Skip to main content
x

भिसे, शंकर आबाजी

     पारतंत्र्याच्या काळात विज्ञानक्षेत्रात भारताची कीर्ती दिगंती पसरविण्याची महनीय कामगिरी बजावणाऱ्या थोर शास्त्रज्ञांत शंकर आबाजी भिसे यांची गणना होते. पाश्चात्त्यांचा एक समज झाला होता, की भारतीय शास्त्रज्ञ एखाद्या शोधाची नक्कल करू शकतील; परंतु मूलभूत संशोधन करू शकणार नाहीत. कारण संशोधनवृत्ती हा त्यांचा गुणधर्म नाही. हा गैरसमज दूर करण्यासाठी डॉ.भिसे यांनी पाश्चात्त्य संशोधकांबरोबर स्पर्धा करून प्रामुख्याने यंत्रशास्त्र क्षेत्रात शोध लावून नेत्रदीपक यश मिळविले. त्यांच्या या यशाने प्रभावित होऊन दादाभाई नौरोजी यांनीही गौरवपूर्ण शब्दांमध्ये त्यांचे कौतुक केले होते.

     भिसे यांचा जन्म मुंबई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. संशोधनवृत्ती त्यांच्यात उपजत होती. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी दगडी कोळशापासून गॅस शुद्ध करण्याचे एक यंत्र शोधून काढले. पुढे सुमारे दहा वर्षे त्यांनी सरकारी नोकरी केली. या काळात १८९८ हे वर्ष त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. लंडनमधील सुप्रसिद्ध ‘सोसायटी ऑफ सायन्स’ या संस्थेतर्फे  ‘इन्व्हेंटर रिव्ह्यू अ‍ॅन्ड सायंटिफिक रेकॉर्ड’ या मासिकातून साखर, मीठ इ. जिन्नस मोठ्या राशीतून पाहिजे तितके, एकदाच वजन करून आपोआप काढून देणारे यंत्र शोधून काढणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले होते. भिसे यांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यांना बक्षीस मिळाले. या यशाची बातमी सर्वत्र पसरली. ‘सायंटिफिक अमेरिकन’ या अमेरिकेतील मासिकानेही ही बातमी छापली.

     ही बातमी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीचे एक सदस्य पां.ल. नागपूरकर यांच्या कानावर गेली. त्यांनी भिसेंची भेट घेतली आणि मातृभूमीची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी संशोधन क्षेत्रात पुढे येण्यासाठी इंग्लंड, अमेरिकेला जाण्याची विनंती केली. अशीच विनंती नामदार गोकूळदास तेजपाल, वाच्छा, गोखले व न्यायमूर्ती रानडे यांनी केली. तेव्हा सरकारी नोकरी सोडून एक शास्त्रज्ञ व संशोधक म्हणून त्यांनी मे १८९९ मध्ये इंग्लंडला प्रयाण केले.

     तेथे त्यांनी अनेक प्रकारचे शोध लावले, तरी प्रामुख्याने मुद्रण साहित्यविषयक शोध क्रांतिकारक ठरले. त्या काळी उपलब्ध असलेले ‘लायनोटाइप’ यंत्र महागडे, अवजड आणि ग्रंथजुळणीस कटकटीचे असा अनुभव होता. भिसे यांनी एका मिनिटात आपोआप कास्टिंग आणि जुळविणारे १२०० एकेरी टाइप पडतील असे यंत्र अल्पकाळात शोधून काढले. या शोधाची माहिती इंग्लंड, अमेरिका व जर्मनीमधील मासिकांत प्रामुख्याने झळकली. यानंतर ‘भिसे टाइप’ नावाचे टाइप स्वतंत्र प्रज्ञेने शोधून काढून त्यांनी त्याचे एकस्व घेतले.

     १९०७ साली त्यांनी ऑटोमॅटिक इबेल यंत्राचा किचकट प्रश्‍न सोडविला. पुढे सिंगल टाइप कास्टर वुइथ अ‍ॅन युनिव्हर्सल मोल्ड या यंत्रावर ‘रोटरी मल्टिपल टाइप कास्टर’ या यंत्राचा त्यांनी शोध लावला. दरम्यान लंडनमधील ‘अर्लस कोर्ट’ येथे भरलेल्या मुद्रणविषयक प्रदर्शनात त्यांनी तयार केलेल्या एका  यंत्राला सुवर्णपदक मिळाले.

     पुढे १९०८ साली चेन्नई (मद्रास) येथे भरलेल्या ‘इंडियन टेड काँग्रेस’च्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याची त्यांना विनंती करण्यात आली. या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष रा.ब. मुधोळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भिसेंच्या कार्याचा गौरव केला. दोन वर्षांनी म्हणजे १९१० साली भिसेंनी ‘टाटा भिसे’ सिंडिकेटची स्थापना केली.

     पहिल्या महायुद्धाच्या ऐन रणधुमाळीत भिसे अमेरिकेला गेले आणि तेथेच स्थायिक झाले. अमेरिकेत भिसेंनी ‘युनिव्हर्सल टाइप कास्टर कॉर्पोरेशनच्या’ विनंतीवरून एक अद्ययावत यंत्र शोधून काढले. मागोमाग दुसरे यंत्र अतिशय नवीन पद्धतीवर शोधून काढले. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला २५० सुटे भाग होते. यानंतर १९२० साली त्यांनी अमेरिकेत ‘भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन’ स्थापन केले.

     त्यांनी अमेरिकेत अनेक शोध लावले. ‘रोला’ नावाचा धुण्यासाठीचा एक विशिष्ट सोडा त्यांनी शोधून काढला. त्यांनी त्याचे जागतिक हक्क एका इंग्लिश कंपनीला दिले. ‘आटोमिडीन’ या नावाच्या त्यांनी शोधलेल्या औषधाचा उपयोग पहिल्या महायुद्धात जखमी सैनिकांसाठी करण्यात आला. वातावरणातील विविध वायू विजेच्या साहाय्याने वेगळे करण्याचे यंत्र त्यांनी शोधून काढले. यानंतर त्यांनी विजेच्या साहाय्याने दूरवर छायाचित्र पाठविण्याच्या यंत्रणेचा शोध लावला. त्याचे त्यांनी एकस्वही घेतले.

     त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमध्ये त्यांचा निरनिराळ्या संस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. या समारंभास अनेक थोर अमेरिकन उपस्थित होते. या वेळी समारंभाचे एक प्रमुख वक्ते, ‘न्यूयॉर्क अमेरिकन’ नियतकालिकाच्या शास्त्र विभागाचे संपादक मि. फ्रान्सिस टिटझोर्ट म्हणाले की, ‘‘डॉ. भिसे हे प्रथम श्रेणी संशोधक आहेत. भारताचे एडिसन म्हणून जगाला त्यांनी पुष्कळ शोध दिले आहेत. ते मानवतावादी असून तत्त्वज्ञानी आहेत. त्यांचा अ‍ॅटॉमिक आयोडीनचा शोध ही रसायनशास्त्रातील एक अजब करामत आहे. वैद्यकशास्त्राला ते एक प्रभावी साधन प्राप्त झाले आहे. यास्तव जग भिसेंच्या अद्वितीय अशा शास्त्रीय आणि मानवतावादी कार्याबद्दल ऋणी असून त्यांचे नाव इतिहासात चिरस्थायी राहील.’’

     डॉ. भिसे यांच्या शोधाला जागतिक मान्यता मिळाली. त्याचे टाइप कास्टिंगचे शोध अमेरिकेच्या क्रमिक पुस्तकात अंतर्भूत करण्यात आले. त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. त्यांना अनेक संस्थांचे मान्यवर सभासद करण्यात आले. डी.एस्सी. व पीएच.डी. ह्या सन्माननीय पदव्या त्यांना बहाल करण्यात आल्या.

     अमेरिकेत केलेल्या कार्याचा बहुमान म्हणून त्यांचे नाव ‘हूज हू’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या पुस्तकात नाव अंतर्भूत होणारे ते पहिले भारतीय होत. यामध्ये त्यांचा आवर्जून उल्लेख करण्यात आला.

— ज. बा. कुलकर्णी

भिसे, शंकर आबाजी