Skip to main content
x

भिलवडीकर, गणपती वेदोनारायण

णपतीबुवा वेदोनारायण भिलवडीकर यांचा जन्म वाठार गावी झाला. त्यांचे वडील वेदोनारायण सखाराम भट्ट हे पुरोहित होते. त्यामुळे लहानपणीच भिलवडीकरबुवांना वेदपठणाची दीक्षा मिळाली.

वाठार गावी होणाऱ्या हरिकीर्तनात, भजनांमध्ये बालपणापासूनच गणपतीबुवा भाग घेत असत. कीर्तनकारांना मिळणारा मानसन्मान पाहून आपणही कीर्तनकार व्हावे असे गणपतीबुवांस वाटू लागले. त्यासाठी गायनविद्या शिकणे आवश्यक होते. म्हणून त्यांनी ग्वाल्हेरला प्रयाण केले. वासुदेवबुवा जोशींच्या आज्ञेनुसार त्यांचे शिष्य कृष्णशास्त्री शुक्ल यांच्याकडे उज्जैनी येथे राहून गणपतीबुवांनी बरीच वर्षे संगीताध्ययन केले. त्यांना बंदिशींचा संग्रह करण्याची आवड होती व त्यामुळे एक ‘कोठीवाले गायक’ अशी त्यांची कीर्ती होती.

उज्जैनीहून महाराष्ट्रात परतल्यावर १८९० च्या सुमारास त्यांनी काही वर्षे बेळगावला आणि मग कोल्हापूरला वास्तव्य केले. पुढे त्यांनी अनेक जलशांमध्ये गायन केले, संगीत शिकवण्याचे कार्यही केले. ते १९०२ साली पुण्याला आले व ‘पुणे गायन समाजा’त शिकवू लागले. तेथे दत्तात्रेय केशव जोशी यांना त्यांच्याकडून तालीम लाभली. ‘नाट्यकला प्रवर्तक मंडळी’ या संगीत नाटक संस्थेने गायनगुरू म्हणून पाचारण केले असता गणपतीबुवांनी गणेश रामचंद्र बेहरेबुवांनाही पायाभूत शिक्षण दिले. कृष्णाबाई नावाच्या गायिकेलाही त्यांनी शिकवले. नंतर पं. भातखंडे यांनी त्यांना मुंबईला बोलावून घेतले. त्यांच्याकडून बऱ्याच चिजा घेऊन, स्वरलिपिबद्ध करून पं.भातखंड्यांनी त्या क्रमिक पुस्तक मालिकेत प्रकाशित केल्या. मधुर आवाजी लाभलेले बुवा टप्पा, तराणा, सरगम छान म्हणत. त्यांनी बरेच शिष्यही तयार केले.

भिलवडीकरबुवांना मुंबईची हवा मानवली नाही. म्हणून १९२५ साली ते सांगलीला परतले आणि ‘चतुर संगीत विद्यालया’ची घरीच स्थापना करून विद्यार्थ्यांना ते विद्यादान करू लागले. दमा आणि वार्धक्य यांमुळे प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. शेवटी सांगलीत त्यांचे निधन झाले.

         - डॉ. सुधा पटवर्धन

भिलवडीकर, गणपती वेदोनारायण