भिडे, गणेश रंगो
गणेश रंगो भिडे यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अष्टे, सांगली या जन्मगावी सुरुवातीचे शिक्षण घेऊन त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामधून एम.ए. व श्रीमती ताराराणी महाविद्यालयातून बी.टी. या पदव्या संपादन केल्या. तत्पूर्वी मॅट्रिकनंतर त्यांनी काही काळ प्रभात फिल्म कंपनीत नोकरी केली. बी.टी. होऊनही त्यांनी अध्यापन व्यवसाय पत्करला नाही. प्रभात कंपनीत काम करीत असताना विणकाम, पाकशास्त्र या विषयांवरची पुस्तके, ‘हाऊसहोल्ड एन्सायक्लोपीडिया’ पाहून मराठीमध्येदेखील अशा तर्हेची पुस्तके असणे गरजेचे आहे, असे त्यांना वाटले. त्यांनी तत्काळ सुमारे ३५ विषयांची सूची तयार केली आणि दि. २० एप्रिल १९३१ रोजी मा.त्र्यं. पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एका समारंभात ‘व्यावहारिक ज्ञानकोश मंडळा’ची स्थापना केली.
त्यानंतर १९३२मध्ये त्यांनी ‘सिनेमासृष्टी’ हे पहिले मराठी सिने नियतकालिक काढले. पुढे १९३३मध्ये त्यांनी व्यावहारिक मंडळाचे रूपांतर ‘लिमिटेड कंपनी’त केले. १९३५ साली या कोशाचा पहिला खंड प्रकाशित झाला. त्याशिवाय ‘सेवक’, ‘पुढारी’ व ‘उष:काल’ या नियतकालिकांतही त्यांनी काम केले. पुण्याच्या ‘केसरी’ व ‘त्रिकाल’ वृत्तपत्रांचे वार्ताहर म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
१९३५-४० या कालावधीत त्यांच्या ‘व्यावहारिक ज्ञानकोशा’चे पाच खंड प्रकाशित झाले. यातील लेखांचे लेखक अप्रसिद्ध पण व्यासंगी होते. त्यांच्या लेखनाचा दर्जा उत्तम होता. चित्रे, छायाचित्रे, सुबक बांधणी आणि वाजवी किंमत ही या कोशाची वैशिष्ट्ये होती. स्वातंत्र्योत्तर काळात नवे ज्ञान देणार्या ‘अभिनव मराठी विश्वकोशा’चे पाच खंड त्यांनी १९३६-१९७९ या कालखंडामध्ये प्रकाशित केले. जे.पी. नाईकांच्या सूचनेवरून तयार केलेला शैक्षणिक कोश मात्र नाईकांनी कोल्हापूर सोडल्याने पुढे पूर्ण होऊ शकला नाही.
कोश वाङ्मयाव्यतिरिक्त त्यांनी बहुविध विषयांवर लेखन केले आहे. त्यापैकी ‘फोटो कसे घ्यावेत’, ‘सावरकर सूत्रे’, ‘कोल्हापूर दर्शन’ (पु.ल. देशपांडे यांच्या सहकार्याने, १९७१), कलामहर्षी बाबूराव पेंटर’ (१९७८) ही महत्त्वाची व मान्यताप्राप्त पुस्तके होत. ‘कलामहर्षी बाबूराव पेंटर’ हे त्यांचे चरित्रात्मक पुस्तक फार गाजले.
- संपादक मंडळ