Skip to main content
x

भेंडे, प्रकाश गजानन

     चित्रपट क्षेत्राच्या पलीकडे जाऊनही आपले काही छंद जपणारे काही जण मराठी चित्रपटसृष्टीत आहेत. त्यात प्रकाश भेंडे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्यांनी पोट्रेट करण्याचा आपला छंद व्यवस्थित जपला व मुंबईतील मान्यवर ‘आर्ट गॅलरी’त आपल्या पोट्रेटची प्रदर्शनेदेखील भरवली.

     प्रकाश भेंडे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिरा येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. प्रकाश भेंडे यांचे बालपण गिरगावात गेले. ‘बरोत लेन’ म्हणून ओळखले जाणाऱ्या सेंट सॅबेस्टियन हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. पण वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी वडिलांचे अचानक निधन झाल्याने त्यांच्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आली. त्यातून त्यांनी टेक्स्टाईल डिझायनर होण्याचा निर्णय घेतला, तो त्यांना कायम फळला.

     गिरगावात बालपण घडताना विविध कारणास्तव साजरे होणाऱ्या रंगमंचीय कार्यक्रमांमध्येही (स्टेज शोमध्येही) त्यांनी सहभाग घेतला. त्यातून त्यांची कलेची आवड कायम वाढत राहिली. ‘चिमुकला पाहुणा’, ‘अनोळखी’ अशा काही चित्रपटांतून छोट्या भूमिका साकारत ते चित्रपटाच्या जगात आले, तर ‘नाते जडले दोन जिवांचे’ या चित्रपटात त्यांना नायक साकारण्याची संधी मिळाली. त्यात अनुपमा या त्यांची नायिका होत्या. काही वर्षांनी त्यांनी स्वत:च निर्माता व्हायचे ठरवले व राजदत्त यांच्याकडे दिग्दर्शन सोपवून ‘भालू’ चित्रपटाची निर्मिती केली. ‘भालू’त प्रकाश भेंडे व त्यांची पत्नी उमा भेंडे हेच नायक-नायिका होते.

     ‘भालू’ चित्रपटाला उत्तम व्यावसायिक यश लाभल्यावर अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन व वितरण अशा चारही विभागातील प्रकाश भेंडे यांचा रस वाढला. प्रकाश यांनी त्यानंतर ‘चटकचांदणी’, ‘आपण यांना पाहिलंत का?’, ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’, ‘आई थोर तुझे उपकार’ या चित्रपटांची निर्मिती केली. ‘श्रीप्रसाद चित्र’ या आपल्या बॅनरच्या चित्रपटातूनच कांचन अधिकारी, हेमांगी राव, रेशम टिपणीस यांना प्रकाश भेंडे यांनी संधी दिली. ‘पंचरत्न फिल्म डिस्ट्रिब्यूशन’ या नावाने त्यांचे वितरण कार्यालय आहे.

- दिलीप ठाकूर

संदर्भ
१) प्रत्यक्ष मुलाखत
भेंडे, प्रकाश गजानन