Skip to main content
x

भाताडे, शिवराज संगप्पा

           शिवराज संगप्पा भाताडे यांनी १९७५मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली, तर १९८५मध्ये त्यांनी कृषी वनस्पतिशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांनी अमेरिकन कपाशी सुधारणेवर दीर्घकाळ संशोधन करून कपाशीचे तीन सुधारित वाण एन.एच. ४५२ (रेणुका-१९९५), एन.एच. ५४५ (२००२) व एन.एच. ६१५ (२००७) हे वाण विकसित करून लागवडीसाठी प्रसारित केले. वरील सर्व वाण रस शोषणाऱ्या किडी व मर, करपा, इ. रोगास प्रतिकारक असून या वाणात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सिद्ध केले. त्यामुळे कोरडवाहू लागवडीस ते उपयुक्त ठरले. लागवडीचा खर्च कमी व किफायतशीर उत्पादन यामुळे सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे वाण वरदान ठरले आहेत. एन.एच.६१५ या वाणाचे धाग्याचे गुणधर्म सरस असल्यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो. भाताडे यांनी एकूण ३५ संशोधनपर लेख लिहिले असून त्यांचे लागवडीविषयी १५ लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या संशोधनकार्याबद्दल त्यांना १९९५ मध्ये नांदेड जिल्हा बीज उत्पादक संघामार्फत सन्मानपत्र देण्यात आले, तर २००४मध्ये धारवाड येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोकृष्ट निबंध सादरीकरणासाठी पुरस्कार दिला गेला. बळीराजा मासिकातर्फे देण्यात येणारा कै. अण्णासाहेब शिंदे कृषी संशोधन गौरव पुरस्कार २००५ मध्ये प्राप्त झाला.

- संपादित

भाताडे, शिवराज संगप्पा