Skip to main content
x

भिडे, विष्णू परशुराम

          विष्णू परशुराम भिडे यांचा जन्म पुणे येथे झाला. भिडे घराणे हे त्या काळात सुधारक भिडे या नावाने प्रसिद्ध होते. विष्णू भिडे यांचे वडील परशुराम नारायण भिडे हे १९०९मध्ये स्थापन झालेल्या पुणे येथील कृषी महाविद्यालयातून पदवीधर झाले होते. विष्णू भिडे यांचे शालेय शिक्षण नानावाडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. ते फर्ग्युसन महाविद्यालयातून पहिले महाविद्यालयीन वर्ष उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांनी कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला व त्यांना सरकारी शिष्यवृत्तीही मिळाली. तीन वर्षांच्या महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात त्यांनी सतत पहिला क्रमांक मिळवला. ते १९३६मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. (कृषी) परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. नंतर भिडे त्यांचे गुरू डॉ. उप्पल यांच्या सल्ल्यानुसार कृषी महाविद्यालयात चालू असलेल्या तागावरील मर रोगासंबंधीच्या संशोधन प्रकल्पात नोकरीला लागले. त्यानंतर निरनिराळ्या पिकांच्या रोगांवर संशोधक म्हणून ते काम करू लागले. या नोकरीत अध्यापन अपेक्षित नव्हते. पण डॉ.उप्पल यांच्या सांगण्यावरून ते दुसर्‍या व तिसर्‍या वर्षांच्या विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवशास्त्र व वनस्पती-विकृतिशास्त्र हे विषय शिकवू लागले. या काळात त्यांनी केलेल्या संशोधनाच्या कामावर पीएच.डी.साठीचा प्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर केला आणि १९४७मध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाची वनस्पति-विकृतिशास्त्र या शाखेची पीएच.डी. पदवी मिळाली. दरम्यान १९४५मध्ये त्यांची अ‍ॅटलांटिक करारानुसार भारतातून अमेरिकेत संशोधनासाठी पाठवल्या जाणार्‍या संशोधकांमध्ये निवड झाली. ते नोव्हेंबर १९४५ साली अमेरिकेला गेले व तिथे आयोवा विद्यापीठात डॉ.मेलहूस यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करू लागले. त्यांनी १९४८ साली आयोवा विद्यापीठाची सूक्ष्मजीवशास्त्राची पीएच.डी. पदवी मिळवली.  अमेरिकेतील संशोधनाबद्दल त्यांना तेथील सिग्मा सोसायटीचे मानद सदस्यत्व मिळाले. अमेरिकन विद्यापीठाने त्यांना देऊ केलेली नोकरी न स्वीकारता ते आपल्या देशासाठी कार्य करण्यास भारतात परतले. त्यानंतर भिडे यांची नेमणूक धारवाड येथे नव्याने सुरू झालेल्या कृषी महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून झाली. त्यांनी तेथे ३ वर्षे शिक्षण व संशोधन या दोन्ही आघाड्यांवर हे महाविद्यालय नावारूपास आणण्यात मोलाचा हातभार लावला.

          डॉ. भिडे १९५१मध्ये पुण्याच्या कृषी महाविद्यालयात कवकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांनी कृषी महाविद्यालयात १९५१ ते १९७१ या काळात विविध उपक्रम सुरू करून उल्लेखनीय काम केले. त्यांनी प्राध्यापक  वनस्पती-विकृतिशास्त्रज्ञ, कृषी-अणुजीवशास्त्रज्ञ, तंत्रज्ञान अधिकारी, प्राचार्य अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले. याच काळात त्यांनी विपुल संशोधनही केले. ते महाबळेश्‍वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्राचेही मार्गदर्शक होते. त्यांनी १९६०च्या दरम्यान प्रथमच हवेतील नत्र स्थिर करणार्‍या सूक्ष्म जीवांवर संशोधन सुरू केले. महाराष्ट्रातील अन्नटंचाईच्या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सूक्ष्मजीव व नत्रवायू स्थिरीकरण’ या विषयाचा मोठा संशोधन प्रकल्प कार्यान्वित झाला. अझेटोबॅक्टर व रायझोबियम हे सूक्ष्मजीव वापरून अत्यंत कमी खर्चात जिवाणू खते तयार करता येतात. अशा जिवाणू खतांच्या वापरामुळे रासायनिक खतांवरील खर्चात बचत होते व ही नैसर्गिक क्रिया असल्यामुळे जमिनीवरही त्याचा चांगला परिणाम होतो हे त्या संशोधनामुळे सिद्ध झाले.

          डॉ. भिडे हे पुणे विद्यापीठ व राहुरी कृषी विद्यापीठासाठी एम.एस्सी. व पीएच.डी पदव्यांसाठी मान्यवर मार्गदर्शक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्यासाठी भारतातील इतर राज्यांमधूनही विद्यार्थी येत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५० विद्यार्थ्यांनी एम.एस्सी. व ३० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली. राहुरी कृषी विद्यापीठाची स्थापना झाल्यावर १९७१ साली मुंबई येथे कृषी-अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या कारकिर्दीत कोकणात उसाची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोगही करण्यात आला. त्यांना मुंबई येथे स्टेट बँकेत १९७३मध्ये मुख्य कृषी-सल्लागार म्हणून बोलावण्यात आले होते. तेथे काम करतानाच त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेऊन नवी दिल्ली येथील भा.कृ.सं.सं.ने त्यांना मानद शास्त्रज्ञ म्हणून मान्यता दिली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील आघारकर संशोधन संस्था येथे विभागप्रमुख, वनस्पती-विकृतिशास्त्र या पदावर कार्य करतानाही आपले संशोधन कार्य सुरू ठेवले.

          डॉ.भिडे उत्तम प्रशासक म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांच्या कारकिर्दीत पुणे कृषी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवाचे आयोजन त्यांनी अतिशय उत्तम रीतीने केले होते. त्यांच्या जीवाणू संशोधनाचा उपयोग करून व्यापारी तत्त्वावर काही कंपन्यांनी जिवाणू खतांचे उत्पादनही सुरू केले. भारतीय व परदेशी शास्त्रज्ञांनी सूक्ष्मजीवशास्त्रावर लिहिलेली पुस्तके त्यांच्याकडे परीक्षणासाठी येत असत. त्यांनी मराठी विश्‍वकोशासाठी कवकशास्त्र व वनस्पती-विकृतिशास्त्र या विषयांवर लेखनही केले. तसेच आकाशवाणी पुणे केंद्रावर शेतीसंबंधी व्याख्याने दिली. डॉ.भिडे यांचे पुणे येथे वार्धक्यामुळे निधन झाले. इंडियन सोसायटी ऑफ मायकॉलॉजी अँड प्लँट पॅथॉलॉजी या संस्थेने त्यांना मरणोत्तर असामान्य शिक्षक पुरस्कार दिला.

- संपादित

भिडे, विष्णू परशुराम