Skip to main content
x

भाटे, रोहिणी गणेश

रोहिणी गणेश भाटे यांचा जन्म बिहार राज्यात पाटणा येथे प्रा.गणेश सदाशिव भाटे आणि लीलाताई यांच्या पोटी झाला. वडिलांचे निधन झाले त्या वेळी रोहिणी भाटे यांचे वय फक्त अडीच वर्षे होते. त्यानंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले. रोहिणी भाट्यांच्या वडिलांचे विचार अत्यंत पुरोगामी व क्रांतिकारक होते आणि त्यांच्या आईने त्याच विचारांचा पाठपुरावा करून या सर्व भगिनींना अत्यंत शिस्तीने, तत्त्वनिष्ठतेने व उदार मनाने वाढविले.

पुण्यात मुला-मुलींचे सहशिक्षण असलेल्या भावे स्कूलमध्ये रोहिणी भाट्यांचे शिक्षण झाले. मराठी, संस्कृत, हिंदी व इंग्रजी या भाषांचे त्यांना उत्तम ज्ञान होते. शालेय शिक्षणानंतर त्यांचे भाषांवरील प्रेम, गायनाची आवड व नवीनच लागलेला नृत्याचा छंद पाहून मातु:श्रींनी सल्ला दिला, की कलाशाखेत प्रवेश घ्यावा. त्याप्रमाणे रोहिणी भाटे यांनी मराठी, संस्कृत हे विषय घेऊन फर्गसन महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी मिळवली.

प्रतिकूल सामाजिक परिस्थिती असूनही आंतरिक दृढनिश्चयामुळे आणि कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्यामुळे त्यांनी नृत्यकलेत प्रवेश केला. १९४७ साली त्यांचा नृत्यवर्ग सुरू झाला. रोहिणी भाट्यांनी ‘नृत्यभारती’ही शास्त्रीय नृत्यकलेची संस्था स्थापन केली आणि तिला समाजात दर्जा व प्रतिष्ठाही मिळवून दिली. जयपूर घराण्यातील ख्यातनाम गुरू पं. मोहनराव कल्याणपूरकर यांची भेट झाली. त्यांच्याकडे लखनौला जाऊन रोहिणीताई विद्याग्रहण करू लागल्या. पहिल्या दोन वर्षांत त्यांनी रोहिणी भाटे यांना विलंबित ते द्रुत लयीपर्यंत, उत्तमोत्तम बंदिशी तीनतालामध्ये शिकवल्या. पुढच्या ३-४ वर्षांतच तालमालेसारखी अनवट रचना (६ ताल व ७० मात्रांचा नगमा) — परणांची मालाही शिकायला मिळाली. तसेच क्रमलय, लयतालातील ‘जाती’विचार, विषममात्रांच्या तालांचे ठेके व अर्ध्या मात्रेचा हिशेब करणारे ‘भिन्नलोभा’ (६॥ मात्रा) व ‘चित्ररूपक’ (१०॥ मात्रा) अशा अनवट तालांचा परिचय मोहन कल्याणपूरकरांनी करून दिला व या तालांचे (कथक नृत्याच्या एकल प्रस्तुतीबाबत) अत्यंत प्रगत स्वरूप रोहिणी भाटे यांनी निर्माण केले. संगीताच्या आवडीमुळे रोहिणी भाटे केशवराव भोळे आणि वसंतराव देशपांडे यांच्याकडे गायन शिकल्या. त्यानंतर त्यांनी पं. लच्छू महाराज यांच्याकडे कथकचे शिक्षण घेतले. पं. लच्छू महाराज हे लखनौ घराण्यातील नामवंत नर्तक व गुरू होते. रोहिणी भाटे त्यांच्याकडे लखनौ घराण्याच्या खास बंदिशी, रचना शिकल्या. भाव-आमद, गत-निकासमधील चालींची विविधता, ‘दक्षयज्ञ’ ही कविता, स्व.पं. बिन्दादीन महाराजांच्या काही ठुमर्‍या व गीते हे शिकल्यामुळे त्यांचे नृत्य अधिक सौंदर्यपूर्ण झाले.

या काळाच्या दरम्यान भारतामध्ये विविध ठिकाणी त्यांचे यशस्वी कार्यक्रम, अनेक महत्त्वाच्या कथक महोत्सवांत तर झालेच; परंतु एक दर्जात्मक, विचारवंत, ज्ञानसंपन्न कथक कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेर पूर्व जर्मनी (१९८०, १९८७), फ्रान्स (१९७०, १९८५), हॉलंड (१९८७), आफ्रिका (१९८८), अमेरिका व कॅनडा (१९८९), व्हिएतनाम (१९९६), इंग्लंड (१९९८) व जपान अशा देशांत त्यांना आमंत्रित केले जाऊ लागले व ते दौरे अतिशय यशस्वीपणे पार पाडून रोहिणी भाटे ख्यातनाम सुप्रसिद्ध कलाकार म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त झाल्या.

कथक नृत्याकडे पाहण्याचा त्यांचा स्वत:चा स्वतंत्र दृष्टीकोन (शैली) त्यांनी कथकच्या क्षेत्रात रुजवला व वाढवला. हस्तकांची विविधता, लयकारी, ततकार, बोलांची-बंदिशींची विविधता, हावभाव, भावाभिव्यक्ती, भाषेचा वापर, संगीत, अवकाशाचे भान, एकल-युगुल-समूह संरचना, पढंत, काव्य, कथावस्तू, मांडणीतील लालित्य, आहार्य, अभिनय या सर्वच बाबींवर (कथक नृत्याच्या प्रस्तुतीच्या संदर्भात) त्यांनी विस्तृत आणि खोलवर विचार करून स्वत:ची शैली बनवली व त्यामुळेच हे त्यांचे अत्यंत मोलाचे असे योगदान कथक नृत्याला मिळाले.

त्यांच्या अनेकविध संरचनांपैकी काही ह्याप्रमाणे  : तालप्रस्तुतीत नीलताल (७॥ मात्रा), बैजमोहन (८॥ मात्रा), शिखर (१७ मात्रा), लक्ष्मी (१८ मात्रा), गणेश (२१ मात्रा), रूपकथक (समग्र तीनताल), तरंग (तिस्र, चतुस्र, खंड, मिश्र जातीतील आविष्कार), तसेच काव्य-स्वर-ताल अशी समग्र निर्मिती असणार्‍या ‘सिंधुरवदन’, ‘गणनाथ गौरीसुत’, इ. बंदिशी, ‘त्रिवेणी’ ही त्रिताल, झपताल व रूपक या तीन तालांची गुंफण, अनेक कवित्त, दोहे, वंदना, अभिनयपदांच्या त्यांनी रचना केल्या, तर ‘बॅले’सदृश्य नृत्यसंरचनांत मल्हार, ऋतुसंहार, बिंदा कहे, उष:सूक्त, उद्गार, पावस, समय, मौन, उडान, तन्मात्र, पर्जन्यसूक्त या त्यांच्या चिंतनातून साकारलेल्या श्रेष्ठ कलाकृती होत. ‘उष:सूक्त’सारखा विषय असो (उष:कालाचे वर्णन करणारा) किंवा ‘तन्मात्र’सारखा पंचमहाभूतांवर आधारित व संस्कृत श्लोकांतून उलगडणारा वर्णनात्मक विषय असो, समकालीन विषयात — ‘समय’ ( थांबलेला काळ व खोडकरपणे पळविणारा काळ) ‘कविताली’मधील कठपुतली (समाजातील स्त्रीचे स्वत:च असे ठरवलेले स्थान व स्वातंत्र्य), ‘मैं उदास हूँ’ (आजच्या पिढीतील सकारात्मक व नकारात्मक वृत्तींचे द्वंद्व) अशा नृत्यांचे यशस्वी अर्थानुवाही सादरीकरण — प्रयोग केले आहेत. याबरोबरच ‘पावस’, ‘ॠतुसंहार’, ‘मौन’ या संरचना, तसेच जपानी हायकूवर नृत्यरचना, रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीतील वेचक काव्यांवर नृत्यरचना, अशा वैविध्यपूर्ण रचना, तसेच अनेक संगीतरचना, काव्यरचनाही केल्या आहेत.

स्वातंत्र्यपूर्वकाळात महाराष्ट्रात नृत्यकलेला प्रतिष्ठा नव्हती; मात्र रोहिणी भाटे यांच्या सहा दशकांच्या नृत्यसाधनेच्या भरीव योगदानामुळे आज महाराष्ट्रात अभिजात नृत्यशैली रुजल्या, बहरल्या आहेत. त्यांनी मराठी समाजात नृत्यविषयक अभिरुची व सकारात्मक जाणीव निर्माण केली. शरदिनी गोळे, प्रभा मराठे, शमा भाटे, रोशन दात्ये, अमला शेखर, नीलिमा आध्ये, आशा जोगळेकर, संध्या केळकर, शर्वरी जमेनीस, ऋजुता सोमण, मनीषा अभय इ. शिष्यांच्या तीन पिढ्यांद्वारे रोहिणी भाटे यांचे कार्य प्रसारित होत आहे.

रोहिणी भाटे यांना १९७७ साली नृत्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य’ पुरस्कार, १९७९ साली ‘संगीत नाटक अकॅडमी’ पुरस्कार, ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार (१९९०), पुणे विद्यापीठाचा ‘जीवनसाधना गौरव’ (१९९९) आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार १९९४ साली मिळाला. २००२ साली त्यांना ‘कालिदास’ सन्मान प्राप्त झाला, तर २००४ साली डेक्कन कॉलेजतर्फे त्यांना ‘डी.लिट.’ ही पदवी प्राप्त झाली. २००६ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा ‘रत्न’ पुरस्कारही मिळाला. रोहिणी भाटे यांनी नृत्यकलेतील मूलभूत, संकल्पनात्मक विचारमूल्ये व सिद्धान्त मांडणारे लेखन केले. त्यातील विचारांची स्पष्टता, व्यापकता व भाषाशैलीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी ‘माझी नृत्यसाधना’, ‘कथक दर्पण दीपिका’ व ‘लहेजा’ या पुस्तकांचे लेखन केले. अमेरिकन नृत्यकर्मी इझाडोरा डंकन हिच्या आत्मवृत्ताचा ‘मी इझाडोरा’ हा रोहिणी भाटे यांनी केलेला अनुवाद गाजला होता. वयाच्या ८६व्या वर्षी पुण्यात त्यांचे निधन झाले.

             — आसावरी राहाळकर

भाटे, रोहिणी गणेश