Skip to main content
x

भावे, विनायक लक्ष्मण

    विनायक लक्ष्मण भावे यांचा जन्म पनवेलनजीक पळस्पे ह्या गावी झाला. यांचे मराठी व इंग्रजी शिक्षण ठाणे येथे व उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात झाले. १८९१मध्ये मॅट्रिक, तसेच १८९५मध्ये बी.एस्सी. झाले.

     शाळेत व महाविद्यालयात अनुक्रमे जनार्दन बाळाजी मोडक व प्रा. अलेक्झांडर या विद्वान अभ्यासकांचा सहवास घडून त्यांना इतिहास, जुनी मराठी कविता व शास्त्रीय विषय यांच्या अभ्यासाची गोडी लागली. काव्येतिहाससंग्रह व काव्यसंग्रहकर्ते ज. बा. मोडक यांच्या सहवासात भावे यांचे मराठी सारस्वताचे वाचन व मनन झाले. वडील गेल्यानंतर घरचाच मिठागराचा व्यवसाय त्यांनी मोठ्या हिकमतीने चालवला व वाढवला. व्यवसायानिमित्त झालेल्या प्रवासाचा उपयोग त्यांनी वाङ्मय संशोधनासाठी करून घेतला.

     महाविद्यालयीन जीवनात भावे यांना लागलेल्या ग्रंथवेडामुळे त्याच्याकडे मराठी पुस्तकांचा उत्तम संग्रह जमला. १ जून १८९३रोजी आपल्या या संग्रहाला सार्वजनिक रूप देत त्यांनी ठाणे येथे मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली. जुनी पुस्तके व हस्तलिखिते मिळवून त्यांचा संग्रह करणे, वाचनाची अभिरूची निर्माण करून ती वाढवणे आणि तदनुषंगिक अनेक वाङ्मयीन कार्ये उभारणे अशा व्यापक उद्दिष्टांनी भावे यांनी मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे सन १९०३मध्ये प्राचीन मराठी ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी ‘महाराष्ट्र कवी’ मासिक पुस्तक सुरू केले व ते चार-साडेचार वर्षे चालवले. या मासिकातून दासोपंत, रंगनाथ स्वामी निगडीकर, रंगनाथ मोगरे, आनंदतनय, शिवराम, निरंजन माधव इत्यादिकांचे अप्रकाशित ग्रंथ व अनेक कवींच्या स्फुट कविता, ‘पंचतंत्रा’चे गद्य भाषांतर वगैरे प्रकरणे प्रसिद्ध झाली आहेत. ‘महाराष्ट्र कवी’ च्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळामार्फत प्रयत्न चालवले व त्याचेेच फलित म्हणून ‘महाराष्ट्रीय सारस्वत व महाराष्ट्र कवी’ अशा जोडनावाने हे मासिक सुरू झाले; पण अवघ्या सहा महिन्यांतच बंद पडले. प्राचीन मराठी गद्य व पद्य या दोनही वाङ्मयप्रकारांचा त्यात अंतर्भाव केला गेला होता.

     छत्रे, कृष्णशास्त्री चिपळूणकर व परशुरामतात्या गोडबोले यांच्या लेखनाने, तसेच जनार्दन बाळाजी मोडकांसारख्या शिक्षकांच्या प्राचीन मराठी कवितेविषयीच्या कार्यामुळे महाविद्यालयीन जीवनातच भावे यांच्यात वाङ्मयप्रेम निर्माण झाले होते. श्रीधर, महिपती, मुक्तेश्वर वगैरेंच्या वाङ्मयाची टाचणे त्यांनी त्याच वेळी तयार केली होती. सुमारे शंभर पृष्ठे भरतील एवढा हा निबंध त्या वेळच्या उपलब्ध साधनांचा मागोवा घेऊन लिहिला होता. हा त्यांचा निबंध ग्रंथमालेत मार्च १८९८ ते मे १८९९मध्ये पहिल्यांदा क्रमश: प्रसिद्ध झाला. भावे यांनी हा अभ्यास पुढे तसाच चालू ठेवला. महाराष्ट्र कवीच्या निमित्ताने त्यांनी अनेक कवींच्या रचनांचा अभ्यास केला. मूळच्या शंभर पानी ग्रंथाचा सहाशे पृष्ठांइतका विस्तार करून त्याला त्यांनी ग्रंथराजाचे स्वरूप दिले. सन १९१९मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळामार्फत त्यांनी ‘महाराष्ट्र सारस्वत’ या ग्रंथाची द्वितीय आवृत्ती प्रसिद्ध केली.

     द्वितीय आवृत्तीनंतरही त्यांचा प्राचीन मराठी कवितेचा व्यासंग सुटला नाही. त्यांच्या व त्यांच्या सहकारी संशोधक मित्रांनी केलेल्या संशोधनामुळे तृतीय आवृत्ती काढण्याचे त्यांनी निश्चित केले. या वेळी मात्र त्यांना मराठी सारस्वताचे एक अज्ञात दालनच खुले होते, ते म्हणजे महानुभवीय साहित्य होय. महानुभवीय महंताच्या सहकार्याने भाव्यांनी सांकेतिक लिप्यांमध्ये बद्ध झालेले वाङ्मय सर्व जगापुढे खुले केले. महाराष्ट्र सारस्वताची तिसरी आवृत्ती त्यांनी दोन खंडांत प्रसिद्ध केली. त्यांपैकी पहिला खंड सन १८२४मध्ये निघाला, तर दुसरा खंड हा त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने प्रसिद्ध केला. ज्ञानेश्वर — पूर्वकालीन व समकालीन अस्तित्वात असलेल्या व पुढेही विस्तार पावलेल्या पण महाराष्ट्रात सात-आठ शतके अज्ञात असलेल्या महानुभाव वाङ्मयाचा शोध व बोध अत्यंत चिकाटीने करवून घेऊन त्याचा परिचय ह्या ग्रंथात जो करून दिला आहे ती त्यांची कामगिरी मराठी वाङ्मयेतिहासात अपूर्व व अविस्मरणीय अशी आहे. वाङ्मय संशोधनाइतकेच इतिहास संशोधनाचेही वेड भावे यांना लागले होते. यामागची त्यांची प्रेरणा सर्वस्वी राष्ट्रीय अस्मितेच्या उत्थापनाची होती. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाविषयी त्यांना नितांत अभिमान वाटत असे. इंग्रजांनी हेतुत: केलेली आपल्या इतिहासाची विटंबना पाहून त्यांचा संताप अनावर होत असे. राष्ट्राचा तेजोभंग करणारे हे इंग्रज पुरस्कृत इतिहास-लेखन पुसून टाकवयाचे असेल, तर आमची इतिहास साधने आम्ही परिश्रमपूर्वक धांडोळली पाहिजे, आमच्या दृष्टीने अभ्यासली पाहिजेत आणि मग राष्ट्रीय इतिहासाची रचना केली पाहजे; असे त्यांना वाटत असे. महाराष्ट्रीयांना त्यांची स्वत:ची जाणीव नीट व्हावी या हेतूने भावे यांनी ठाणे येथे इ.स.१९१७मध्ये ‘मराठी दप्तर’ या नावाची संस्था स्थापन केली होती. इतिहास संशोधकांच्या परिश्रमांनी उपलब्ध झालेली ऐतिहासिक कागदपत्रे निवडून यथामूल स्वरूपात छापून प्रसिद्ध करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट होते. या दप्तराचे ‘रुमाल पहिला’ ‘रुमाल दुसरा’ आणि ‘रुमाल तिसरा’ असे तीन ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. पहिल्या रुमालात ‘श्रीमंत महाराज भोसले यांची बखर’, दुसर्‍या रुमालात ‘सेनापती बापू गोखले याची कैफियत’ तर तिसर्‍या रुमालात ‘शिवकालीन’ व ‘अलिबहादराची पत्रे’ असे कागद प्रसिद्ध झाले आहेत. रुमाल दुसरा याला भावे यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिली असून त्यात मराठेशाहीच्या अखेरीची मीमांसा केली आहे. बाजीराव रघुनाथला न्याय देणारी भावे यांची ही मीमांसा त्यांच्या समकालीनांना फारशी रुचलेली दिसत नाही.

     शिवाजी महाराजांचे एक विस्तृत चरित्र लिहिण्याचा भावे यांचा मानस होता. त्यासंबंधीची साधने गोळा करून व आराखडा आखून त्यांनी काही प्रकरणे लिहूनही काढली होती. त्यांतील काही नियतकालिकातून प्रसिद्धही केली होती. अफजलखानाचा वध, श्रीशिवाजीमहाराजांचे एक राजकारण, शाहिस्तेखानाची मोहीम, शिवाजीची वंशकुळी ही त्यांतील काही प्रकरणे होत. अफजलखानाचा वध आणि शाहिस्तेखानाचा फजीतवाडा हे दोन प्रसंग शिवचरित्रात विलक्षण महत्त्वाचे असल्यामुळे त्या प्रसंगातले सर्व बारकावे हेरणारी आणि शिवप्रभूंच्या मुत्सद्देगिरीच्या, चातुर्याच्या आणि विक्रमाच्या दृष्टीने त्यांची वेधक मांडणी करणारी ही प्रकरणे आहेत. भावे यांच्या ग्रंथसंभारात ‘महाराष्ट्र सारस्वता’च्या खालोखाल त्यांच्या ‘चक्रवर्ती नेपोलियन’ या चरित्रग्रंथाचे महत्त्व आहे. मराठीतील चरित्र वाङ्मयाच्या इतिहासात एक उत्तम चरित्रग्रंथ म्हणून त्याची गणना करतात.

     काव्य व इतिहास ह्या क्षेत्रांत भावे ह्यांनी आपल्या कल्पनेप्रमाणे पोटतिडकीने जो उद्योग केला त्यामुळे त्या-त्या विषयाच्या अभ्यासक्षेत्रात नवीनांना बरीच प्रेरणा मिळाली. अनेक अभ्यासकांना पुढे पाऊल टाकण्यास पाथेयही भरपूर मिळाले.

डॉ. गिरीश मांडके

संदर्भ
१.      खानोलकर गं. दे., अर्वाचीन मराठी वाङ्मयसेवक, चतुर्थ खंड, स्वस्तिक प्रकाशन हाऊस, मुंबई, १९५७

२.      ढेरे रा. चिं. वारसा, विश्वकर्मा साहित्यालय, पुणे, १९७१.
भावे, विनायक लक्ष्मण