड दाखवून दिला. ‘गुर्जर राज्याचा कालानुक्रम आणि विस्तार’ नव्याने मांडला. मिहिर भोजच्या ग्वालियर अभिलेखाचे अचूक वाचन करून कालनिर्णय केला. तो तत्कालीन विद्वानांनी मान्य केला.

     मुंबई मंडलात सर्वेक्षक म्हणून काम करत असताना राजपुतान्यात अभ्यासासाठी जाऊन पुरातत्त्वीय अभ्यासाची सामग्री संकलित केली. पाशुपत पंथाचा संस्थापक लकुलीश यावरील देवदत्तांचे संशोधन आणि काढलेले निष्कर्ष सर रामकृष्ण यांनाही उपयोगी पडले. १९१५मधील ‘गुहिलोत’ या राजपुतांच्या सर्वश्रेष्ठ जमाती विषयी केलेल्या संशोधनामुळे, तसेच ‘हिंदू लोकसमाजामधील परदेशी अंश’ या लेखामुळे त्यांनी पुरवलेल्या ऐतिहासिक माहितीचे मोल मोठे मानले गेले आहे.

     देवदत्तांचे महत्त्वाचे संशोधन म्हणजे विदिशा नगरीजवळील उत्खननात सापडलेला ‘खाम्बाबा पिलर’! हा गोलाकार स्तंभ ग्रीक राजदूत हेलिओडोरस याने आपल्या वासुदेवभक्तीचे आदरचिन्ह म्हणून उभारलेला आहे. तो दोन पोलादी पट्ट्यांवर उभा असून आजूबाजूचे बांधकाम पक्क्या विटांचे आणि चुनखडी गिलाव्याचे होते. देवदत्तांनी पोलाद तपासणीसाठी विदिशात, तर चुनखडी मिश्रण पुण्याच्या शेतकी महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्यांकडे, डॉ. मॅन यांच्याकडे तपासास पाठवून दिले. इ.स. पूर्व १२५ सालात बनवताना म्हणजेच मौर्यकालात हा स्तंभ अस्सल पोलाद, चुनखडी गिलावा व भाजक्या विटांचा उपयोग केला होता असे सिद्ध केले. देवदत्तांनी संशोधनाची आदर्श आणि फिल्डवर्क पद्धती दाखवून दिली.

     ब्रिटिश बादशहा पंचम जॉर्ज, ५ डिसेंबर १९११ रोजी मुंबईत आले त्या वेळी त्यांना ‘घारापुरीची एलिफंटा’ दाखवायचे ठरले. त्या वेळी ‘द गाईड टू एलिफंटा केव्ह’ पुस्तक लिहून, या मार्गदर्शनातून एकच एकसंध शिळा कोरून प्रचंड शिवमूर्ती-त्रिमूर्ती निर्माण झाल्याचे आश्चर्य त्यांनी तत्कालीन राज्यकर्त्यार्ंंना दाखवून दिले. देवदत्तांच्या संशोधनातून- १) एन्शंट हिस्टरी ऑफ इंडिया (१९१८), २) द गाइड टू एलिफंटा केव्ह (१९११), ३) लेक्चर्स ऑन एन्शंट इंडियन न्युमॅस्मेटिक्स (१९२१), ४) अशोक (कारमायकेल लेक्चर्स) १९२५, ५) लिस्ट ऑफ इन्स्क्रीप्शन्स ऑफ नॉर्दन इंडिया १९२७, ६) सम ऑस्पेक्ट्स ऑफ एन्शंट हिंदु पॉलिटी १९२९, ७) सम ऑस्पेक्ट्स ऑफ एन्शंट इंडियन कल्चर, असे महत्त्वाचे ग्रंथ एकापाठोपाठ निर्माण झाले. त्याशिवाय सुमारे पन्नास शोधनिबंध त्यांनी वेगवेगळ्या परिषदांतून सादर केले. एकूण ५७ शिलालेखांचे त्यांनी संपादन केले. संपादनात बी.सी.लॉ. व्हाल्यूम, अशोक इन्स्क्रीप्शन्स, पुरातत्त्वीय संशोधनाचे रिपोर्ट, केशव मिश्राची तर्कभाषा, तीर्थकल्प इत्यादी ग्रंथांचे संपादनही त्यांनी केले.

     त्यांनी कित्येक वर्षे इंडिया, इंडियन अ‍ॅन्टीक्वरी, इंडियन कल्चर या संशोधनात्मक नियतकालिकांचे संपादन केले होते. पुरातत्त्वशास्त्र, नाणकशास्त्र, लिपिशास्त्र, प्राचीन भूगोल, मूर्तिशास्त्र, साहित्य, राजकीय इतिहास इत्यादी विषयांवर पन्नासहून अधिक लेख त्यांनी प्रसिद्ध केले. याशिवाय विविध परिषदांतील अध्यक्षीय भाषणे, ग्रंथ समीक्षणे याच्याही बर्‍याच नोंदी आढळतील.

    कोलकाता विद्यापीठात अध्यापन-संशोधन करत असताना ‘कार्मायकेल व्याख्यानमाला’ त्यांनी सुरू केली. यामध्ये त्यांच्यासह अनेक विद्वानांनी भाषणे दिली, जी पुढे प्रतिष्ठेची व्याख्यानमाला ओळखली गेली.

     एवढ्या प्रचंड व्यासंगानंतर त्यांना एशियाटिक सोसायटी कोलकाता व लंडन यांचे सदस्यत्व, कोलकाता विद्यापीठाची सन्मान्य डॉक्टरेट (१९२१), विमल चरण लॉ सुवर्णपदक, इत्यादी सन्मान मिळाले. सर आशुतोष मुखर्जी यांनी देवदत्तांना मोठ्या भांडारकरांची छोटी आवृत्ती न मानता प्रति मोठे भांडारकरच मानून मोठा सन्मान केला. वडील महाराष्ट्रात, तर चिरंजीव बंगालमध्ये कीर्तिध्वजा फडकवत होते. सर्वच क्षेत्रांत वडिलांपेक्षा वेगळी जीवननिष्ठा दाखवणार्‍या देवदत्तांनी एक गोष्ट वडिलांची परंपरा आवडली म्हणून पाळली. बंदोपाध्याय संपादित भांडारकर शताब्दी ग्रंथामध्ये एका विशेष छायाचित्रात देवदत्त हरिदासी पद्धतीचे कीर्तन करत असल्याचे दाखवले आहे. बाजूला साथीला तबला-पायपेटी, मागे तंबोरा-झांज, आणि पगडी - उपरणे या वेशात देवदत्त कीर्तन करत असल्याचे दाखवले होते. या ग्रंथाचे १९८४साली कोलकाता विद्यापीठात पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते विमोचन झाले होते. रामकृष्ण गोपाळदेखील कीर्तन करत. संत तुकारामांचे अभंग त्यांना अक्षरश: मुखोद्गत होते.

वा.ल. मंजूळ

भांडारकर, देवदत्त रामकृष्ण