Skip to main content
x

भिवंडकर, कमल

रत्नमाला

     चित्रपटसृष्टीला तब्बल ५१ वर्षे आपल्या अभिनयाची चुणुक दाखवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रत्नमाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव कमल भिवंडकर. मेळयामध्ये काम करत असतानाच वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना दादासाहेब तोरणे यांच्या ‘भगवा झेंडा’ (१९३८) या चित्रपटात भूमिका मिळाली. दादासाहेब तोरणे यांनीच त्यांचे कमल हे नाव बदलून ‘रत्नमाला’ असे केले.

     या चित्रपटातील भूमिकेमुळे लक्षात आलेले दिसण्यातले आणि अभिनयातले देखणेपण त्यांना अनेकानेक चित्रपटांमध्ये भूमिका मिळवून देत राहिले आणि त्याचबरोबरीने त्यांची अभिनय कारकिर्दही घडवत राहिले. ‘भगवा झेंडा’ या चित्रपटानंतर रत्नमाला यांना सरस्वती सिनेटोनच्या ‘माझी लाडकी’ (१९३९) या चित्रपटात नायिकेची भूमिका मिळाली. या भूमिकेमुळे रत्नमाला यांना चित्रपटसृष्टीत स्थैर्य मिळाले, नाव मिळाले आणि त्या एक एक पायरी यशाच्या शिखरावर चढू लागल्या.

     त्यानंतरचा रत्नमाला यांचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे प्रभात फिल्मचा ‘दहा वाजता’ (१९४२). यात त्यांनी साकारलेली आधुनिक सुशिक्षित तरुणीची भूमिकाही तत्कालीन पार्श्‍वभूमीचा विचार करता खूपच गाजली.

     मराठी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसल्यावर रत्नमाला यांनी आपला मोहरा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळवला आणि त्यांनी हिंदीतही एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. प्रकाश पिक्चर्सच्या विजय भट यांनी त्यांना संधी दिलेला चित्रपट होता, ‘स्टेशन मास्तर’.  प्रेम अदींबरोबर रत्नमाला यांनी केलेली अभिनयाची जुगलबंदी पाहून प्रेक्षक इतके मोहून गेले की, हा चित्रपट रौप्य महोत्सवी ठरला. या चित्रपटातील अभिनयाने त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढीला लागला आणि त्यांनी हिंदीतील आघाडीची नायिका होण्याचा मान पटकावला. त्यानंतर त्यांनी नायिका म्हणून ‘पोलिस’, ‘पनघट’, ‘कविता’, ‘विक्रमादित्य’ या हिंदी चित्रपटांमधूनही कामे केली.

     हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असतानाही त्यांनी मराठीत ‘रुक्मिणी स्वयंवर’ (१९४६), ‘माझा राम’ (१९४९), ‘गोकुळचा राजा’ (१९५०), ‘रामराम पाव्हणं’ (१९५०), ‘सांगत्ये ऐका’ (१९५९), ‘मानिनी’ (१९६१), ‘रंगपंचमी’ (१९६१), ‘वैजयंता’ (१९६१), ‘गरिबाघरची लेक’ (१९६२), ‘जावई माझा भला’ (१९६२), ‘यालाच म्हणतात प्रेम’ (१९६४), ‘धन्य ते संताजी धनाजी’ (१९६८), ‘धर्मकन्या’ (१९६८), ‘कोर्टाची पायरी’ (१९७०), ‘काळी बायको’ (१९७०), ‘मुंबईचा जावई’ (१९७०) या चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.

     पण आजच्या पिढीला रत्नमाला या नावापेक्षा त्या परिचित आहेत, त्या ‘आये’ म्हणून. त्याही दादा कोंडके या अवलियाच्या ‘आये’ म्हणून. रत्नमाला यांनी वयपरत्वे चरित्र भूमिका करायला सुरुवात केल्यावर दादा कोंडके यांच्या विनोदी धाटणीच्या चित्रपटांची रेलचेल मराठी चित्रपटसृष्टीत सुरू झाली आणि आई म्हणून पडद्यावर एकच नाव झळकू लागले, ते म्हणजे ‘रत्नमाला’. त्यांनी आई म्हणून साकारलेल्या चित्रपटांची नावे, ‘सोंगाड्या’ (१९७१), ‘एकटा जीव सदाशिव’ (१९७२), ‘हऱ्या नाऱ्या झिंदाबाद’ (१९७२), ‘थापाड्या’ (१९७३), ‘पांडू हवालदार’ (१९७५), ‘प्रीत तुझी माझी’ (१९७५), ‘रामराम गंगाराम’ (१९७७), ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ (१९७८), ‘लक्ष्मी’ (१९७८), ‘ह्योच नवरा पाहिजे’ (१९८०), ‘आली अंगावर’ (१९८२), ‘नवरे सगळे गाढव’ (१९८२), ‘ढगाला लागली कळ’ (१९८५), ‘मुका घ्या मुका’ (१९८७).

     कणखर आवाज, मोठे डोळे, ग्रामीण वेष, ग्रामीण भाषा आणि त्यात दादा कोंडके सारखा अवखळ मुलगा यांच्यातील आई-मुलगा नातेसंबंध बघताना प्रेक्षक खिळून राहत असे, हे वेगळे सांगण्याची गरजच नाही. किंबहुना सालस, लाघवी, आपल्या मुलांची काळजी घेताना त्याच्याबद्दल अपशब्द न बोलता फक्त मुलावर प्रेम करणाऱ्या आईचे चित्र मराठी चित्रपटाने रंगवले होते, पण दादा कोंडकेंच्या चित्रपटांनी आईची ही प्रतिमा बदलून रागात प्रेम व्यक्त करू पाहणारी, आपल्या मुलाच्या भल्यासाठी त्याला अस्सल गावरान शिव्या घालणारी आई रत्नमाला यांच्या रूपाने चित्रपटसृष्टीला दिली. आईच्या रूपातील रत्नमाला यांनी या आईच्या बदललेल्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला, म्हणूनच त्यांनी साकारलेली ही ‘आये’ चित्रपटसृष्टीत अजरामर झाली. किंबहुना रत्नमाला यांचे दादा कोंडकेंची ‘आये’ हेच नाव चित्रपटसृष्टीत रूढ झाले आणि आजतागायत ते तसेच आहे.

     रत्नमाला यांनी नकलाकार आणि चरित्र अभिनेता म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या रवी पंडित यांच्याशी विवाह केला आणि त्यांना जयकुमार नावाचा एक मुलगाही झाला. पण तरुण जयकुमारचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे रत्नमाला यांच्यातील जगण्याच्या साऱ्या ऊर्मी संपुष्टात आल्या. त्याच्या मृत्युने भावविवश व अगतिक झालेली रत्नमाला ही आई पुढच्या पाच वर्षातच हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे मरण पावली, तरी चित्रपटातील त्यांनी साकारलेली आई रसिकांच्या आजही लक्षात आहे.

     - संपादित

भिवंडकर, कमल