Skip to main content
x

भोसले, मारुतीबुवा गणपती

मारुतीबुवा भोसले म्हणजे समर्थांचा साक्षात महंत होय. त्यांचा जन्म हनुमानजयंतीला कोल्हापूर जिल्ह्यातील बुवाचे वाठार येथे झाला. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच त्याने घरदार सोडून औदुंबर, नरसोबावाडी अशा ठिकाणी साधना केली आणि स्वरूपाचा शोध सुरू केला. गाणगापूर येथे दोन वर्षे राहून, भिक्षा मागून प्रखर दत्तोपासना केली. योगायोगाने समर्थ सेवा मंडळाचे ज्येष्ठ रामदासी वेंकटरमण अय्या तथा अय्याबुवा यांची मारुतीबुवांशी गाणगापूर येथे भेट झाली. त्यांनी मारुतीबुवांची जिज्ञासू वृत्ती, चिकाटी, उपासना पाहून त्यांना सज्जनगडावर पाचारण केले. श्रीधरस्वामींचा ‘गुरुपदेश’ घेण्याचा मार्ग दाखविला. श्रीधरस्वामींची बुवांनी अत्यंत श्रद्धेने गुरुसेवा केली. या सत्पुरुषांच्या साक्षीने आणि मार्गदर्शनाखाली मारुतीबुवांनी कठोर साधना केली. त्यांचा सेवाभाव, अभ्यास आणि साधना पाहून स्वामी संतोष पावत. हळूहळू मारुतीबुवा अधिकारी शिष्यत्वास पात्र झाले, म्हणून श्रीधरस्वामींनी २८ मे १९५८ रोजी स.भ. कुलकर्णीबुवा यांच्या सांगण्यावरून मारुतीबुवांना चाफळच्या दासमारुती मंदिरात अनुग्रह दिला. १९५७-५८ पासून सज्जनगडावरील मठाची, मंदिराची जीर्णावस्था दूर करण्यासाठी गडावर अनेक भक्त खटपट करीत होते. त्यांमध्ये बाबूराव वैद्य, कुलकर्णीबुवा, अय्याबुवा, दिनकरबुवा आदी मंडळींमध्ये मारुतीबुवा अग्रेसर होते. भिक्षाप्रचार दौर्‍यात मारुतीबुवांचा पुढाकार अहर्निश राहिला. कालांतराने गडाचे रूप पालटले.

आज गडावर भक्तांना सर्व प्रकारच्या सुविधा लाभल्या आहेत. मंदिरातील पूजा यथासांग होत आहेत. उपासना चालू आहे. उत्कृष्ट प्रवचनकार, समर्थ वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, तत्त्वचिंतक, अद्वैत ग्रंथाचे भाष्यकार, भक्तीचा मुकुटमणी असे मारुतीबुवा दास्यभक्ती कशी असावी, याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. भिक्षा दौर्‍यात ते सिंगापूर, मलेशिया इ. ठिकाणी जाऊन समर्थ गाथा गाऊन आले. ‘महंते महंत करावे’ हा उपदेश त्यांनी आचरणात आणून दाखविला. समर्थ संप्रदायाची वृद्धी केली. दासबोधावर, आत्मारामावर व समर्थांच्या अन्य वाङ्मयावर मारुतीबुवांनी चिंतनात्मक असे विपुल लिखाण केले आहे.

— प.अ. बोंडाळे

भोसले, मारुतीबुवा गणपती