Skip to main content
x

भाटवडेकर, पुरुषोत्तम उद्धव

           विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण भागातील शेती व विदर्भातील पर्जन्याश्रयी शेती विषयातील अधिकारी  व्यक्तिमत्त्व असलेले पुरुषोत्तम उद्धव भाटवडेकर यांचा जन्म पुणे येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील खाजगी नोकरीत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पुणे येथील रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण करून ते १९४२मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. एक वर्ष फर्ग्युसन महाविद्यालय येथे पूर्ण करून ते १९४३मध्ये पुणे येथील कृषी महाविद्यालयात दाखल झाले. त्या काळी हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा होता. त्यांनी १९४६मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी विशेष सन्मानासह प्राप्त केली. भाटवडेकर यांनी दोन वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्य केले. त्यांनी १९४८मध्ये रत्नागिरीतील कृषी विभागात फोंडाघाट येथे नोकरीस सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी काही काळ अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संशोधन केंद्रावर कार्य केले. त्या वेळी त्यांचे संशोधनाचे कार्य कोरडवाहू करडई पिकासंबंधी होते. त्या कार्याचा उल्लेख करडई पिकावरील मोनोग्राफमध्ये आहे. त्यानंतर त्यांना बढती मिळून सोलापूर येथील कोरडवाहू शेती संशोधन केंद्रावर कृषिविद्यावेत्ता या पदावर नेमणूक झाली. त्या ठिकाणी त्यांचा संपर्क सोलापूर येथे कार्यरत असलेल्या मृदा संधारण प्रशिक्षण केंद्रातील प्रमुख व पुढे कृषी खात्याचे सहसंचालक झालेले डी.व्ही. दीक्षित यांच्याबरोबर झाला. त्यांच्याशी चर्चा करताना मृदा व जल संधारण ही कोरडवाहू शेतीची पहिली पायरी आहे, असा भाटवडेकरांचा विचार झाला.

           याच सुमारास त्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयातून १९६८मध्ये एम.एस्सी.(कृषी) पदवी प्रथम वर्गात प्राप्त केली. तसेच १९७२मध्ये त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयात दोन वर्षे प्राध्यापक म्हणून कार्य केले. पुढे त्यांना प्राध्यापक पदावर बढती मिळून ते राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजनेत औरंगाबाद येथे कार्यरत झाले. त्यांची १९७२मध्ये प्राध्यापक पदावर अकोला येथील कृषी महाविद्यालयात बदली झाली. त्यांनी याच कालावधीत नव्याने सुरू झालेल्या डॉ.पं.कृ.वि.तील मध्यवर्ती संशोधन केंद्र आणि मध्यवर्ती प्रक्षेत्र वणीरंभापूर येथे आलटून-पालटून काम केले. या ठिकाणी त्यांनी विदर्भातील भारी काळ्या खोल जमिनींकरिता मृदा व जल संधारणाचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी अशा जमिनीत व पावसाच्या प्रमाणात (सुमारे ९०० ते १००० मि.मी.) ढाळीचे बांध निर्माण करून मृदा व जल संधारण कार्यास चालना दिली. त्यांनी १९८२मध्ये राज्य पातळीवरील मृदा व जल संधारण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी ढाळीचे बांधाबरोबरच जैविक बांधाची प्रायोगिक तत्त्वावर उपयुक्तता चाचणी केली. पुढील काळात विदर्भातील जैविक बांधाच्या वापराची ही सुरुवात होती. त्यांची १९८०मध्ये अकोला येथे कोरडवाहू शेती संशोधन केंद्रात प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून नेमणूक झाली. त्या ठिकाणी जैविक बांध, आपत्कालीन पीक नियोजन अशा उपक्रमाची सुरुवात करून त्यांनी १९८४मध्ये निवृत्ती घेतली.

           याच काळात जागतिक बँकेच्या आर्थिक साह्याने वाशिम जिल्ह्यातील मानोली येथे पर्जन्याश्रयी शेती प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पाची अंमलबजावणी कृषी विभागाकडे होती. डॉ. भाटवडेकरांचा विदर्भातील कोरडवाहू शेती संबंधातील अनुभव ध्यानात घेऊन कृषी विभागाने या योजनेचा संपूर्ण आराखडा त्यांच्याकडून तयार करवून घेतला. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतील हा महत्त्वाचा भाग आहे. त्यात जैविक बांध; गवत लावलेले पाण्याचे पाट व हलक्या उथळ जमिनीत वनीकरण या योजनांचा अंतर्भाव होता.

           - डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

भाटवडेकर, पुरुषोत्तम उद्धव