Skip to main content
x

भिडे, विष्णू गणेश

     घनस्थिती भौतिकी आणि सौरऊर्जा या क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हणून मान्यता पावलेले डॉ. विष्णू गणेश भिडे यांचा जन्म दर्यापूर येथे झाला. नागपूर विद्यापीठाची भौतिक- शास्त्रातील एम.एस्सी. पदवी त्यांनी प्रथम क्रमांकाने, अनेक बक्षिसे आणि शिष्यवृत्त्यांसह पटकावली आणि लगेच तेथेच ते व्याख्याते म्हणन रुजू झाले. त्यांच्या ‘इलेक्ट्रिकल डिस्चार्जेस’ या विषयावरील प्रबंधास नागपूर विद्यापीठाने १९५३ साली डॉक्टरेट दिली. ‘ऑप्टिकल अ‍ॅण्ड इंटर फेरोमेटिक स्टडीज ऑफ सम आस्पेक्ट्स ऑफ क्रिस्टल ग्रोथ’ या विषयावरील त्यांच्या प्रबंधावर लंडन विद्यापीठाची डॉक्टरेट त्यांनी १९५६ साली मिळवली. पुढे मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक व नंतर विभागप्रमुख या नात्याने ते काम पाहू लागले.

     इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे फेलो, इंडियन फिजिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष, १९७१ साली बंगळुरू येथील इंडियन सायन्स काँग्रेसच्या भौतिकशास्त्र विभागाचे अध्यक्ष अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषवली आहेत.

     १९६६ साली ते दिल्लीच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीत उपसंचालक या नात्याने काम पाहू लागले. मध्ये काही वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. घनस्थिती भौतिकीच्या क्रिस्टल ग्रेथ, फेरो इलेक्ट्रिसिटी, फेरोमॅग्नेटिझम, लिक्विड क्रिस्टल, मॉसबॉअर आणि एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी वगैरे बऱ्याच शाखांत त्यांनी संशोधन केलेले आहे.

     शंभरहून अधिक संशोधनपर निबंध आणि अर्धे शतक पीएच.डी. विद्यार्थी त्यांच्या कर्तृत्वाची ग्वाही देत आहेत. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, झेकोस्लोव्हाकिया, रशिया, इस्रायल, जपान इत्यादी प्रगत देशांनीही त्यांना वेळोवेळी सन्मानाने बोलावून त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेतलेला आहे. कित्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिक संस्थांचे ते पदाधिकारी हेाते. १९७४ साली ते सौरऊर्जेसंबंधी एका राष्ट्रीय समितीचे कार्याध्यक्ष होते. त्या अधिकारात त्यांनी युनोला भेट दिली. ‘यू.एन. इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशन’ या संस्थेचेही ते उपाध्यक्ष होते. सौरऊर्जेवर एक उत्तम गट त्यांनी तयार केला आहे. या सौरऊर्जेचा खेड्यांच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल, यासंबंधीचे संशोधन त्यांनी चालू केले. पुणे विद्यापीठामध्ये ऊर्जा विभाग स्थापन करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. या विभागाच्या भरभराटीत त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. पुणे विद्यापीठात आल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत चांगले निर्णय घेतले गेले.

     प्रा. वि.ग. भिडे यांनी आपल्या प्रावीण्याचा ठसा सर्वत्र उमटविला. पुणे विद्यापीठातील अनेक तरुण संशोधकांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यानंतर प्रा. वि.ग. भिडे यांना पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी आरूढ होण्याची संधी मिळाली. या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला. पुणे विद्यापीठाचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक नवीन योजना अमलात आणल्या. संशोधनाला चालना मिळावी, यासाठी त्यांनी ‘आयुका’ (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्टॉनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्टॉफिजिक्स), तसेच एन.सी.आर.ए. (नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी) यांसारख्या संस्था पुणे विद्यापीठाच्या आवारात आणण्यासाठी पुढाकार घेतला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले. त्यांच्या कुलगुरुपदाच्या कारकिर्दीमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रश्‍न खूप मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले. सरकारी महाविद्यालये व नवीन सरकारमान्य खाजगी महाविद्यालये यांच्यामध्ये असणारा दुरावा प्रा. वि.ग. भिडे यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणात कमी केला.

     कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्यानंतर प्रा. वि.ग. भिडे यांनी २००० साली इंडियन सायन्स काँग्रेसचे अधिवेशन, पुणे विद्यापीठात भरले. त्या अधिवेशनात मुलांच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी प्रा. सी.एन. राव यांनी प्रा. वि.ग. भिडे यांच्यावर टाकली होती. त्यांनी आपल्या कार्याची दिशा ही विज्ञान प्रसार व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याकडे वळविली. या कार्यात त्यांनी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले. विज्ञान शोधिका स्थापन करण्याची त्यांची कल्पना ही अभिनव अशीच होती. शालेय व महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना विज्ञान हे अत्यंत अयोग्य पद्धतीने शिकवले जाते, याची त्यांना खंत होती. प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान शिकता यावे, यासाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा त्यांनी संकल्प केला. ‘भारतीय विज्ञान भवन’ या संस्थेच्या सहकार्याने त्यांनी हा उपक्रम प्राथमिक स्तरावर सुरू केला. प्रा. वि.ग. भिडे यांना मानणारे शिक्षक, प्राध्यापक, तसेच विज्ञानाची आवड असणाऱ्या व्यक्ती यामध्ये सामील झाल्या. अगदी कमी आर्थिक मदतीत उपक्रम कसे राबवावेत, याची प्रा. वि.ग. भिडे यांना चांगलीच कल्पना होती. किंबहुना त्यांचे याबाबतचे वर्तन हे आदर्श होते.

     प्रा. वि.ग. भिडे यांच्यासाठी काम करताना कोणीही कधीही पैशाची मागणी करीत नसे. प्रा. वि.ग. भिडे यांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही, हेच धोरण त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये होते. विज्ञान शोधिका त्यांनी अशा प्रकारे चालवून तिचा विकास केला. या प्रयोगासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडून विनामूल्य जागा मिळविली. याच जागेवर आज विज्ञान शोधिकेची भव्य वास्तू उभी आहे.

     कार्यमग्न राहणे हे प्रा. वि.ग. भिडे यांचे वैशिष्ट्य होते. निवृत्तीनंतर त्यांच्या कामाचा झपाटा अधिकच वाढला, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. या काळात त्यांनी महाराष्ट्रात व नागपूरमध्ये ठिकठिकाणी अनेक व्याख्याने दिली. यांतून त्यांनी ‘बाल विज्ञान चळवळी’ची कल्पना पुढे मांडली. महाराष्ट्रात विज्ञान प्रसार करणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु या संस्था स्थानिक पातळीवर त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे कार्य करतात. या सर्व संस्थांना एकत्रित करून चळवळ निर्माण करावी, असे प्रा. वि.ग. भिडे यांना वाटले. त्यांनी या सर्व संस्थांना एकत्र आणले आणि ‘बाल विज्ञान चळवळी’ची स्थापना केली. या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रमांची आखणी केली व ते त्यांनी यशस्वीपणे राबविले. डॉ. अब्दुल कलाम यांनी या कार्यात सहभाग घेतला.

     प्रा. वि.ग. भिडे यांच्या या महत्त्वपूर्ण कार्यात प्रा. यशपाल, डॉ. बालसुब्रमण्यम, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर, डॉ. अशोक कोळस्कर, डॉ. पंडित विद्यासागर या आणि अशा अनेक गणमान्य व्यक्तींनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसाठी विज्ञानावरील उत्कृष्ट पुस्तके आणावीत, असा त्यांचा मानस होता. त्यातून विज्ञान शोधिका अंतर्गत पुस्तकांची निर्मिती केली गेली. या प्रयोगात अनेक दर्जेदार पुस्तकांची निर्मिती झाली. काही कारणांमुळे ही योजना पुढे चालू राहिली नाही, तरी दर्जेदार पुस्तकांच्या निर्मितीचा वस्तुपाठ यामधून घातला गेला.

डॉ. पंडित विद्यासागर

भिडे, विष्णू गणेश