भोजे, शिवराम बाबूराव
शिवराम बाबूराव भोजे यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कसबा सांगाव या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर सांगाव व माध्यमिक शिक्षण श्री शाहू हायस्कूल, कागल येथे झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालय येथे दोन वर्षे शिकून पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९६५ साली बी.ई. मेकॅनिकल ही पदवी मिळवली. त्याच वर्षी त्यांची निवड भाभा अणू संशोधन संस्थेच्या एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी झाली व तो अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करून ते वैज्ञानिक म्हणून भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये नोकरीस रुजू झाले.
सुरुवातीला एक वर्ष भाभा अणू संशोधन केंद्रातील अणुभट्ट्यांमध्ये प्रशिक्षण घेऊन १९६७ साली ते अणुभट्टी संयंत्र रचना या विभागात कार्य करू लागले. १९६९ ते १९७० सालांत त्यांना कॅडरॅश या फ्रान्समधील द्रुतप्रजनक अणुसंयंत्राच्या रचना अभ्यासासाठी पाठविण्यात आले व १९७१ साली त्यांची बदली कल्पक्कम येथील अणू संशोधन केंद्रात करण्यात आली. नंतर याच केंद्राचे नामकरण ‘इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्र’ (आय.जी.सी.ए.आर.) म्हणून करण्यात आले व या केंद्रात मुख्यत्वेकरून द्रुतप्रजनक अणुभट्टीच्या (फास्ट ब्रीडर रिअॅक्टर) बांधणीवर संशोधनकार्य चालू आहे.
सुरुवातीच्या काळापासून त्यांनी या अणुभट्टीची रचना व उभारणी या दोन्ही कार्यात निरनिराळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या व ४० मेगावॅट प्रायोगिक अणुभट्टी उभारून ती १९८५ साली कार्यरत झाली. जगात अशा प्रकारच्या अणुभट्ट्या फारच थोड्या ठिकाणी कार्यरत होत्या आणि त्यांची कार्यक्षमताही अपेक्षा पूर्ण करणारी नव्हती. पण संपूर्णपणे स्वबळावर उभ्या केलेल्या कल्पक्कम येथील या प्रकारच्या अणुभट्टीत नवीन प्रकारचे इंधन वापरण्याचा प्रयोग करण्यात आला. केवळ मूलद्रव्य रूपातील धातू इंधन म्हणून वापरण्याऐवजी त्यांच्या ऑक्साइड किंवा कार्बाइड स्वरुपातील संयुगांचे मिश्रण वापरल्यास कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होते, हे या प्रयोगांमधून दिसून आले. त्या प्रयोगसिद्धीत भोजे यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
या अणुभट्टीच्या उभारणीतील त्यांचे कार्य पाहून याच धर्तीची ५०० मेगावॅट इतकी ऊर्जा निर्माण करणाऱ्या अणुभट्टीची प्राथमिक रचना व तिची कार्यक्षमता ठरविण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले. ते त्यांनी १९८३ सालापर्यंत केले. आंतरराष्ट्रीय द्रुतप्रजनक अणुभट्टी समितीमध्ये त्यांची नेमणूक भारताचा प्रतिनिधी म्हणून १९८७ साली झाली व ते १९९८ सालापर्यंत त्या समितीचे सदस्य होते. १९८९ साली अणुभट्टी विभागाचे ते प्रमुख झाले व २००० साली ते इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्राचे संचालक झाले व त्यांच्या २००४ सालच्या निवृत्तीपर्यंत ही जबाबदारी त्यांनी पार पाडली.
विजेच्या निर्मितीकरिता कल्पक्कम येथे प्रथमच ५०० मेगावॅट क्षमतेची द्रुतप्रजनक अणुभट्टी बांधण्याचा निर्णय घेऊन त्याकरिता अणू ऊर्जा महामंडळामध्ये स्वतंत्र विभाग स्थापून त्याकरिता लागणारी सर्व प्राथमिक कामे भोजे यांच्याच मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या अणुभट्टीच्या उभारणीचे काम कल्पक्कम येथे चालू आहे. भोजे हे द्रुतप्रजनक अणुभट्टीच्या रचना, उभारणी व कार्य या विषयांत जगातील एक नामवंत तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात व त्यांच्या अनुभवाचा फायदा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा खात्यामार्फत इतर देशांतही झाला.
वरील सर्व कार्य करत असताना साहजिकच त्यांना निरनिराळे बहुमान मिळत गेले. त्यांतील काही महत्त्वाचे असे आहेत : ‘इंडियन नॅशनल अकादमी ऑफ इंजिनिअर्स’चे फेलो १९९५, ‘पद्मश्री पुरस्कार’ २००३, ‘वास्विक पुरस्कार’, ‘फिरोदिया पुरस्कार’ २००६.
भोजे आपल्या सरकारी नोकरीतून २००४ साली निवृत्त झाले. पण विज्ञान व तंत्रज्ञानाचा फायदा आपल्या तरुण पिढीस व्हावा या उद्देशाने ते सध्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात कार्यरत आहेत. २००७ साली तेथे झालेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक अधिवेशनात त्यांचा सहभाग होता.