Skip to main content
x

भावे, सदानंद विश्वंभर

पल्या प्रशासकीय कारकिर्दीत सर्वसामान्य माणसाची बाजू मांडणारे अधिकारी सदानंद विश्वंभर भावे हे मूळचे अकोल्याचे! विदर्भातील अकोला येथे एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. या काळात स्वतंत्र भारताची निर्मिती झाली होती. भावे यांचे वडील शिक्षण खात्यात कारकून होते. ते गांधीवादी विचारांचे होते.

त्यांची आई एक खंबीर स्त्री होती. त्यांनी त्या काळात धाडसी पाऊल उचलत शेजाऱ्यांच्या मदतीने एक बालवाडी सुरू केली होती.  आपल्या मुलांनी योग्य शिक्षण घ्यावे याकडे वडिलांचा कटाक्ष असे. शाळेच्या पहिल्या दोन इयत्ता त्यांनी आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली घरीच पार पाडल्या. तिसरीपासून ते नगरपालिकेच्या शाळेमध्ये दाखल झाले. शाळेतील वक्तृत्व स्पर्धांमध्येही ते भाग घेत.

त्यांची शैक्षणिक कारकीर्द उज्ज्वल होती. भौतिकशास्त्र या विषयात त्यांनी एम.एस्सी. केले. या परीक्षेत ते विद्यापीठात पहिले आले. शाळा आणि महाविद्यालयात वेळोवेळी होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असल्यामुळे त्यांच्यातील नेतृत्वगुण वाढीस लागले. कोणतेही आव्हान स्वीकारण्याची मानसिक घडण याच काळात झाली.

भावे यांचे काका एस.व्ही. भावे हे १९४८ साली आय.ए.एस. झाले होते. भावे यांच्या जीवनावर काकांचा मोठा प्रभाव होता. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसण्याची प्रेरणा त्यांनीच भावे यांनी दिली. प्रशासकीय सेवेस सुरुवात करताना सर्वसामान्य माणसाच्या हिताचे धोरण ठरविणे, निर्णय घेणे हे उद्दिष्ट भावे यांच्या डोळ्यांसमोर होते. प्रशासकीय कारकिर्दीत लडाख, काश्मीर आणि जम्मूसारख्या संवेदनशील भागांत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. हा भाग सोडताना तो पूर्वीपेक्षा अधिक चांगला होईल, या दृष्टीने काम करण्याचा निश्चय त्यांनी केला होता. ‘कोणत्याही गोष्टीत सुधारणेसाठी वाव असतो’, असे ते म्हणतात.

आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. जम्मू व काश्मीरचे मुख्य निवासी आयुक्त, पी.डब्ल्यू.डी.चे मुख्य सचिव, जम्मू व काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी, जम्मू व काश्मीरच्या पर्यटन विकास निगमचे व्यवस्थापकीय संचालक, कारगिल आणि कथुआचे जिल्हाधिकारी, अनंतनागचे साहाय्यक आयुक्त अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या. जम्मू व काश्मीरचे १९९६ च्या सुमारास सचिव असताना त्यांनी लिंगनिदान चाचणी संदर्भात काही नियमावली बनवली. ती नंतर त्या राज्यात लागू करण्यात आली. याच वेळी त्यांनी जम्मूकाश्मीरमधील जमीन धारणा कायद्यात काही बदल करून तो देशाच्या इतर भागांबरोबर जुळवून आणला.

याच काळात त्यांनी विविध मंत्रालयांनाच सल्लागार म्हणूनही काम पाहिले. दहशतवादाने पोखरलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये विकासकामांना चालना देण्यासाठी भावे यांनी अनेक कामांचे नियोजन केले व प्रत्यक्ष कामांवर देखरेखही केली.

केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मारुती उद्योग, भेल, स्कूटर इंडिया लिमिटेड, अवजड अभियांत्रिकी निगम (हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन) या देशातील प्रमुख उद्योगांच्या संचालक मंडळाचे ते सदस्य होते. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना सर्वसामान्य जनतेला उपकारक अशा भूमिका ते घेत असत. ३६ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतून ते २००८ मध्ये निवृत्त झाले.

‘न्यूक्लिअर’ मॅग्नेटिक रेझोनन्स टेक्निक्सचे मॉलेक्युलर असोसिएशन या विषयावरील शोधनिबंधाचे त्यांनी सहलेखन केले. त्यानंतर त्यांनी देशाच्या विविध भागांत ‘सॅनिटेशन’ला चालना देणाऱ्या‘फिनिश’ या कंपनीत कार्यभार स्वीकारला. आपल्या सर्व यशाचे श्रेय आपले मार्गदर्शक आणि लोकांनी दिलेले आशीर्वाद यांच्याकडे जाते, असे ते कृतज्ञतेने म्हणतात.

- सुनिता लोहोकरे

 

 

भावे, सदानंद विश्वंभर