Skip to main content
x

भगत, वजूभाई धनजीभाई

       ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलाशैलीत काम करणाऱ्या , उत्तम चित्रकारांत वजूभाई भगत यांची गणना केली जाते. या स्कूलमधील चित्रकार पाश्‍चात्त्य कलेच्या प्रभावापासून मुक्त होऊन, कलेतील भारतीय-त्वाचा शोध घेत स्वतंत्र शैली निर्माण करण्याबाबत जागरूक झालेले होते. ते शिकत होते त्या काळात पाश्‍चिमात्य कलाचळवळीतून प्रेरणा घेऊन सुरू झालेल्या आधुनिक आविष्कारातील प्रयोगांबाबतही त्यांना औत्सुक्य वाटू लागले होते. यातून कलाक्षेत्रात विचारमंथनाला आरंभ झाला होता. त्याचे पडसाद भगत यांच्या कलानिर्मितीत उमटलेले दिसतात. परंतु त्यांचे अनुकरण न करता स्वतःला पटेल व रुचेल त्याच पद्धतीने भगत चित्र रंगवीत होते. त्यांच्या सौंदर्यासक्त व मर्मग्रही वृत्तीचा प्रत्यय त्यांच्या दर्जेदार निर्मितीतून सहजतेने येतो.

वजूभाई धनजीभाई भगत यांचा जन्म सौराष्ट्रातील लाठी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव जिवूबेन होते. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील पोद्दार हायस्कूल येथे झाले. त्यांनी १९४२ मध्ये ड्रॉइंग आणि पेंटिंगची पदविका सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून घेतली. येथेच म्यूरल डेकोरेशनचा कोर्सही त्यांनी १९४३ मध्ये पूर्ण केला. जे.जे. स्कूलमधील फेलोशिपमुळे तेथे त्यांनी एक वर्ष शिकवले. नंतर काही काळ तेथील सायंवर्गात ते प्राध्यापकही होते.

वजूभाई भगत यांचा विवाह १९४७ मध्ये पद्माबेन यांच्याबरोबर झाला. चरितार्थासाठी त्यांनी न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीत नोकरी केली. तदनंतर १९५६ मध्ये त्यांनी ‘भगत ब्रदर्स’ या नावाने एक डिपार्टमेंटल स्टोअर सुरू केले. त्याचा व्याप वाढल्यामुळे हळूहळू त्यांची कलानिर्मिती थंडावली. परंतु त्या काळातही त्यांनी या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये आर्ट गॅलरी सुरू करून दृश्यकलेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील ऑपेरा हाउससमोर असणारा हा व्यवसाय त्यांनी १९९० मध्ये बंद केला.

त्यांच्या कलानिर्मितीबद्दल कार्ल खंडाळावाला म्हणतात, ‘‘वजूभाई भगत व त्यांच्या समकालीन चित्रकारांचा एक गट हा यथार्थदर्शी चित्रण आणि पाश्‍चिमात्य जगातील कलाचळवळींचा प्रभाव या दोन्हींपासून दूर राहून स्वतःला पटेल व रुचेल अशाच पद्धतीने चित्रनिर्मिती करीत राहिला. वजूभाई भगत हे त्यांपैकी एक महत्त्वाचे चित्रकार, ज्यांनी बॉम्बे स्कूलच्या चित्रपरंपरेत महत्त्वाची कामगिरी बजावली.’’ त्यांचे   चित्रविषय व चित्रे सभोवती घडणाऱ्या समाजजीवनावर आधारित असत व ती ‘चित्रस्वरूप भाष्य’ (पिक्टॉरियल कॉमेंट) अशा स्वरूपाची असत.

त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैलीची बीजे त्यांच्या शिक्षणाच्या काळातील संस्कारात असून ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ या भारतीयत्व जोपासणाऱ्या कलाचळवळीशी निगडित आहेत. १९२० च्या दरम्यान सुरू झालेल्या या कलाचळवळीत प्रामुख्याने दोन प्रकारे चित्रनिर्मिती झाली: १. पारदर्शक रंगांचे पातळ वॉश एकमेकांवर देत वॉश टेक्निकमध्ये, २. अपारदर्शक जलरंगाचा व लयपूर्ण रेषेचा वापर करीत लघुचित्र- शैलीप्रमाणे. अशा प्रकारे चित्र काढण्यास शिकविणारे दोन वेगळे वर्ग जे.जे.त सुरू करण्यात आले. पारदर्शक रंगांचे वॉश देत चित्रनिर्मिती शिकविणाऱ्या वर्गाचे शिक्षक गुणवंत हणमंत नगरकर होते, तर अपारदर्शक जलरंगात चित्रनिर्मिती जे.एम. अहिवासी यांच्या वर्गात शिकवली जाई. वजूभाई भगत हे अहिवासींच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले.

त्यांच्या चित्रांत मुख्यत्वे भारतीय कलामूल्यांचे जतन केले गेले आहे. विषयाच्या आवश्यकतेनुसार त्यांत साधेपणा, अलंकरण किंवा  स्टायलायझेशन यांचा संमिश्र आविष्कार करत ती भारतीय परंपरा त्यांनी जोमदारपणे पुढे नेली. लघुचित्रशैलीतील प्रासाद, उद्याने, नायक-नायिका, उत्सव, रागमाला इत्यादींभोवती फिरणार्‍या विषयांना फाटा देऊन त्यांनी सर्वसामान्यांच्या अनुभवातील ‘स्टेशन’, ‘फॅक्टरी’, ‘सोसायटी’ यांसारख्या नव्या विषयांना आपली शैली भिडवली. हे त्यांचे समकालीनांमधील आगळेपण होते. मुख्यत्वे अपारदर्शक जलरंगात निर्मिती करणाऱ्या भगत यांनी आपल्या सभोवती घडणार्‍या अनेक छोट्यामोठ्या घटना, वेगवेगळी कामकाजे, दैनंदिन व्यवहार यांतील दृश्यात्मक लय व सौंदर्य यांचा आविष्कार आपल्या चित्रांतून केला.

भारतीय लघुचित्रशैलीपासून प्रेरणा घेऊन निर्मिती करणाऱ्या भगत यांनी चित्रात दृश्यात्मक लय व सौंदर्य यांचा आविष्कार केला. ‘कपडे वाळत घालणारी कोळीण’, लहान मुलाबाळांना उद्यानात घेऊन आलेल्या व त्यांना सांभाळणाऱ्या आया, ‘स्क्रीन प्रिंटिंग फॅक्टरी’, इत्यादी चित्रे याची द्योतक आहेत. कोळीण चित्रातील धट्टीकट्टी स्त्री पाठमोरी आहे, तरीही तिची कामाची व्यस्तता लक्षात येते. जवळच वाळत घातलेल्या साडीमागे उभ्या असलेल्या स्त्रियांपैकी एक तिच्याकडे बघताना, तर दुसरी अलिप्तपणे समोर पाहत असलेली दाखवली आहे. कोळिणीने माळलेली फुले, कानांतील मोठी जड कर्णभूषणे, साडी नेसण्याची विशिष्ट पद्धत असे बरेच तपशील भगतांनी दाखवले आहेत. ‘माय फादर’ या चित्रात एका बाजूला टाळ- चिपळ्यांच्या गजरात भजन-कीर्तनात तल्लीन झालेली माणसे आहेत, त्यांच्यासोबत एक ज्येष्ठ व्यक्ती चौपाईवर बसून गुडगुडी ओढत एकाग्रतेने लक्षपूर्वक ते सूर, तो ताल ऐकत आहे.

अशा काही चित्रांचा बाज लघुचित्रशैलीसारखा आहे. चित्रांतील मनुष्याकृती व इतर घटकांचे आकार घाटदार व नाजूक बाह्य रेषेने निश्‍चित केलेले असतात. लघुचित्रशैलीत एकाच पातळीवर घडणार्‍या विविध घटना चित्रित केलेल्या असतात. त्यांत पाश्‍चात्त्य  कलेप्रमाणे परिप्रेक्ष्याचा (पर्स्पेक्टिव्हचा) वापर व छाया -प्रकाशाचा भेद नसतो. अशी काही वैशिष्ट्ये ‘गॅ्रंट रोड स्टेशन’ व ‘स्क्रीन प्रिंटिंग फॅक्टरी’ यांसारख्या चित्रांत दिसतात. ‘ग्रँट रोड स्टेशन’ या चित्रात लोकल, ड्रायव्हर, प्रवासी, तिकीट तपासनीस, विक्रेते, हातगाडीवाले, बघे अशा अठरापगड जातींच्या, सुमारे शंभरएक व्यक्तींचा वावर आहे. असा विस्तृत आवाका कागदाच्या मर्यादित पृष्ठभागावर एकाच पातळीवर आणण्यात चित्रकाराच्या सर्जनशील प्रतिभेचे दर्शन होते.

‘स्क्रीन प्रिंटिंग फॅक्टरी’त लहान-लहान विभाग आहेत; पण त्यांत एक सुसूत्रता आहे. त्यांच्या ‘डिझाइन’बाबतच्या सौंदर्यपूर्ण जाणिवेचा प्रत्यय या चित्रातून येतो. येथील मानवी आकृत्यांचे चेहरे कडेने (प्रोफाइल) दाखवले असले तरी डोळे मात्र समोरून पाहिल्याप्रमाणे पूर्णाकृती आहेत. हे लोककलेचे एक वैशिष्ट्य आहे. ते येथे व अन्य चित्रांतही डोकावते. भगत यांनी मानवी स्वभावाची वैशिष्ट्ये व निरनिराळे मूड मार्मिकपणे टिपले आहेत. चित्रातील कामगारवर्ग, टेबलावर पाय ठेवून व खुर्चीवर आरामशीर रेलून कामगारांवर नजर ठेवणारा ठेकेदार, खाटेवर बसून सर्वत्र लक्ष ठेवणारा रखवालदार हे सारे चित्रण त्यांच्या सूक्ष्म   निरीक्षणशक्तीचा प्रत्यय देते.

‘माथेरान बॉइज’ या चित्रात दोन उघडी आदिवासी मुले आपल्या डोक्यावरून झाडाचा ओंडका वाहून नेताना दाखवली आहेत. त्यांचे डोळे विस्फारलेले आहेत. लालसर पायवाटेच्या पार्श्‍वभूमीवरचा त्यांचा गडद सावळा वर्ण, डोईवरील काळपट रंगाचे इरले, कडेच्या वृक्षांच्या खोडांचा गडद रंग, अशा गडद पार्श्‍वभूमीवर उठून दिसणारे काळ्या डोळ्यांमागचे शुभ्र पटल, त्याच छटेची मलिन लंगोटी वेगळीच अनुभूती देते, तर ‘फायर ब्रिगेड’, ‘सोसायटी’ यांसारख्या चित्रांतून पाश्‍चात्त्य कलेतील क्युबिझमचे आकर्षण व्यक्त होते. ‘माय फादर’ व ‘स्क्रीन प्रिंटिंग फॅक्टरी’ यांतून लोककलेतील लय जाणवते. लघुचित्रशैली, लोककला व क्युबिझम यांमधील सुलभीकरणाचा समान धागा अलगदपणे त्यांच्या चित्रांत उमटतो. त्यांचे रंगलेपन कधी सपाट, तर कधी ढगाळ (पॅचेस) असते. आवश्यक तेथे पोतांची (टेक्स्चर) अदाकारी असते. आकारांभोवती असलेली नाजूक, बोलकी बाह्यरेषा ही त्यांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. याखेरीज त्यांनी ‘रिफ्यूज’, ‘डिसोलेशन’ असे मानवाकृतीविरहित विषयही चित्रित केले आहेत.

भारतातील अहमदाबाद, दिल्ली, मुंबई येथे वजूभाई भगत यांची प्रदर्शने झाली. लंडन येथील बर्लिंग्टन आर्ट गॅलरीत १९४५ मध्ये ‘इंडियन आर्ट’ या प्रदर्शनात व अमेरिकेत त्यांची चित्रे प्रदर्शित झाली. दिल्लीतील संसदेत त्यांचे म्यूरल लावलेले आहे. कलेच्या क्षेत्रात ते सक्रिय होते. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’, ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ व ‘जहांंगीर आर्ट गॅलरी’च्या कार्यात त्यांचा सहभाग असे. ‘ऑल इंडिया हँडिक्राफ्ट्स बोर्ड. पायलट प्रॉडक्शन सेंटर फॉर टॉइज’, मुंबई या संस्थेच्या व अन्य अनेक कलासंस्थांच्या सल्लागार समितीत ते होते.

नवीन चित्रकारांना शिक्षण देण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने १९५७ मध्ये त्यांची नियुक्ती केली होती. ‘म्युझियम सोसायटी’ व ‘बॉम्बे अ‍ॅड संकल्पना मुंबई’ यांचे ते संस्थापक सभासद होते.

- साधना बहुळकर

 

संदर्भ
संदर्भः खंडाळावाला, कार्ल; ‘वजूभाई भगत’.
भगत, वजूभाई धनजीभाई